Skip to main content
x

पितळे, द्वारकानाथ माधव

नाथमाधव

     मराठीतील ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध असलेले नाथमाधव मुंबईचे. त्यांचे शिक्षण मुंबईत झाले. पण शिक्षणापेक्षा त्यांचा ओढा खेळण्याकडे जास्त असल्यामुळे त्यांना मॅट्रिकच्या परीक्षेत यश मिळू शकले नाही. शिक्षणाचा नाद सोडून त्यांनी कुलाबा, मुंबई येथील गन करेज फॅक्टरीमध्ये नोकरी स्वीकारली. ही नोकरी नेमबाजी या त्यांच्या आवडीच्या विषयाची असल्यामुळे नोकरीच्या निमित्ताने यात प्रावीण्य मिळवले. नेमबाजीच्या आवडीमुळे पितळे यांना शिकारीचा नाद लागला. १९०५ साली एकदा शिकारीसाठी सिंहगड परिसरात ते गेले असताना, गडाच्या कड्यावरून पडून ते अपघातग्रस्त झाले व त्यांचा कमरेखालचा भाग लुळा झाला. या घटनेनंतर त्यांना बराच काळ इस्पितळात वास्तव्य करावे लागले. याच काळात त्यांना वाचनाची गोडी लागली व पुढे हळूहळू ते लेखनाकडे वळले. प्रारंभीचे त्यांचे लेखन पुण्याच्या ससून हॉस्पीटलमधील आणि एकूणच त्यांना झालेल्या अपघातासंबंधीचे होते. त्यांचे इंग्रजी चांगले असल्याने, त्याच भाषेत लिहून ते त्यांनी पुण्याच्या ‘डेक्कन हेरॉल्ड’ या वृत्तपत्राकडे पाठविले व ते प्रसिद्धही झाले. पुढे औषधोपचारासाठी त्यांना पनवेल येथे नेण्यात आले. तिथे प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे आणि ‘केरळकोकीळ’चे संपादक कृष्णाजी नारायण आठल्ये या दोन लेखक-पत्रकारांशी त्यांचा संपर्क आला. त्यांच्या प्रेरणेतून पनवेलच्या मुक्कामात त्यांनी कथा-कादंबरीसारख्या ललित लेखनाकडे आपली लेखणी वळवली आणि पुढच्या आयुष्यात मागे वळून न पाहता मराठीतील एक अव्वल दर्जाचे कादंबरीकार म्हणून नाव कमावले.

    ‘केरळकोकीळ’मध्ये त्यांनी ‘विविध’ या सदरातून संतचरित्रमाला, ‘स्वामिशिष्यसंवाद’ असे लेखन केले. काही कथाही त्यांनी लिहिल्या. ‘सायंकाळची करमणूक’ हे त्यांचे पहिले पुस्तक १९०५ साली प्रकाशित झाले. तर ‘प्रेमवेळा’ ही त्यांची पहिली कादंबरी १९०८ साली प्रकाशित झाली. त्यानंतर त्यांनी एकूण ३६ कादंबर्‍या लिहिल्या. पण त्यांतील काही अपूर्ण राहिल्या. त्याशिवाय नाटके, कविता, नाट्यसमीक्षा, चरित्र लेखन, धर्मोपदेशवर लेखन असे साहित्याचे विविध आकृतिबंध त्यांनी यशस्वीपणे हाताळले; तरी एक कादंबरीकार म्हणूनच त्यांची ओळख राहिली. त्यांच्या कादंबर्‍यांत नीति-अनीतीच्या कल्पनांमधून नीतिपरतेला जास्त प्राधान्य देण्याचा प्रयत्न ते करीत. त्यांच्या सामाजिक कादंबर्‍यांपैकी ‘देशमुखवाडी’ (१९१६), ‘डॉक्टर’ भाग १ ते ३ या प्रमुख मानल्या जातात. १९१७ साली लिहिलेल्या ‘विमलेची ग्रहदशा’ या कादंबरीतून एका मुलीला तिच्या मनाविरुद्ध ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागल्याची तत्कालीन सामाजिक परिस्थिती त्यांनी विषद केली. तत्कालीन पद्धतीप्रमाणे त्यांच्या कादंबर्‍या काहीशा अद्भुततेकडे झुकणार्‍या आणि अकल्पिताप्रमाणे असल्याने लोकप्रिय झाल्या. त्यांच्या अद्भुतरम्य कादंबरीत सगळ्यांत जास्त वाचकप्रिय कादंबरी म्हणजे ‘वीरधवल’. ही कादंबरी तत्कालीन प्रसिद्ध इंग्लिश कादंबरीकार रेनॉल्डस यांच्या ‘केनेथ’ या कादंबरीवरून लिहिली असून तसा उल्लेख प्रस्तावनेत केला आहे. ही कादंबरी आकाराने खूप मोठी असून तिच्या आत्तापर्यंत अनेक आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. वीरधवल, ललितप्रभा, चंद्रसेना, दुर्जातमणी, उन्मत्तमणी ही यातील प्रमुख पात्रे आहेत. अनेक अद्भुतरम्य प्रसंग घडून शेवटी वीरधवल व ललितप्रभा यांचे लग्न लागते. त्यांच्या ‘डॉक्टर’ या कादंबरीवरून पुढे ‘शिकलेली बायको’ हा मराठी चित्रपट काढण्यात आला होता आणि तोही खूप लोकप्रिय ठरला. एकूणच सामाजिक कादंबर्‍यांमधून त्यांनी तत्कालीन प्रश्न, प्रथा यांचे प्रभावी दर्शन घडविल, त्यामुळे त्या लोकप्रिय ठरल्या.

      स्वतःच्या नावातील नाथ आणि वडिलांचे नाव माधव यातून त्यांनी ‘नाथमाधव’ या टोपणनावाने बहुतेक लेखन केले. त्यांच्या काही ऐतिहासिक कादंबर्‍या वाईहून प्रसिद्ध होणार्‍या नरहर नारायण पटवर्धन यांच्या कादंबरीला वाहिलेल्या ‘मकरंद’ या मासिकमालेतून प्रसिद्ध झाल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील छत्तीस कादंबर्‍यांच्या माध्यमातून संपूर्ण शिवकाल उभा करण्याचा त्यांचा संकल्प होता; पण त्यांच्याकडून दुर्दैवाने सातच कादंबर्‍या लिहिल्या गेल्या. ‘श्रीशिवाजी महाराजांचे आरमार अथवा सावळ्या तांडेल’ (१९०९) ही त्यांची या मालिकेतील पहिली कादंबरी. आरमाराचे खरे रक्षणकर्ते तांडेल, त्यांच्या पराक्रमाची ही गाथा लोकप्रिय ठरली; त्याचे कारण एकदम वेगळा विषय. पुढे स्वराज्याच्या संकल्पनेवर ‘स्वराज्याचा श्रीगणेशा’ (१९२१), ‘स्वराज्याची स्थापना’ (१९२२), ‘स्वराज्याचा घटना’, (१९२३), ‘स्वराज्याचा कारभार’ (१९२३), ‘स्वराज्यावरील संकट’ (१९२३), ‘स्वराज्याचे परिवर्तन’ (१९२५), ‘स्वराज्यातील दुफळी’ (१९२८) या कादंबर्‍या त्यांनी लिहिल्या. या कादंबर्‍यांच्या माध्यमातून लोकांना इतिहासाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला. अपंग असूनही त्यांनी भटकंती करून ऐतिहासिक ठिकाणे पाहूनच ऐतिहासिक कादंबर्‍या लिहिल्या. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वराज्याविषयी निष्ठा जागविण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी अपंगावस्थेत अवघ्या ४६ वर्षांच्या आयुष्यात केले.

    - मधू नेने

पितळे, द्वारकानाथ माधव