Skip to main content
x

पाटणकर, वसंत सीताराम

     संत सीताराम पाटणकरांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात झाला. त्यांच्या आईचे नाव सरस्वती. पाटणकरांचे बालपण मुंबईमध्ये गेले. मुंबईच्या किंग जॉर्ज शाळेतून ते एस.एस.सी. झाले. सायनच्या एस.आय.ई.एस महाविद्यालयातून बी.ए. झाल्यानंतर मुंबई विद्यापीठातून ते एम.ए. झाले. १९८९ साली त्यांना ‘मराठी साहित्यविचारातील जीवनवादाचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावरील प्रबंधासाठी मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्राप्त झाली.

वसंत पाटणकरांनी त्यांची पहिली कविता महाविद्यालयीन काळात लिहिली. ‘आलोचना’, ‘सत्यकथा’, ‘अनुष्टुभ’, ‘कवितारती’ इत्यादी नियतकालिकांतून त्यांनी समीक्षापर लेखनही केले. १९८३ साली त्यांचा ‘विजनांतील कविता’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. ‘विजनांतील कविता’ या काव्यसंग्रहाच्या शीर्षकातूनच कवीच्या काव्यानुभूतीच्या विषयाची ओळख होते. आधुनिकीकरणाच्या जबरदस्त यांत्रिक रेट्यात, महानगरी जीवनात होणारी संवेदनशील मनाची घुसमट व कोंडी. त्यातून भोवतालच्या परिस्थितीशी नाळ न जुळल्यामुळे अपरिहार्यपणे येणारी वास्तवापासूनच्या तुटलेपणाची जाणीव आणि या परकेपणाच्या जाणिवेमुळे कवीच्या वाट्याला येणारे अटळ एकाकीपणा कवीने या काव्यसंग्रहातून व्यक्त केले आहे. कवीच्या वाट्याला आलेला हा विजनवास, हे एकाकीपण जरी कवीच्या वैयक्तिक मनोवृत्तीचा भाग म्हणून येत असले, तरी ते आधुनिकीकरणामुळे अस्ताव्यस्त वाढलेल्या महानगरात प्रत्येक संवेदनशील व्यक्तीच्या वाट्याला येणार्‍या एकाकीपणाचे प्रातिनिधिक रूप ठरते. वसंत पाटणकरांच्या कवितेचे हे वैशिष्ट्य म्हणता येईल.

१९९५ मध्ये वसंत पाटणकरांचे ‘कविता: संकल्पना, निर्मिती आणि समीक्षा’ हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकातून काव्यासंबंधीच्या संकल्पनात्मक, तात्त्विक स्वरूपाच्या प्रश्नांची मांडणी केलेली आढळते. मराठी कवितेच्या अभ्यासकांना एकंदरीत ‘कविते’ची संकल्पना तसेच कवितेच्या संदर्भातील काव्यनिर्मितिप्रक्रिया, काव्यातील तंत्र, काव्यसमीक्षा यांसारख्या संकल्पनात्मक आणि तात्त्विक गोष्टी समजून घेण्यासाठी प्रस्तुत पुस्तक उपयोगी आहे. २००६ साली वसंत पाटणकरांचे ‘साहित्यशास्त्र: स्वरूप आणि समस्या’ हे पुस्तक प्रकाशित झाले. मराठी साहित्यात एम.ए. करणार्‍या विद्यार्थ्यांना ‘साहित्य’ या संकल्पनेची व्यामिश्रता व वादग्रस्तता लक्षात यावी, तसेच साहित्याच्या संदर्भात निर्माण होणार्‍या विविध प्रश्नांचे, वादांचे भान त्यांच्यामध्ये निर्माण व्हावे, हा या पुस्तकलेखनामागील हेतू आहे.

याशिवाय डॉ.वसंत पाटणकरांनी ‘सर्वोत्कृष्ट मराठी एकांकिका’ (१९७९), ‘वाङ्मयीन महत्ता’ (१९९०), ‘टी.एस.एलियट आणि मराठी नवकाव्य व समीक्षा (१९९२) ‘ग.स.भाटे : एक वाङ्मयसमीक्षक’ (१९९५), ‘द.ग.गोडसे यांची कलामीमांसा’ (१९९७) ‘अरुण कोलटकरांची कविता: काही दृष्टीक्षेप’ (१९९८) या ग्रंथांचे संपादनही केले आहे. ‘स्वातंत्र्योत्तर मराठी कविता: भाग १’ (२००२) हा त्यांनी संपादित केलेला ग्रंथ साहित्य अकादमीकडून (दिल्ली) प्रकाशित झाला आहे.

वसंत पाटणकरांना ‘विजनांतील कविता’ (१९८३) या काव्यसंग्रहासाठी १९८४-८५ चा महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला आहे. याच काव्यसंग्रहाला १९८६ सालचा बा.सी.मर्ढेकर पुरस्कारही मिळाला आहे. मराठी समीक्षेच्या क्षेत्रातल्या त्यांच्या योगदानासाठी मुंबई मराठी साहित्य संघातर्फे देण्यात येणारा २००४ सालचा ‘साहित्य समीक्षक पुरस्कार’ही त्यांना प्राप्त झालेला आहे.

- डॉ. दुलारी देशपांडे

पाटणकर, वसंत सीताराम