Skip to main content
x

पंडित, गणपती विष्णू

ज्येष्ठ न्यायविद आणि कायद्याचे प्राध्यापक गणपती विष्णू पंडित यांचा जन्म खानदेशात झाला. त्यांचे घराणे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील अडिवरे येथील. त्यांच्याकडे तेथील कुलकर्ण्यांचे वतन होते. त्यांचे वडील विष्णुपंत पंडित हे पोलीस अधिकारी होते. फैजपूर येथे त्यांची नेमणूक असताना तेथे झालेल्या दंग्यात त्यांनी मोठ्या धैर्याने गुंडांना पळवून लावले होते. मात्र त्यांच्या शौर्याचे कौतुक होण्याऐवजी त्यांच्यावरच ठपका ठेवण्यात आला. नंतर त्या  संबंधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात केलेल्या अपिलात त्यांची निर्दोष मुक्तता झाली. विशेष म्हणजे त्या अपिलाचा मसुदा त्यावेळी इंग्रजी पाचवीत असलेल्या गणपती यानेच तयार केला होता. गणपती पंडित यांचे शालेय शिक्षण पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आणि महाविद्यालयीन शिक्षण फर्गसन महाविद्यालयात झाले. १९२९साली गणपती मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे सर्व भावंडांना आपले पुढचे शिक्षण स्वत:च्या हिमतीवर करावे लागले. पेशवाईच्या काळात पंडित कुटुंबाला पुण्यात नारायण पेठेत नदीकाठाजवळ जमीन मिळालेली होती. त्या जागेवर पंडित कुटुंबियांचे घर प्रा.पंडित आणि त्यांचे थोरले बंधू शंकर पंडित यांनी उभे केले.

पंडित यांनी इंग्रजी व संस्कृत हे विषय घेऊन बी.ए. व एम.ए. या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या. त्यानंतर दोन वर्षे त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात इंग्रजीचे ट्यूटरम्हणून काम केले. याच सुमारास कायद्याच्या अभ्यासक्रमात काही बदल होऊन तेथे पहिल्या वर्षासाठी इंग्रजी विषय आवश्यक झाला. पंडित यांनी पुण्याच्या लॉ कॉलेजचे (आजचे आय.एल.एस. विधि महाविद्यालय) संस्थापक व प्राचार्य ज.र.घारपुरे यांची भेट घेतली आणि त्यांना त्या महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून नेमणूक मिळाली. मात्र तेथे दाखल झाल्यावर प्राचार्य घारपुरे यांनी त्यांना कायद्याच्या अभ्यासासाठी त्याच वर्गात विद्यार्थी म्हणून बसण्यास सांगितले. त्यामुळे इंग्रजीचा तास घेऊन झाला की कायद्यातील विषयांच्या तासांसाठी ते समोर आपल्याच विद्यार्थ्यांमध्ये जाऊन बसत. यावेळी त्यांच्या बाकावर बसणारे त्यांचे सहाध्यायी य.वि.चंद्रचूड हे पुढे भारताचे सरन्यायाधीश आणि इंडियन लॉ सोसायटीचे अध्यक्ष झाले.

पंडित यांचे नाव फर्ग्युसन महाविद्यालयापासूनच इंग्रजीचे उत्तम शिक्षक म्हणून सर्वतोमुखी झाले होते. विधि महाविद्यालयामधून त्यांनी एलएल.बी. केले आणि नंतर १९४५मध्ये एलएल.एम ची परीक्षाही ते पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. तोपर्यंत मुंबई विद्यापीठात हा मान मिळविणारे ते केवळ दुसरे विद्यार्थी होते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर इंग्रजीबरोबरच कायद्याचे शिक्षक म्हणूनही काम करणे क्रमप्राप्त होते. त्यांना स्वत:ला त्याबाबत थोडी शंका होती. परंतु लवकरच न्यायशास्त्र (ज्युरिस्प्रुडन्स) आणि हिंदू कायदा, रोमन कायदा आणि खाजगी आंतरराष्ट्रीय कायदा या विषयांचे नामांकित प्राध्यापक म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला. पुण्याच्या विधि महाविद्यालयाचे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर बाहेरही मोठे होण्यात प्रा.पंडितांच्या या कामगिरीचा मोठा वाटा होता. त्यामुळे महाविद्यालयामध्ये केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे, तर भारताच्या सर्व भागांतून विद्यार्थी येऊ लागले. न्यायशास्त्र  हा विषय पंडित इतक्या परिणामकारक रीतीने शिकवीत की, त्याचा प्रभाव पुढे आपल्या संपूर्ण कारकिर्दीवर राहिल्याचे त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी नमूद केले आहे.

विधि महाविद्यालयाच्या वाढत्या ख्यातीमुळे तेथे एक कला महाविद्यालयही सुरू करावे असे प्रा.घारपुरे यांच्या मनात आले. विधि महाविद्यालयाची मूळ इमारत व वसतिगृह आधीच भव्य व निसर्गसुंदर परिसरात होते. मागील डोंगरावर मोठी जागा उपलब्ध होती. तेव्हा नव्या महाविद्यालयासाठी एक दिमाखदार वास्तू उभी करण्याचा संकल्प घारपुरे यांनी केला व त्यासाठी बरेच मोठे कर्ज काढले. ते १९५०मध्ये वयोमानापरत्वे निवृत्त झाले आणि प्राचार्यपदाचा मुकुट त्यांनी ग.वि.पंडितांच्या शिरावर ठेवला.

मात्र हा मुकुट काटेरी असल्याचे लवकरच प्रा.पंडितांच्या लक्षात येऊ लागले. कारण नवीन महाविद्यालयाचा प्रयोग म्हणावा तसा यशस्वी झाला नाही आणि एक वर्षातच ते महाविद्यालय बंद करावे लागले. कर्जाचा मोठा डोंगर शिरावर घेऊन प्राचार्य पंडित यांना आपली पुढची वाटचाल करावयाची होती. विधि महाविद्यालयाला सरकारी अनुदान मिळत नसे. देणेकरी तर कायम दाराशी येऊन उभे राहत. त्यामुळे अशी वेळ येऊन ठेपली की, महाविद्यालयाची मालमत्ता गहाण ठेवून कर्जफेड करण्याचा प्रस्ताव आला. पण याच मालमत्तेचा मोठ्या चातुर्याने उपयोग करून, आयुर्विमा महामंडळ या संपन्न संस्थेची जागेची गरज भागवून पंडितांनी उत्पन्नाचा मार्ग शोधला. हळूहळू कर्ज फिटू लागले. मात्र त्यांची स्वत:ची प्राचार्यपदाची वर्षे यातच गेली आणि संस्थेकरिता काही नव्या योजना करणे त्यांना शक्यच झाले नाही. उत्तम विद्यार्थी तयार करणे ही मात्र त्यांची महनीय कामगिरी होती. महाविद्यालयात शेकड्यांनी विद्यार्थी असले तरी अक्षरश: प्रत्येकाकडे त्यांचे जातीने लक्ष असे आणि त्याची संपूर्ण माहिती घेऊन ते त्याला उत्तम मार्गदर्शन करीत असत.

१९७१मध्ये प्राचार्यपदावरून निवृत्त झाल्यानंतरही पंडित प्राध्यापक म्हणून काम करीत असत. त्याशिवाय ते इंडियन लॉ सोसायटीचे सचिवही होते. या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या होत्या. संस्थेला अडचणीच्या काळातून बाहेर काढून त्यांनी ती सुदृढ स्वरूपात प्रथम प्रा. रानडे व नंतर प्रा.डॉ.साठे यांच्या हवाली केली आणि त्या दोघांनाही उत्तम मार्गदर्शन केले.

- सविता भावे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].