Skip to main content
x

परांजपे, जयंत भानुदास

     जयंत भानुदास परांजपे यांच्या व्यक्तिमत्त्वात व्यासंग व प्रतिभा एकत्र नांदत होत्या. त्यांचे आजोबा श्रीधरपंत परांजपे व वडील भानुदास श्रीधरपंत परांजपे यांचा समृद्ध वारसा त्यांना लाभला. श्रीधरपंतांनी केकावलीवर टीका लिहिली व संस्कृत वेद, उपनिषद यांचे अध्ययन केले. भा.श्री.परांजपे यांनी कथाकार, संपादक, समीक्षक या नात्याने कार्य केले आणि ‘मराठी समीक्षेचे आदिपर्व’ या समीक्षाग्रंथातून यांनी चिपळूणकरांच्या समीक्षेची आलोचना केली होती.

     जयंत परांजपे यांनी १९६८ साली नागपूर विद्यापीठातून एम.ए. केले व १९७५ साली तेथून पीएच.डी. पदवी घेतली. त्यांनी इंग्रजी साहित्याचे अध्ययन व अध्यापन आयुष्यभर केले. ‘सेंटर फॉर लिटररी स्टडीज अ‍ॅन्ड रिसर्च’ ही संस्था त्यांनी नागपूर येथे स्थापन केली. नागपूर विद्यापीठाच्या मानव्यविद्या विभागाचे काही वर्ष ते प्रमुख होते. नागपूर विद्यापीठाची ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ ही पदवी मिळविणारे ते पहिले संशोधक होते. ‘अर्थ काय अंधाराला’ (१९७८) ही त्यांची कादंबरी आणि ‘पाऊलखुणा’ (१९८२) हा कवितासंग्रह जाणकारांचे लक्ष वेधून गेला.

     या नवकवितेविषयी मौलिक समीक्षा परांजपे यांनी लिहिली. त्यात ‘पु.शि.रेगे’ (१९६९), ‘ग्रेस आणि दुर्बोधता’ (१९८६) ह्या ग्रंथांचा समावेश आहे. श्री.ना.पेंडसे ह्यांच्या कादंबर्‍यांच्या परिष्करणासंबंधीचे ‘श्री.ना.पेंडसे हस्तलिखित आणि परिष्करणे’ (१९८३) हे पुस्तक तौलनिक साहित्याभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे आहे. त्यांनी इंग्रजीतही समीक्षा लिहिली. ‘ओल्ड लॅम्प फॉर द न्यू’(१९८२) आणि ‘न्यू डायमेन्शन्स’(१९८५) हे त्यांचे इंग्रजी ग्रंथ लक्षवेधक ठरले आहेत.

- नरेंद्र बोडके

परांजपे, जयंत भानुदास