Skip to main content
x

पेरूर, नारायण गुंडेराव

          नारायण गुंडेराव पेरूर यांचा जन्म कर्नाटकातील विजापूर येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विजापूर येथे झाले व मॅट्रिकनंतर ते पुण्यास कृषी महाविद्यालयात विद्यार्थी म्हणून रुजू झाले. त्यांनी १९४४मध्ये मुंबई विद्यापीठाची बी.एस्सी. (कृषी) पदवी प्राप्त केली. पुढे त्यांनी पुण्याच्या कृषी महाविद्यालयात डेमॉन्स्ट्रेटर व नंतर व्याख्याता म्हणून काम केले. त्यांनी १९५०मध्ये पुणे विद्यापीठातून बी.एस्सी. पदवी रसायनशास्त्र या विषयात घेतली. कर्जत येथील भात संशोधन केंद्रात संशोधक म्हणून काम करत असताना त्यांनी राब विषयावर संशोधन केले व त्याच वेळेस त्यांनी एम.एस्सी.(कृषी) पदवी प्राप्त केली. त्यांची १९५६मध्ये कर्नाटकात धारवाड येथील कृषी महाविद्यालयात नियुक्ती झाली. नंतर बंगलोर येथील कृषी विद्यापीठात ते क्रमाने प्राध्यापक, अधिष्ठाता व कुलगुरू झाले. बंगलोर येथून त्यांना अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाण्याची संधी मिळाली व युटाह विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली.

          डॉ.पेरूर हे उत्कृष्ट शिक्षक होते व त्यांचे अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर आहेत व आपल्या यशाचे श्रेय ते डॉ.पेरूर यांच्या मार्गदर्शनाला देतात. कर्नाटक राज्यातील माती परीक्षण व खतांचा वापर या विषयाला सुरुवातीपासून सध्याच्या अत्यंत प्रगत अवस्थेत आणण्याचे सर्व श्रेय डॉ.पेरूर यांना दिले जाते. त्यांनी कर्नाटक राज्यातील माती परीक्षण प्रयोगशाळांची गुणवत्ता व दर्जा राखण्याचे व तो अधिक सुधारण्याचे काम स्वेच्छेने निवृत्त होईपर्यंत केले.

          ‘भारतीय शेतकऱ्यांसाठी मृदा सुपीकता मूल्यमापन’ हे १९७३ मध्ये प्रसिद्ध झालेले त्यांचे पुस्तक त्या विषयाच्या अधिकृत व प्रगत माहितीचा ग्रंथ मानला जातो. त्यांना ‘शास्त्रीय उपकरण विद्या’ (इन्स्ट्र्युमेंटेशन) या विषयाची खूप आवड होती. कर्नाटक राज्यातील माती परीक्षण प्रयोगशाळांतील शास्त्रीय उपकरणे दुरुस्त व उत्तम कार्यक्षम स्थितीत ठेवण्याबद्दल त्यांचा आग्रह असे व जरूर पडल्यास ते स्वत: जाऊन उपकरणे कार्यरत व अद्ययावत ठेवण्यासाठी आपली तज्ज्ञता पणाला लावत. माती व पाण्यातील क्षारता मोजण्याचे एक उपकरण त्यांनी स्वत: बनवले होते, त्याला ‘पेरूर ब्रीज’ म्हणतात. त्यांचा पिकांची सूक्ष्म अन्नद्रव्ये या विषयाचा व्यासंग होता व त्या विषयावर त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. इराण सरकारच्या निमंत्रणावरून कृषी सल्लागार म्हणून ते इराणला गेले होते. बंगळुरू कृषी विद्यापीठातून कुलगुरूपदावरून निवृत्त झाल्यावर १९८६ ते १९८९ या दरम्यान राहुरीच्या म.फु.कृ.वि.चे कुलगुरूपद त्यांनी भूषवले व कृषी शिक्षण, संशोधन व प्रसार याबाबत मार्गदर्शन व नेतृत्व करण्याचे काम केले.

          कृषी हवामानशास्त्र हा नवीन विभाग व अनेक नवीन उपक्रम त्यांच्या कार्यकालात सुरू झाले व प्रशासकीय व विद्याविषयक तात्त्विक शिस्त व अनुशासन यांचे पालन करून म.फु.कृ.वि.ने प्रगती केली. सेवानिवृत्ती घेतल्यावर त्यांनी आपल्या जन्मगावी विजापूरला एक निवासी उच्च माध्यमिक विद्यालय आपल्या पित्याच्या नावे सुरू करून विद्यादानाचे मूलभूत व महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.

- प्रा. श्रीपाद यशवंत दफ्तरदार

पेरूर, नारायण गुंडेराव