Skip to main content
x

पळणीटकर, विश्वनाथ महादेव

           प्रतिभा अ‍ॅड्व्हर्टायझिंग या जाहिरातसंस्थेचे एक संस्थापक आणि जाहिरातकलेतील तज्ज्ञ विश्वनाथ महादेव पळणीटकर यांचा जन्म  कोल्हापूर येथे झाला. त्यांच्या आई वेणूताई व वडील महादेव गोविंद पळणीटकर यांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नाही. आर्थिक अडचणींमुळे त्यांचे लहानपण त्यांच्या आजोळी, गोगटे आजी-आजोबा यांच्याकडे, नाशिक येथे गेले. त्यांचा वारसा विश्वनाथ पळणीटकर यांना लाभला.

           चित्रकला व रांगोळी यांचे संस्कार त्यांच्यावर लहानपणीच झाले होते. त्यांची माध्यमिक शिक्षणाची महत्त्वाची संस्कारक्षम वर्षे मध्यप्रदेशात ग्वाल्हेर येथे त्यांच्या मावशी कुंटे यांच्या सान्निध्यात गेली. या काळामध्ये त्यांच्यातील चित्रकलेची मनस्वी आवड व त्यातील नैपुण्य ग्वाल्हेरच्या चित्रकला शिक्षकांनी हेरले होते. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, त्यांच्याच प्रोत्साहनामुळे पळणीटकरांनी मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये ‘कमर्शिअल आर्ट’च्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. अर्धवेळ नोकरी करून त्यांना आपले जाहिरातकलेचे शिक्षण पूर्ण करावे लागले. या काळात त्यांचे मित्र द.ल. गर्गे यांचा सहवास त्यांना लाभला.

           कमर्शिअल आर्टचा अभ्यासक्रम पूर्ण करून हे दोघेही मित्र नाशिकला परत आले. आपली स्वतःची अ‍ॅड्व्हर्टायझिंग एजन्सी असावी, हे दोघांचेही स्वप्न होते. ते १९५० साली प्रत्यक्षात आले. विश्वनाथ पळणीटकर आणि द.ल. गर्गे यांच्या अ‍ॅड्व्हर्टायझिंग एजन्सीचे नाव कवी वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांनी सुचविले. ‘प्रतिभा’ हे नामकरण ‘प्रतिभा अ‍ॅड्व्हर्टायझिंग’च्या प्रगतीमध्ये सूचक व मार्गदर्शक ठरले.

           ‘प्रतिभा’मध्ये नाशिक व पुण्या-मुंबईकडील कामे अधिक होती. त्यामुळे प्रतिभाचे लवकरच पुण्यात स्थलांतर झाले. त्या काळात मुंबईतही जे वॉल्टर थॉम्प्सन, लिंटास, आर.के. स्वामी, दत्ताराम यांसारख्या मोजक्या अ‍ॅड एजन्सीज होत्या, त्यांत ‘प्रतिभा’नेही उत्तम कामातून आपले अस्तित्व दाखविण्यास सुरुवात केली. पुण्यात त्या काळात ‘टॉम अ‍ॅण्ड बे’ ही तांबे यांची अ‍ॅड एजन्सी नावारूपाला आली होती. ‘प्रभानाथ’सारख्या छोट्या अ‍ॅड एजन्सीजही होत्या. पण राष्ट्रीय पातळीवरील मोठे-मोठे अकाउण्ट्स मिळवून त्यांना कल्पक व दर्जेदार जाहिरात सेवा पुरविण्यात ‘प्रतिभा’ सातत्याने अग्रेसर राहिली. यामध्ये पळणीटकरांचा वाटा फार मोठा होता.

           प्रेमाने आणि आदराने सर्वजण त्यांना ‘दादा’ म्हणून संबोधित असत. त्यांची दूरदृष्टी आणि विचार काळाच्या पुढे होते. उद्योग-व्यवसाय-सेवा हे विपणनानुसार बेतले पाहिजेत. विपणन जाहिरातसन्मुख असायला हवे व जाहिरात ग्रहकसापेक्ष असायला हवी, असा त्यांचा त्या काळातही पुरोगामी विचार होता. या दृष्टिकोनातून विविध ग्रहकांसाठी त्यांनी स्वतः केलेले प्रकल्प अहवाल (प्रॉजेक्ट रिपोर्ट्स) आजही पथदर्शक ठरू शकतील. प्रत्येक कामात दादांचे वैयक्तिक आणि क्रियाशील लक्ष असायचे.

           पुढे १९६० ते १९७० च्या दशकात ‘प्रतिभा’ भरभराटीला आली. एका वटवृक्षाप्रमाणे ती अनेक शाखांमध्ये विस्तारली. पुणे, मुंबई, दिल्ली, बंगलोर (बंगळुरू), बडोदा (वडोदरा) या सर्व शाखा उत्तम तर्‍हेने विविध कंपन्यांसाठी जाहिरातीच्या यशस्वी मोहिमा कार्यान्वित करू लागल्या. किर्लोस्कर कमिन्स, किर्लोस्कर ब्रदर्स, किर्लोस्कर न्युमॅटिक्स, किर्लोस्कर इलेक्ट्रिक, कॅमलिन लिमिटेड, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, साठे बिस्किट्स, स्वस्तिक रबर प्रॉडक्ट्स, गरवारे नायलॉन्स, लक्ष्मी-विष्णू मिल्स, म्हैसूर सॅण्डल सोप्स, म्हैसूर आयर्न अ‍ॅण्ड स्टील, परशुराम पॉटरीज यांसारख्या नामवंत कंपन्यांची मोठी- मोठी खाती त्यांनी जातीने लक्ष घालून मिळवली. आपले भागीदार मित्र द.ल. गर्गे, नंदा नारळकर यांच्या सहकार्याने जोपासली, वाढवली. त्यांनी ‘प्रतिभा’ला एका उंचीवर नेऊन ठेवले!

           पळणीटकर हे उद्योजकापेक्षाही अधिक संवेदनशील चित्रकार होते. निसर्गचित्रण हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. आपल्या कार्यव्यस्त जीवनामध्ये, रविवार व सुटीचा दिवस त्यांनी कायम निसर्गचित्रणासाठीच राखून ठेवलेला असायचा. आपल्या स्वतःच्या गाडीतून सर्व चित्रकारांना ते सोबत घेऊन जायचे व निसर्गचित्रणासाठी प्रोत्साहित करायचे.

           रंगांचा ताजेपणा, वातावरणनिर्मिती, उत्कृष्ट रेखांकनकौशल्य आणि मुख्य म्हणजे सर्व बारकावे व सौंदर्यस्थळे शोधून त्यांचे तपशीलवार चित्रण करणे ही त्यांच्या कामाची खासियत होती. त्यांच्या चित्रकृतींचा संग्रह त्यांची कन्या, संध्या राजेशिर्के यांच्याकडे जपून ठेवलेला आहे.

           प्रतिभा अ‍ॅड्व्हर्टायझिंग १९७० ते १९७२ या काळात फार मोठ्या आर्थिक संकटात आली. त्या वेळी किर्लोस्कर उद्योगसमूहाने ती पुढे सुरू ठेवली. त्यांच्या जीवनात उद्योजक-व्यावसायिक या भूमिकेइतकेच ते एक संवेदनशील चित्रकार व त्यापेक्षाही अधिक एक सुहृद, प्रेमळ मित्र म्हणूनही श्रेष्ठ होते. ‘प्रतिभा’तील आपल्या कर्मचारी, आर्टिस्ट्स, अधिकारी यांच्यावर त्यांनी पुत्रवत प्रेम केले. त्यांनी उत्तमोत्तम माणसे जोडली.

           मुंबईबाहेर पुणे, नाशिक अशा ठिकाणी शासकीय धोरणांमुळे १९६० च्या दशकात नवे उद्योग व्यवसाय सुरू झाले. अशा उद्योगांना पूरक अशा जाहिरातसंस्थांची गरज होती. ती ‘प्रतिभा अ‍ॅड्व्हर्टायझिंग’ने पूर्ण केली. एवढेच नव्हे, तर मोठ्या जाहिरातसंस्थांच्या स्पर्धेत तिने स्वतःचे स्थान निर्माण केले. मराठी माणूस म्हणून पळणीटकरांनी जाहिरात क्षेत्रात केलेल्या या कार्याला एक वेगळे महत्त्व आहे.

           - मिलिंद फडके

पळणीटकर, विश्वनाथ महादेव