Skip to main content
x

पराडकर, विजय रामचंद्र

        विजय पराडकर यांची व्यंगचित्रे अनेक मासिकांतून व दैनिकांतून लक्षवेधी ठरली आहेत. त्यांच्या चित्रांना समर्पक उपहास व विडंबनात्मक शब्दांची साथ असते व हेच त्यांचे वेगळेपण आहे.

        विजय रामचंद्र पराडकर यांचे जन्मस्थळ, वास्तव्य व कार्यक्षेत्र पुणे हेच आहे. ते १९६३ साली पुणे विद्यापीठाची एम.एस्सी. ही शास्त्रशाखेची पदवी घेतल्यानंतर ते हिंदुस्थान अँटिबायोटिक्समध्ये नोकरीस लागले. त्यांनी संशोधन विभागात पेपर्सही सादर केले. त्यांना उत्तम विनोदबुद्धी, चित्र व लेखनाची आवड होतीच. मात्र, पूर्ण वेळ व्यंगचित्रकलेकडे वळायला एक अनुभव कारणीभूत ठरला. त्यांना १९७८ साली घेतलेल्या ‘दीपावली’ दिवाळी अंकाच्या व्यंगचित्रस्पर्धेत पहिले बक्षीस मिळाले. स्वत:मध्ये लपलेल्या व्यंगचित्रकाराचे त्यांना दर्शन झाले व आयुष्यातील महत्त्वाचा सांधाबदल घडून आला. ‘ललित’ मासिकाच्या ‘वाचकांचा कौल’ या स्पर्धेमुळेही त्यांना प्रेरणा मिळाली. ‘कार्टूनिस्ट्स कंबाइन’ने आयोजित केलेल्या अनेक संमेलनांत व प्रदर्शनांत त्यांचा सहभाग असे. तिथे भेटलेल्या नामवंत व्यंगचित्रकारांनाही पराडकर या प्रेरणेचे श्रेय देतात.

        स्वत: मितभाषी, विनम्र असले तरी लेखनाची आवड असल्यामुळे मिस्कील शब्दांचा उपयोग ते भरपूर करतात. त्यांनी चित्रकलेचे औपचारिक शिक्षण घेतलेले नाही. मात्र, आशय अचूक पोहोचविण्याइतपत त्यांना रेषा अनुकूल आहे. ते स्वत: म्हणतात त्याप्रमाणे, एखादा विषय त्यांना सामोरा आला तर कल्पनांचे असंख्य पर्याय गर्दी करतात. कल्पनांचा हा स्रोत बहुधा शब्दांच्या बाजूनेच येत असावा. गेल्या पंधरा-वीस वर्षांत त्यांनी विपुल व्यंगचित्रे काढली आहेत. त्यांची दहा हजारांहून अधिक चित्रे प्रकाशित झाली आहेत.

        त्यांनी दै. ‘सकाळ’साठी अनेक राजकीय टीकाचित्रे  दिली. मराठीत राजकीय टीकाचित्रकार संख्येने कमीच आहेत. त्यांनी ‘साप्ताहिक सकाळ’साठी वीस वर्षे एक सदर व्यंगचित्रांमधून सादर केले. ‘सोबत’, ‘जत्रा’ या साप्ताहिकांतून व मराठीतील अनेक दिवाळी अंकांतून त्यांनी सामाजिक विषयावर चित्रमाला व सुटी हास्यचित्रे रेखाटली.

        मानवी जीवनात घडणाऱ्या विनोदी घटना पराडकरांनी काही वेळा कासव, साप, घुशी , उंदीर अशा प्राणिजगतात शिरूनही मांडल्या आहेत. कल्पनाविलासाचा (फॅण्टसी) उपयोगही केला आहे. निर्जीव दगडांच्या मूर्तीही संवाद करतात. शब्द व चित्र यांचा उत्तम समन्वय असलेले एक चित्र आठवते. चित्रात घारापुरीच्या त्रिमूर्तीचे शिल्प रेखाटून असे वाक्य लिहिले आहे, की ‘‘हल्ली मूर्ती-चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तुम्ही दोघे बाजूला लक्ष ठेवा. मी समोर ठेवतो.’’ तीन तोंडांना कामे वाटून दिली आहेत. शब्द व चित्र यांचे नाते इथे पराडकरांनी स्पष्ट केले आहे. 

        शब्दविरहित व्यंगचित्र श्रेष्ठ समजले जाते; पण शब्दांमुळे ते चित्र जर अधिक प्रभावी होत असेल, तर शब्दांचा वापर तिथे आवश्यक ठरतो. मात्र, ते शब्द समर्पक व मोजके असावेत, असे त्यांचे मत आहे.

        पराडकरांनी एका मासिकासाठी नामवंत मराठी व्यंगचित्रकारांच्या चित्रांचीच विडंबनचित्रे सादर केली आहेत. एक रेषा जादा, म्हणजेच काही चित्रचौकटी पुरवणी चित्रांच्या रूपात मांडल्या आहेत व विडंबन साधले आहे. त्यांनी कथाही लिहिल्या आहेत. चित्रांत प्रयोग करून पाहण्याची त्यांची क्षमता आहे. थोडक्यात, शब्द व चित्र या दोन्ही भाषा त्यांना अनुकूल आहेत.

        रसायन प्रयोगशाळेकडून चित्रांच्या प्रयोगशाळेपर्यंतचा हा प्रवास त्यांनी यशस्वी केला. या कामगिरीची योग्य ती दखल घेतली गेली. त्यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा हास्यचित्राचा पुरस्कार मिळाला. तसेच, त्यांना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार १९९६ मध्ये प्रदान करण्यात आला. 

- शि.द. फडणीस

पराडकर, विजय रामचंद्र