Skip to main content
x

पंडित, आनंद रामदास

     नंद रामदास पंडित यांचा जन्म इंदूर येथे झाला. ते १९४१मध्ये भारतीय वायुसेनेत दाखल झाले. लाहोर येथे इनिशिअल ट्रेनिंग स्कूलमधील प्राथमिक प्रशिक्षण घेतल्यानंतर, जोधपूर येथे त्यांनी टायगरमॉथ विमानावरील आठव्या वैमानिक अभ्यासक्रमाला सुरुवात केली. त्यांनी अंबाला येथे ऑडंक्स आणि हार्ट या प्रकारच्या विमानांच्या उड्डाणांचे प्रशिक्षण घेतले. त्यांना फेब्रुवारी १९४२मध्ये नियमित उड्डाणे करायची परवानगी मिळाली.

     कराची, रिसालपूर, मिशनशाह (वायव्य सरहद्द प्रांत), नौशेरा येथे वायुसेनेच्या कवायतींमध्ये पंडित यांनी १९४३मध्ये भाग घेतला. मिशनशाहची मोहीम विशेष महत्त्वाची होती; कारण या मोहिमेत त्यांनी पठाण टोळीवाल्यांविरुद्ध नाना प्रकारे चढाई केली.

     १९ तासांची लढाऊ उड्डाणे केल्यानंतर आनंद पंडित यांच्या विमानाचे इंजीन निकामी होऊन अपघात झाला. या अपघातात झालेल्या जखमांमुळे ते त्यांच्या नं. १ स्क्वॉड्रनबरोबर लगेच ब्रह्मदेशात जाऊ शकले नाहीत. परंतु मार्च १९४४मध्ये ते इम्फाळ येथे पुन्हा कामावर रुजू झाले. ब्रह्मदेशातील जपानी आक्रमकांविरुद्ध झालेल्या चढाईत त्यांनी जी हवाई छायाचित्रे काढली, ती सैन्याला उपयोगी पडली. त्या अतुलनीय शार्यासाठी त्यांना ‘डिस्टिंग्विश्ड फ्लाइंग क्रॉस’ २१ जानेवारी १९४५ रोजी प्रदान करण्यात आला.

     महायुद्धानंतरच्या काळात त्यांनी क्र.१ व क्र.३ या स्क्वॉड्रनचे कमांड, जम्मू आणि श्रीनगरमधील क्र.१ ऑपरेशनल विंगचे कमांड सांभाळले, तसेच पाकिस्तानमध्ये एअर अ‍ॅटेचे या पदावर काम केले. १९५१ मध्ये त्यांनी वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्येही अध्यापन केले. त्यानंतर ते जेट ट्रेनिंग विंगचे प्रमुख झाले. १९६५ च्या भारत-पाक युद्धात ते एअर कमोडोर या हुद्द्यावर होते. वायुसेनेच्या मुख्यालयात ईस्टर्न एअर कमांडचे ते सीनियर एअर स्टाफ ऑफिसर होते. या युद्धातील त्यांच्या कामासाठी त्यांना ‘अतिविशिष्ट सेवा पदक’ मिळाले.

     १९७१ मध्ये भारत-पाक युद्धामध्ये ते एअर व्हाइस मार्शल या पदावर ‘एअर ऑफिसर कमांडिंग- मॅरिटाइम एअर ऑपरेशन्स’ म्हणून मुंबईत होते. नौसेनेच्या पश्चिम विभागासह केलेल्या संयुक्त कारवाईत त्यांच्या पथकाने पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला केला.

     यानंतर अशीच उच्च पदे भूषवत अखेर ते वायुसेनेच्या मुख्यालयामध्ये ‘व्हाइस चीफ ऑफ एअर स्टाफ’ या पदापर्यंत पोहोचले. त्यांच्या या पदाच्या कारकिर्दीतील उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना ‘परमविशिष्ट सेवा पदक’ मिळाले. ते ३१ मार्च  १९७७ रोजी सेवानिवृत्त झाले. आपल्या ३६ वर्षांच्या सेवेमध्ये त्यांनी २३ प्रकारच्या  विमानांवर एकंदर ३८०० तासांचे उड्डाण केले.

    - अविनाश पंडित

पंडित, आनंद रामदास