Skip to main content
x

पंधे, मुकुंद श्रीकृष्ण

पंधे गुरुजी

          खामगावासारख्या ग्रमीण भागात, टिळक राष्ट्रीय विद्यालयात खादीधारी व व्रतस्थ जीवन जगत, स्वतःच्या कलानिर्मितीसोबतच ग्रमीण भागातल्या शेतमजुरांच्या मुलांमध्ये, कोणतीही जात-पात न मानता स्वावलंबन व शारीरिक परिश्रमावर आधारित ग्रमोद्योगी चित्र-शिल्पशाळा चालवून कलाजाणिवा विकसित करणारे प्रसिध्दीपराङ्मुख कलावंत म्हणून पंधे गुरुजी आयुष्यभर कार्यरत होते.

          मुकुंद श्रीकृष्ण पंधे यांचा जन्म मध्यप्रदेशात, होशंगाबाद जिल्ह्यातील नर्मदाकाठच्या नरसिंगपूर येथे झाला. त्यांचे वडील शिक्षणखात्यात नोकरी करीत व आई यमुनाबाई गृहिणीकर्तव्य बजावत. त्यांचे प्राथमिक शिक्षण होशंगाबाद येथे झाले व माध्यमिक आणि महाविद्यालयीन कलाशिक्षण नागपूर येथे झाले. ते  १९२० मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टची थर्ड ग्रेड परीक्षा उत्तीर्ण झाले; पण कलासाधनेपेक्षा तरुणवयात त्यांना त्या काळी लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या पहिल्या असहकार आंदोलनाचे आकर्षण वाटू लागले.

          त्यांनी १९२१ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडून स्वातंत्र्यसंग्रमात प्रवेश केला. तत्पूर्वी त्यांनी रामटेकच्या मंदिरात स्वतःच्या रक्ताने तशी प्रतिज्ञा लिहिली व नागपूरच्या झेंडा सत्याग्रहात जनरल मंचरशा आवारी यांच्या नेतृत्वाखाली भाग घेऊन तुरुंगवासाची शिक्षा भोगली. त्यांनी १९२३ मध्ये कलाभ्यासासाठी इटलीला जाण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे पासपोर्ट व पैसे नसल्यामुळे बोटीच्या कप्तानाने नकार दिला; परंतु बोटीवरील इटालियन धर्मगुरूने धर्मांतर केल्यास इटलीस नेण्याची व उच्च शिक्षणाची हमी दिली; पण १९१७ मध्ये लोकमान्य टिळकांच्या समक्ष देश, धर्म व स्वदेशी व्रताची शपथ घेतली असल्यामुळे हा प्रस्ताव पंधे गुरुजींनी नाकारला. त्यानंतर त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथे प्रवेशाचा प्रयत्न केला; पण त्या काळातील इंग्रज प्राचार्यांनी या तुरुंगवास भोगलेल्या तरुणाला अपमानास्पद वागणूक देऊन प्रवेश नाकारला. त्यानंतर पंधे गुरुजी नागपूरला परतले व १९२४ मध्ये स्वातंत्र्यसंग्रमातील सहकारी मित्रांच्या सूचनेप्रमाणे खामगाव येथील टिळक राष्ट्रीय विद्यालयात शिक्षकाचे काम करू लागले. यातून कलासाधना व स्वातंत्र्याच्या चळवळीशी सुसंगत असे काम करता येईल असा त्यांचा विश्‍वास होता व त्यानुसार ते आयुष्यभर जगले.

          भारतीय परंपरेप्रमाणे प्रत्येक कलावंताचा गायन, वादन, नृत्य, नाट्य, चित्र, शिल्प, काव्य या सप्त- कलांचा अभ्यास असला पाहिजे, अशी त्यांची श्रद्धा होती. सेनापती बापटांचा मुळशी सत्याग्रह व १९३०, ३२, ४०, ४२ या वर्षी झालेल्या विविध सत्याग्रहांत सातत्याने भाग घेऊन त्यांनी अंदाजे ७ ते ८ वर्षे तुरुंगवास भोगला. तुरुंगात किंवा स्वातंत्र्य चळवळीत ते मग्न नसत तेव्हा सुट्टीत मुंबईस येऊन, कलावंतांशी संपर्क साधून ते मूर्तिकलेचा अभ्यास करीत. औंधच्या महाराजांनी अजंठ्याच्या चित्रांच्या प्रतिकृती करण्याचा प्रकल्प हाती घेतला, त्यातही ते सहभागी झाले.

          काँग्रेस अधिवेशनातील सहभागामुळे शांतिनिकेतनचे नंदलाल बोस यांच्याशी पंधे गुरुजींचा दृढ परिचय झाला. त्यातून रवींद्रनाथ टागोरांचे कलाविषयक विचार त्यांना ऐकता आले. त्यामुळे त्यांना रवींद्रनाथ टागोरांबद्दलचे आकर्षण निर्माण झाले. पुढील आयुष्यात टागोर यांची कलाविषयक दृष्टी व महात्मा गांधींचा साधेपणा व साधनशुचितेची जीवनपद्धती स्वीकारून त्याप्रमाणे जगण्याचा त्यांनी निर्णय घेतला. कलेच्या अभ्यासाकडे ते एक उपासना म्हणून बघत. याच काळात त्यांचे लक्ष भारतीय शिल्पांकडे वळले व त्यातून भारतातील प्राचीन व मध्ययुगीन शिल्पांच्या अभ्यासासाठी अजंठ्यापासून ते कन्याकुमारीपर्यंत त्यांनी प्रवास व रेखाटने केली. बंगलोर येथील ग्रंथालयात त्यांनी द्रविड वास्तुशिल्पांचा अभ्यास केला. सिलोन येथे जाऊन कँडी व अनुराधापूर येथील बौद्धकालीन शिल्पेही त्यांनी अभ्यासली, तसेच राजस्थान व माउण्ट अबू येथेदेखील शिल्पकलेचा अभ्यास करण्यासाठी प्रवास केला. अशा प्रकारे भारतीय शिल्पशास्त्र अभ्यासण्यासाठी आयुष्याची ५० वर्षे शिक्षकाची जबाबदारी सांभाळून ते फिरत राहिले.

          पण खामगावच्या टिळक राष्ट्रीय विद्यालयाचे आवार हेच त्यांचे कार्यस्थळ व तेथील विद्यार्थी हेच त्यांचे प्रमुख लक्ष्य होते. भारतीय समाजाची पुतळ्यांची किंवा स्मारकांची भावनिक गरज लक्षात घेऊन खेड्यापाड्यांत व मागासलेल्या भागांतही माफक किंमतीत पुतळे करून देण्यास त्यांनी सुरुवात केली व अनेक विद्यार्थ्यांनाही चरितार्थासाठी या व्यवसायाकडे वळण्यास उद्युक्त केले.   

          महात्मा गांधींचे निष्ठावान कार्यकर्ते व तपोवन या कुष्ठरोगनिवारण केंद्राचे डॉ.शिवाजीराव पटवर्धन यांच्यासाठी त्यांनी धनुर्धारी श्रीरामाचे पूर्णाकृती शिल्प  तयार केले. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, गांधीजी, सुभाषचंद्र बोस, साने गुरुजी अशी अनेक शिल्पे पंधे गुरुजींच्या कलानैपुण्याची साक्ष देतात. ब्रॉन्झमधील पूर्णाकृती पुतळे, ५५ अर्धपुतळे व गुजरात राज्यासाठी स्व. वल्लभभाई पटेलांच्या जन्मशताब्दीनिमित्त ब्रॉन्झच्या ५० पुतळ्यांची निर्मिती आणि खामगाव नगरपालिकेसाठी बारा फूट उंचीची नटराजाची मूर्ती अशी त्यांची शिल्पसंपदा आहे.

          नटराज गार्डनच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी पंधे गुरुजींना रु. २५,०००/- ची देणगी दिली. त्यातून ब्रॉन्झ कास्टिंगची फाउण्ड्री व नाट्यगृह या वास्तू विद्यार्थी व शिक्षकांच्या श्रमदानातून लोकमान्य टिळक राष्ट्रीय शाळेत उभ्या राहिल्या. याशिवाय खामगावापासून चार कि.मी. अंतरावर गरडगाव येथे बुद्धविहार तयार केले व शाळेच्या आवारात श्रमदानातून ‘कलाभवन’ उभारले. विद्यार्थ्यांसाठी तो प्रशिक्षण व कामाचा प्रत्यक्ष अनुभवच होता.

          विधायक व रचनात्मक कार्याला जीवन अर्पण केलेल्या पंधे गुरुजींनी जीवनातील ६९ वर्षे संस्थेसाठी दिली. शिल्पकामातून मिळणारा सर्व पैसा ते विद्यार्थ्यांच्या भोजनावर व शैक्षणिक विकासावर खर्च करीत. टिळक राष्ट्रीय विद्यालय व खामगाव ललित कला प्रबोधिनीचे संचालक म्हणून ते कार्यरत होते. त्यांचे वास्तव्य शाळेच्याच आवारात १०×१० फुटांच्या एकाच खोलीत असे. आयुष्यभर ते अविवाहित राहिले.

          मधुकरराव चौधरींनी झोडग्याला संस्थेसाठी शंभर एकर जमीन दिली. त्या जमिनीत गोरगरीब विद्यार्थ्यांना संस्थेच्या शेतात काम करून, धान्य व भाजीपाला पिकवून, स्वतः कमवून शिक्षण घेण्याची व्यवस्था होती. त्यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांवर आपल्या मायेची पाखर घातली व पुत्रवत प्रेम केले, त्यामुळे सर्व मुले त्यांना ‘बाबा’ म्हणत. तत्त्व म्हणून त्यांनी अत्यंत अडचणीच्या परिस्थितीतही शासकीय अनुदान घेतले नाही. स्वातंत्र्य सैनिकांसाठी मिळालेले निवृत्तीवेतनही ‘देशसेवा मी पैशासाठी केली नाही’ हे सांगून परत पाठविले.

          त्यांच्या कार्यकाळात टिळक राष्ट्रीय शाळेला महात्मा गांधी, विनोबा भावे, जयप्रकाश नारायण, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, साने गुरुजी अशा मान्यवरांनी व अनेक कलावंतांनी भेट दिली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मध्यप्रदेश सरकारतर्फे त्यांची दिल्लीच्या फाइन आर्ट अकॅडमीवर प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य रौप्य महोत्सवी कला प्रदर्शनात (१९८४-८५) पंधे गुरुजींचा महाराष्ट्र शासनातर्फे गौरव करण्यात आला.

          वयाच्या नव्वदाव्या वर्षी त्यांचे निधन झाले. ते अविवाहित होते. त्यावेळी खादीचे धोतर, सदरा, टोपी, भोजनाचे ताट-वाटी व तांब्याचा लोटा एवढीच संपत्ती त्यांच्या नावावर होती. पंधे गुरुजींचे काम कलात्मकदृष्ट्या उच्च दर्जाचे नसेलही; पण स्वावलंबी राष्ट्रीय विचारांसोबतच कलेचे जे संस्कार त्यांनी अनेकांवर केले, ते त्यांचे कार्य मोलाचे आहे. पंधे गुरुजींच्या प्रेरणेतून शिल्पकार झालेले अनेक जण गुजरात, विदर्भ, मराठवाडा, खानदेश व मध्यप्रदेशात कार्यरत आहेत.

- प्रा. सुनील देशपांडे

पंधे, मुकुंद श्रीकृष्ण