पेठे, वसंत अवधूत
वसंत अवधूत पेठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे झाला. वडील सरकारी अधिकारी होते. त्यांची मुंबईत बदली झाल्याने पेठे यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण विलेपार्ल्यात झाले. पेठे यांनी मुंबई विद्यापीठातून भौतिकशास्त्र व गणित या दोन्ही विषयांत एम.एस्सी. ह्या पदव्या प्राप्त केल्या. त्यानंतर काही काळ मुंबईतील रुइया, रुपारेल आणि सिद्धार्थ महाविद्यालयांत अध्यापनाचे कार्य केले.
पंतप्रधान पंडित नेहरूंनी भारताची औद्योगिक प्रगती वेगवान होण्यासाठी केंद्र शासनात अणुऊर्जा हा प्रभाग निर्माण केलेला होता. तसेच त्याच्या अंतर्गत अणुऊर्जा आस्थापन (अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट) हे तुर्भे येथील केंद्र स्थापन केले. त्यामध्ये पेठे यांची वैज्ञानिक अधिकारी म्हणून निवड झाली. त्या सुमारास भारतीय शास्त्रज्ञ ‘अप्सरा’ ही अणुभट्टी उभारत होते. कोणत्याही अणुभट्टीच्या सान्निध्यात काम करणाऱ्या लोकांना किरणोत्साराच्या तीव्रतेबाबत सतत माहिती असणे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. ते अचूक मापन करणे व धोकादायक पातळी निर्माण होण्याआधीच तसा संदेश देणे, अशी मापनयंत्रे विकसित करणे हे त्यांचे सुरुवातीचे कार्य होते. त्या विभागाचे नाव ‘हेल्थ फिजिक्स इन्स्ट्रुमेंटेशन’ असे होते. त्याच सुमारास ‘जनरल इलेक्ट्रिक’ या कंपनीतर्फे तारापूर येथे विद्युतनिर्मिती करणारी अणुभट्टी उभारण्यात येत होती. त्यात भारतीय अणुविज्ञान शास्त्रज्ञांचा सहभाग होता. त्यामध्ये वरील प्रकारची विकसित केलेली यंत्रणा पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्विरीत्या बसवण्यात आली. १९६० साली अमेरिकेत व नंतर फ्रान्समध्ये अणुविज्ञानातील भौतिकशास्त्र याचा अभ्यास करण्यासाठी त्यांची निवड झाली. एक वर्ष प्रगत देशात अभ्यास करताना, प्रत्यक्ष प्रयोग करण्याची संधी मिळाल्यामुळे अत्याधुनिक किरणोत्सार मापन पद्धती, भारतात परत आल्यावर येथे रुजू करता आली. किरणोत्सारी समस्थानिक कार्बन १४ व हायडोजन ३ (ट्रिशियम) यांचा वापर करून अणुभौतिक प्रयोग येथे सुरू केले. या समस्थानिकामधून निर्माण होणारे बीटा कण अत्यंत कमी ऊर्जा घेऊन बाहेर येतात. ते लिक्विड सिंथिलेशन काउण्टिंग पद्धतीने अचूक मापन करता येते हे त्यांनी येथील प्रयोगशाळेत रूढ केले. त्याचा महत्त्वाचा उपयोग वैद्यकीय क्षेत्रात आजाराचे निदान करण्यासाठी होतो.
मोठ्या प्रमाणात येणाऱ्या रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यासाठी त्यांनी जलद चालणारी स्वयंचलित यंत्रणा व मापन पद्धती विकसित केली. आता अशी यंत्रणा रुग्णालयामध्ये वापरात आहे हे मोठेच समाजोपयोगी काम आहे. त्यांनी पल्सशेप डिस्क्रिमिनेशनसारखी नावीन्यपूर्ण मापन पद्धती विकसित केली. कर्करोग निदानासाठी व उपचारासाठी भारतीय बनावटीची किरणोत्सार शोधक/मापक यंत्रे (रेडिएशन स्कॅनर्स) त्यांनी यशस्विरीत्या तयार केली. अशा मापन यंत्रणा औद्योगिक संशोधनात उपयोगी पडतात. गामा व न्यूट्रॉन किरणोत्सार मापन हासुद्धा त्यांच्या कामाचा विषय होता. विकिर्ण (स्कॅटर्ड) न्यूट्रॉन मापन तत्त्वावर भूगर्भातील कच्चे तेल शोधणे हे काम, त्यांनी तेल महामंडळासाठी केले. भारतीय अणुवीज केंद्रे, अप्सरा, ध्रुव, सायरस, पौर्णिमा, फास्ट ब्रीडर, झरलिना अशा कित्येक प्रकल्पांमध्ये त्यांचा सहभाग होता. त्या सर्व प्रकल्पांचा गाभा किरणोत्सार मापन हा होता.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे ते सदस्य होते. ‘अणुशक्ती’ या विषयाच्या पुस्तकातील लिखाणात त्यांचा सहभाग होता. १९८६ साली ते भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रातून ‘इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख’ म्हणून निवृत्त झाले. त्यानंतर थडोमल सहानी व कच्छी पॉलिटेक्निक्स महाविद्यालयात अध्यापन करून त्यांनी विद्यार्थिवर्गाला त्यांच्या समृद्ध अनुभवाचा लाभ दिला. अनेक संस्था, उच्चस्तराच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका काढण्यासाठी त्यांना विनंती करीत असत. तसेच अनेक कंपन्या, नोकरीसाठी आलेल्या उमेदवारांतून निवड करण्यासाठी त्यांचा सल्ला घेत असत. ते नेहमीच शांतपणे दुसऱ्यांचे विचार समजून घेत असत. त्यामुळे सर्वांना त्यांच्याविषयी आत्मीयता व आदर असे. ते ‘अणुशास्त्राची ओळख’ हे पुस्तक लिहीत होते; परंतु त्यांच्या आकस्मिक निधनामुळे ते लेखन पूर्णत्वास गेले नाही.