Skip to main content
x

पदकी, सरिता मंगेश

 

रिता पदकी या पूर्वाश्रमीच्या शांता कुलकर्णी होत. त्यांचे शिक्षण पुणे इथे झाले. त्यांनी संस्कृत विषयात एम.ए. केले आणि त्यानंतर काही काळ डेक्कन महाविद्यालय पुणे येथे संस्कृतचे अध्यापन केले. ‘अर्थविज्ञानवर्धिनी भारतीय शिक्षण संस्था’ येथेही काही काळ काम केले. सरिता पदकी यांनी कविता, कथा, बालवाङ्मय, नाटक व अनुवाद अशा विविध स्वरूपाचे लेखन केले. आरंभी त्यांनी कविता आणि कथा लिहिल्या. त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘चैत्रपुष्प’ (१९६१) आणि त्यानंतर दुसरा कवितासंग्रह २००६ साली प्रसिद्ध झाला. त्यांची प्रारंभीची कविता सहजस्फूर्त, भावमधुर स्वरूपाची आणि स्वभावत:च सौम्य भाषेची आहे तर पुढची कविता सार्‍याच सुख-दु:खांचा समंजसपणे स्वीकार करणारी आणि पुन्हा अस्तित्वाच्या लयीत स्वत:ला झोकून देणारी आहे.

पदकी यांनी १९६०च्या काळात लक्ष वेधून घेणार्‍या कथा लिहिल्या. ‘बारारामाचं देऊळ’(१९६६), ‘घुम्मट’ (१९८०) हे त्यांचे दोन कथासंग्रह प्रसिद्ध झाले. ‘बारारामाचं देऊळ’मधील काही कथा ललितलेखांच्या अंगाने जाणार्‍या आहेत. त्यांमध्ये कथानकांपेक्षा क्षणमात्र मनात उमटणारी भाववृत्ती अधिक प्रभावी ठरते. ‘घुम्मट’ हे दुसर्‍या संग्रहाचे शीर्षक स्त्रियांच्या अवस्थेचे निदर्शक म्हणून बोलके आहे. त्यांच्या एकूण कथा स्त्री दु:खाच्या अनेक छटा दर्शवितात आणि नकळत दु:ख स्वीकारायची भूमिका घेतात. जीवनविषयक जाणिवेची प्रगल्भता व त्याचे वास्तव चित्रण त्यात दिसते.

लहान मुलांसाठी त्यांनी कविता व कथा लिहिल्या. ‘गुटर्र गूंऽ गुटर्र गूंऽ’ व ‘नाच पोरी नाच’ हे त्यांचे बालकवितांचे संग्रह व ‘गंमत टपूटिल्लूची’ (१९७९) हा कथासंग्रह आहे. त्यांच्या बालगीतांतील ओवी लय आणि ताल साधतात; तर बडबडगीते नाद व ताल त्याबरोबर सूर आणि लय यामुळे भावतात. सहजता, जिव्हाळा आणि कल्पकता यांमुळे त्यांचे बालसाहित्य उल्लेखनीय ठरते.

‘बाधा’ (१९५७), ‘खून पाहावा करून’ (१९६८) आणि ‘सीता’ (१९७७) ही त्यांची तीन नाटकेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यांची अनुवादक म्हणून कामगिरी महत्त्वाची आहे. करोलिना मारिया डिजीझस याच्या ‘चाइल्ड ऑफ द डार्क’ या ब्राझीलमधील झोपडपट्टीत राहणार्‍या निग्रो स्त्रीच्या आत्मनिवेदनाचा त्यांनी केलेला अनुवाद ‘काळोखाची लेक’ (१९८६) तसेच युजीन ओनीलच्या नाटकाचा अनुवाद ‘पांथस्थ’ वेस्टिंग हाउसच्या चरित्राचा अनुवाद ‘संशोधक जादूगार’ व ‘सात रंगांची कमान माझ्या पापण्यांवर’ हा जपानी भाषेतील काव्याचा अनुवाद ही त्यांची अनुवादित पुस्तके होत.

- अशोक बेंडखळे


  

संदर्भ :
खांडगे मंदा व अन्य; ‘स्त्री साहित्याचा मागोवा’, खंड २; भारतीय विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय आणि साहित्यप्रेमी भगिनी मंडळ, पुणे ;२००२, २००३.

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].