Skip to main content
x

पोतदार, दत्तो वामन

     पुण्याचा चालता-बोलता ज्ञानकोश म्हणजे दत्तो वामन पोतदार. त्यांचा जन्म रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यात बिरवाडी येथे झाला. त्यांचे मूळ आडनाव ओर्पे’. त्यांच्या पाठीवर चार भाऊ, तीन बहिणी जन्माला आल्या. दत्तोपंतांचे प्राथमिक शिक्षण महाडला झाले. १९०६ साली पुण्यात वास्तव्याला आल्यावर नूतन मराठी विद्यालयामधून ते मॅट्रीक उत्तीर्ण झाले आणि १९१० साली फर्ग्युसन महाविद्यालयातून इतिहासविषय घेऊन बी.ए. झाले. याच वर्षी ७ जुलैला भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना झाली. इतिहासाचार्य राजवाडे आणि खं. चि. मेहेंदळे यांच्या आग्रहावरून दत्तोपंत मंडळाकडे आकर्षिले गेले. १९१३ साली मंडळाचे सदस्य आणि १९१५ साली सहचिटणीस झाले. त्यांनी एलएल.बी.साठी नाव नोंदविले. ते पुणे मराठी ग्रंथालयाचे संस्थापक सदस्य बनले. १९१२ साली शिक्षण प्रसारक मंडळात अर्धवेळ शिक्षक आणि पुढे आजीव सदस्य झाले. १९१५-१९१८ या काळात पुण्यातील प्रसिद्ध वसंत व्याख्यानमालेचे चिटणीस झाले व १९१६-१९२५ या काळात नूतन मराठी विद्यालयाचे मुख्याध्यापक झाले. १९३८-१९४६ या काळात त्यांनी राष्ट्रभाषा वर्धा समितीचे काम केले. १९४५ सालापासून पुढे चाळीस वर्षे ते महाराष्ट्र राष्ट्रभाषा समितीचे अध्यक्ष होते. १९३१ साली न्यू पूना कॉलेजचे (सध्याचे स. प. महाविद्यालय) प्राध्यापक बनले. तसेच मीमांसा विद्यालयाचे अध्यक्ष बनले.

     इतिहास हा दादांचा आवडीचा विषय आणि भारत इतिहास मंडळ म्हणजे प्राचीन साधनांची खाण, दादांच्या संशोधनाला आव्हान, नवनवीन पुरावे शोधून सिद्धान्त मांडायला अवसर, हाती खात्रीशीर पुरावा असल्यावर दादा कोणत्याही दबावाला बळी न पडता, जे सत्य ते लोकांसमोर स्वच्छपणे मांडत. १९३२ साली कोल्हापूरला झालेल्या साहित्य संमेलनात त्यांनी इतिहासविभागाचे अध्यक्षपद सांभाळले.

     १९३३-१९३६ या काळात महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे ते संपादक बनले तसेच मध्यभारत (उज्जैन) मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तर बडोदा संमेलनाचे इतिहास विभागाचे अध्यक्ष बनले. १९३५ साली पोतदारांच्या इतिहास संशोधनाला वाव मिळाला. अखिल भारतीय इतिहास परिषदेची स्थापना झाली आणि पुण्याच्या पहिल्या अधिवेशनाचे ते सरचिटणीस झाले. इतिहास परिषदेत सर्वोच्च मान असलेल्या दिल्लीच्या अखिल भारतीय इतिहास परिषदेवर १९४८ साली त्यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली.

     १९३९ साली अहमदनगरच्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याचा मान त्यांना लाभला. याच अध्यक्षपदावरून महाराष्ट्र विद्यापीठाची, मराठी कारभार चालवणार्‍या विद्यापीठाची त्यांनी मागणी केली. त्यातूनच पुढे १९४८मध्ये पुणे विद्यापीठजन्माला आले. याच विद्यापीठाचा कुलगुरू होऊन दीक्षान्त भाषण मराठीतूनदेण्याचा उपक्रम दादांनी २४ सप्टेंबर १९६१रोजी करून दाखवला. सन १९४५ ते १९७२ या काळात प्रा. पोतदार हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू होते. काही काळ कुलपतीही होते. दादांच्या शिक्षणक्षेत्रातील या भारदस्त कार्यामुळे हिंदुस्थान सरकारने त्यांना १९४६ साली महामहोपाध्यायपदवी दिली.

     भारत इतिहास संशोधक मंडळ, शिक्षण प्रसारक मंडळी, साहित्य परिषद, राष्ट्रभाषा सभा, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, मराठी साहित्य महामंडळ, भारतीय संस्कृती कोश, भांडारकर संशोधन संस्था, संयुक्त महाराष्ट्र परिषद अशा अनेक संस्थांच्या उभारणीमध्ये त्यांचा यातील महत्त्वाचा सहभाग होता. महाराष्ट्रभरातील उपस्थितीमुळे त्यांचे जीवन एक प्रकारे सार्वजनिक बनले होते. अनेक अखिल भारतीय अभ्यास मंडळांचे ते पदाधिकारी होते. विविध शैक्षणिक समित्यांवर ते तज्ज्ञ म्हणून असायचे, त्याच वेळी तमाशा सुधार समिती’, ‘वसंत व्याख्यानमालायासारख्या सर्वसामान्यांच्या आवडीच्या क्षेत्रांतही ते पुढाकार घ्यायचे. आर्योद्धारक संस्था (१९०३), आर्य क्रीडोद्धारक मंडळ (१९१४), आरोग्य मंडळ (१९१४), सहकारी वस्त्र भांडार (१९१८), रेल्वे पॅसेंजर असोसिएशन (१९१९) अशा संघटनांवरही त्यांनी आरंभीच्या काळात काम केले.

     १९५६ साली इटलीतील फ्लोरेन्सला मुंबई सरकारचे प्रतिनिधी म्हणून ते हजर होते. तेथून ते लंडन, पॅरीस, जिनेव्हा, नेपल्स, वार्सा अशी शैक्षणिक भ्रमंतीही  करून आले (१९६४). भारत-नेपाळ मैत्री संघाचे ते अध्यक्ष होते. १९६३मध्ये भारतीय विद्यापीठाच्या कुलगुरू शिष्टमंडळाचे नेते म्हणून ते सोव्हिएत रशियाला जाऊन अनेक विद्यापीठांना भेटी देऊन आले.

     प्रा. पोतदारांचे संशोधनात्मक कार्य, संस्थांचे नेतृत्व पाहून १९६५ साली प्रयागच्या हिंदी साहित्य संमेलनाने त्यांना साहित्य वाचस्पतिपदवी  दिली. १९६७ साली काशी विद्यापीठाची डी.लिट.पदवी मिळाली. १९६२ साली राष्ट्रीय संस्कृत पंडित म्हणून राष्ट्रपतींकडून गौरव आणि आजीवन वर्षासन मिळाले. १९६७ साली भारत सरकारकडून त्यांना पद्मभूषणसन्मान मिळाला.

     वयाच्या ऐंशीनंतर पोतदारांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकृतीचे बंधन आले. वृद्धत्वाची छाया पडू लागली. वाईच्या गंगापुरीत १९६८ साली खरेदी केलेले घर आनंदीधाम’. त्यामधील सर्व संग्रहासह शिक्षण प्रसारक मंडळींना अर्पण केले.

     प्रा. पोतदारांनी दोनशेच्यावर शोधनिबंध इतिहास, प्राच्य-विद्या, संस्कृत आणि मराठी साहित्य या विषयावर लिहिले. त्याखेरीज मी युरोपात काय पाहिले’, ‘श्रोतेहो’ (भाषणसंग्रह), ‘मराठे व इंग्रजअशी त्यांची लिहिलेली व संपादलेली एकूण २४ पुस्तके आहेत. तर लहान मुलांसाठी खेळावे कसे’, ‘अभ्यास’, ‘नागरिकत्व’, ‘मनाची मशागत’, ‘निश्चय’, ‘परीक्षाअशी सुमारे पंचवीस पुस्तके लिहिली. त्यांची भाषणे, प्रस्तावना, अभिप्राय यांची गणतीही अवघड!

     १९७७ ला पुण्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले. ८७ वर्षांचा कार्यकर्ता हा वारकऱ्याच्या निष्ठेने व्यासपीठावर हजर झाला. १९७९च्या सुमारास शनिवार पेठेतील घरात त्यांना आणले आणि तेथेच आजारी अवस्थेत त्यांचे देहावसान झाले.

     - वा. ल. मंजूळ 

पोतदार, दत्तो वामन