पेंढारकर, प्रभाकर भालजी
प्रभाकर पेंढारकरांचा जन्म कोल्हापूरला झाला. तेथेच विद्यापीठ हायस्कूलमध्ये मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाले. नंतर राजाराम महाविद्यालयामधून त्यांनी बी.ए. ही पदवी संपादन केली. त्यांनी आपले वडील, सुप्रसिद्ध दिग्दर्शक भालजी, यांच्या हाताखाली चित्रपट व्यवसायात प्रवेश केला. पुढे मुंबईला ‘राजकमल’मध्ये नोकरी केली, परंतु १९६२ मध्ये चित्रपटक्षेत्र सोडून ते फिल्म्स डिव्हिजनमध्ये नोकरीला लागले. दरम्यान त्यांनी आपल्या लेखनाला ‘दीपावली’ मासिकातून सुरुवात केली. त्यांच्या ‘प्रतीक्षा’ दीर्घकथेस पुरस्कार मिळाला. ‘अरे संसार संसार’ ही त्यांची पहिली कादंबरी. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण व ओघवती भाषाशैलीने ती विशेष गाजली. यात अनेक वैयक्तिक अनुभव-कथन आहे. ‘रारंगढांग’ ही कादंबरी अगदी वेगळ्या विषयामुळे व त्यातील भाषासौंदर्यामुळे गाजली. ‘मौज’ प्रकाशनाने ती प्रसिद्ध केली. हिमालयातील अति उंचीवरील उभे कडे फोडून तेथे रस्ते बांधणीची अति अवघड कामगिरी भारतीय सैन्याला पार पाडावी लागली. या आगळ्या विषयावरच्या अनुभवांवर त्यांनी ही कादंबरी लिहिली. माणसे, त्यांचे अनुभव, त्यांची स्वभाववैशिष्ट्ये त्यांनी न्याहाळली. माणूस आणि निसर्ग यांच्यातल्या द्वंद्वाच्या चित्रणांमुळे ती विशेष गाजली.
फिल्म्स डिव्हिजनच्या कामातून त्यांना अनेक अनुभव आले. निरनिराळी स्थळे पाहताना १९७७मध्ये आंध्र प्रदेशमध्ये महाभयंकर वादळे झाली. या चक्रीवादळातील अनुभवांवर त्यांनी त्याच नावाचे पुस्तक लिहिले. मोजके पण तरीही वेगळ्या विषयांवर लक्षणीय लेखन करणारा लेखक, अशी त्यांची प्रसिद्धी आहे. त्यांच्या भाषेचा बाजही त्या विषयाला साजेसा व आकर्षक शैलीचा असतो.
त्यांनी ‘प्रतीक्षा’, ‘हरवलेला मधुचंद्र’, ‘आज अचानक गाठ पडे’ या आपल्या दीर्घकथांवर चित्रपटही काढले. ‘फोर्ट्स अॅन्ड द मॅन’ या महाराष्ट्रातील किल्ल्यांवर काढलेल्या अनुबोधपटास (१९६३-१९६४) राष्ट्रीय पारितोषिक; हिमालयातील माउंटेनिअरिंग कोर्स-स्टेअर टू डिरस्काय या अनुबोधपटास फ्रान्सचे अॅवॉर्ड; खाडी पोहून जाणारा तारानाथ शेणॉय यांवरील चित्रपटास राष्ट्रीय पारितोषिक; ‘व्हिव्ह मी सम फ्लॉवर’ या अनुबोधपटास केंद्र सरकारचे पारितोषिक; भालजी पेंढारकरांवर काढलेल्या चरित्र चित्रपटाला राष्ट्रीय पारितोषिक अशी अनेक महत्त्वाची पारितोषिके त्यांनी मिळवलेली आहेत.
लोकेशन, बोलका कॅमेरा, त्याची पटकथा यांचे अभ्यासपूर्वक बारकाईने केलेले निरीक्षण ही त्यांची वैशिष्ट्ये होत. त्यांच्या अनेक फिल्म्स व्यवस्थापनावरही आहेत. यासाठी त्यांनी फ्रान्स व अमेरिका येथे वास्तव्य करून त्याचे प्रशिक्षण घेतले. त्यांच्या ‘बालशिवाजी’ या चित्रपटाची पटकथा त्यांनीच अभ्यासपूर्वक व मोठ्या मेहनतीने लिहिली आहे. त्यालाही इंटरनॅशनल ब्यूरोचा पुरस्कार मिळाला.
- रागिणी पुंडलिक