Skip to main content
x

पिंटो, वॉल्टर अ‍ॅन्थनी

WAG पिंटो

       लाशाखेत इंटरपर्यंतचे शिक्षण घेऊन वॉल्टर पिंटो यांनी अलाहाबाद विद्यापीठातून संरक्षणविषयक पदव्युत्तर  (एम.ए. डिफेन्स स्टडीज) शिक्षण घेतले. त्यांना असणारी लष्करी सेवेची आसच त्यांना या क्षेत्रात घेऊन आली. दि.१२ सप्टेंबर १९४३ रोजी त्यांनी सैन्यात प्रवेश घेतला. भूसेनेतील प्रत्यक्ष कार्यात आणि विशेषत: सैन्य प्रशिक्षणात त्यांचे योगदान आहे.

     सैन्याला प्रशिक्षण देण्यापूर्वी त्यांनी स्वत: जानेवारी ते मार्च १९४९ या कालावधीत महू इथे सैनिकी सेवा प्रशिक्षक पदाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर ऑक्टोबर १९५४ ते ऑगस्ट १९५५ दरम्यान वेलिंग्टन इथेही प्रशिक्षणाकरिता  सैनिकी सेवेतल्या स्पर्धा-परीक्षांमधून त्यांची निवड झाली. प्रशिक्षणाचा प्रदीर्घ अनुभव घेतानाच त्यांनी प्रत्यक्ष लष्करी कामातही भाग घेतला. ऑक्टोबर १९५५ ते नोव्हेंबर १९५८ या काळात ते इन्फन्ट्री ब्रिगेडचे ब्रिगेड मेजर (सैनिकी व्यवहार व नियोजन) होते. भूसेनेत पुढच्या पदावर गेल्यावरही त्यांनी महू येथे एप्रिल ते जुलै १९६० दरम्यान ज्येष्ठ अधिकार्‍यांसाठी असलेले प्रशिक्षण घेतले.

     देशाच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या जवानांना तयार करणारे प्रशिक्षक/मार्गदर्शक म्हणून त्यांनी विविध ठिकाणी काम पाहिले. यात दि.२३ डिसेंबर १९६३ ते दि.१० ऑगस्ट १९६५ या कालावधीत वेलिंग्टन इथे लेफ्टनंट कर्नल पदावरून ‘अ’ वर्ग प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केले. एप्रिल १९६७ ते १९६९ या काळात ब्रिगेड कमांडर म्हणूनही त्यांनी काम केले. दि.२६ मे १९६९ ते दि.१४ एप्रिल १९७१ दरम्यान सैन्यात ब्रिगेडियर असताना त्यांनी वेलिंग्टन डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजचे प्रमुख प्रशिक्षकपद निभावले. १९७१पासून डिव्हिजनल कमांडर असताना लेफ्टनंट जनरल पिंटो यांनी भारत-पाक युद्धात मोलाचे योगदान दिले. त्याकरिता त्यांना ‘परमविशिष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले.

     एप्रिल १९७१ ते जानेवारी १९७४ या कालावधीत मेजर जनरल असताना डिव्हिजनल कमांडर, ९जानेवारी १९७४ ते नोव्हेंबर १९७६ दरम्यान सैन्य मुख्यालयात सैनिकी प्रशिक्षणाचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. नोव्हेंबर १९७६ ते जानेवारी १९७९ दरम्यान लेफ्टनंट जनरल असताना कॉर्प्स कमांडर, जानेवारी १९७९ ते दि.३० जून १९८० या काळात त्यांनी दिल्लीत नॅशनल डिफेन्स कॉलेजचे कमांडंट म्हणून काम केले. या पदावर असताना त्यांनी सेनेला तसेच पोलीस दलातल्या अधिकाऱ्यांना  सैनिकी प्रशासन, आंतरराष्ट्रीय संबंध, संरक्षण आणि आर्थिक-सामाजिक बाजू या संदर्भांतील प्रशिक्षण दिले.

     दि.१ जुलै १९८० ते दि.३० जून १९८२ या दरम्यान लेफ्टनंट जनरल असताना भूसेनेच्या मध्य विभागाचे प्रमुख (‘जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ’) अशी पदे पिंटो यांनी भूषवली. १९८०नंतरच्या कालावधीत उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा आणि मध्यप्रदेश ह्या भागांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. राजपूत रेजिमेंटमध्ये दि.२ ऑगस्ट १९७३ ते दि.३० जून १९८२ या काळात ते कर्नलपदी रुजू होते. १९७४ ते १९७६ या काळात पिंटो क्रीडा नियामक मंडळात अध्यक्षपदी होते, तर याच कालावधीत ते भारतीय हॉकी फेडरेशनचे उपाध्यक्ष होते. यावरून त्यांची क्रीडा आणि प्रशासनातली आवडही दिसून येते. अशा ह्या कर्तुत्ववान ऑफिसरचे वृद्धापकाळाने निधन झाले.

- पल्लवी गाडगीळ

पिंटो, वॉल्टर अ‍ॅन्थनी