Skip to main content
x

परांजपे, केशव गणेश

       केशव गणेश परांजपे यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गणेश राजाराम परांजपे व आईचे नाव सरस्वती (ऊर्फ शांता). त्यांचे प्राथमिक शिक्षण कल्याण नगरपालिकेच्या शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण जनरल एज्युकेशन सोसायटीच्या कल्याण येथील माध्यमिक विद्यालयात झाले. त्यांचे वडील प्रख्यात वकील होते.

         वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकून वकील व्हावे या उद्देशाने त्यांनी प्रथम शासकीय विधी महाविद्यालय, मुंबई येथे अध्ययन करून मुंबई विद्यापीठाची एलएल.बी. ही पदवी मिळवली. प्रख्यात विधिज्ञ कै.नानी पालखीवाला, तसेच प्रि.टी.के.टोपे हे विधी महाविद्यालयातील प्राध्यापक होते. वकिलीची सनद प्राप्त केल्यानंतर त्यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण शहरातच दिवाणी न्यायालयात वकिली सुरू केली व थोड्या काळातच आपला जम बसविला.

       आय.ए.एस. परीक्षेत उत्तीर्ण होणे तितकेसे सोपे नाही व त्या परीक्षेत बुद्धीची कसोटी लागते अशी काहीशी त्यांची धारणा होती. तेव्हा या परीक्षेत आपल्याला उत्तीर्ण होता येते की नाही हे अजमावून पाहण्यासाठी ते परीक्षेला बसले व उत्तीर्ण झाले. त्यानंतर प्रशासन सेवेत रुजू व्हावे की वडिलांबरोबर वकिलीचा व्यवसाय चालू ठेवावा, असा प्रश्न उभा राहिला. अनेक मित्रांनी व हितचिंतकांनी वकिली चालू ठेवावी असा सल्ला दिला. मात्र, प्रशासकीय सेवेत आपल्या देशासाठी व जनतेसाठी खूप काही करण्याची संधी असते असे वाटल्यानंतर ते भारतीय प्रशासन सेवेत दाखल झाले.

          त्यांच्या सेवेचा प्रारंभ सध्याच्या गुजरात राज्यात (तत्कालीन द्वैभाषिक राज्य) बडोदा (वडोदरा) येथे झाला. त्यांची पहिली नेमणूक अधिसंख्य साहाय्यक समाहर्ता म्हणून बडोदा येथे झाली. त्यानंतर त्यांनी साहाय्यक समाहर्ता म्हणून ध्रंगध्रा, जि. झालवाड म्हणजे सध्याचे सुरेंद्रनगर पलिताना येथे व त्यानंतर विक्रीकर साहाय्यक आयुक्त, अहमदाबाद या पदावर गुजरात राज्यात सेवा केली. गुजरातमध्ये राहून गुजराती भाषा त्यांनी चटकन आत्मसात केली. राज्यकारभाराची भाषा गुजराती असल्याने महसूल प्रकरणातील निकालपत्रे त्यांनी गुजरातीत लिहिली व भाषणेदेखील गुजरातीत लिहिली. गुजराती लोक मेहनती व प्रेमळ स्वभावाचे असतात याचा त्यांना अनुभव  आला.

          भाषावार प्रांतरचनेनुसार १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर त्यांची प्रथम मुंबई येथे विक्रीकर विभागाच्या साहायक आयुक्तपदी नियुक्ती झाली. पुढील चार महिन्यांतच त्यांना पदोन्नती मिळाली व त्यांची पुणे येथे विक्रीकर उपायुक्त म्हणून नेमणूक झाली. पुणे येथे विक्रीकर उपायुक्त या पदावर त्यांनी सुमारे दोन वर्षे काम केले. त्या वेळी अत्यंत कडक शिस्तीचे म्हणून गणले गेलेले एम.एन. हेबळे हे राज्याचे विक्रीकर आयुक्त होते. त्यांच्याकडून त्यांना खूप शिकावयास मिळाले.

          त्यानंतर त्यांची नाशिकच्या जिल्हाधिकारी या पदावर नेमणूक झाली. जिल्हादंडाधिकारी या नात्याने जिल्ह्यातील कायदा व सुलभ व्यवस्था यांची जबाबदारी त्यांच्याकडेच होती. मालेगाव हे अत्यंत संवेदनशील शहर नाशिक जिल्ह्यातच आहे. जातीय दंगलींनी अनेक वेळा हे शहर होरपळून निघालेले आहे. त्यामुळे हिंदू व मुस्लिमांच्या धार्मिक सणांच्या वेळी जिल्हा प्रशासनाला विशेष खबरदारी घ्यावी लागत असे. १९६३ मधील गणेशोत्सवात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून विशेष दक्षता घेण्यात आली होती. तरीदेखील अनंतचतुर्दशीच्या दिवशी निघालेल्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकांवर काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याने शहरात दंगल उसळली. दंगल आटोक्यात यावी यासाठी जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशावरून पोलिसांनी गोळीबार केला. त्यात चार-पाच माणसे मृत्युमुखी पडली.

         पुढे या प्रकरणात राज्यशासनाने चौकशी केली. पोलिसांनी केलेला गोळीबार समर्थनीय होता असा निष्कर्ष चौकशी अहवालात काढला गेला व जातीय दंगल समर्थपणे हाताळल्याबद्दल जिल्हादंडाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांचे राज्यशासनातर्फे कौतुक करण्यात आले. नाशिकनंतर त्यांनी बुलढाणा व मुंबई येथे जिल्हाधिकारी या पदावर काम केले. मुंबईचे जिल्हाधिकारी असताना देशात सार्वत्रिक निवडणुका झाल्या. मुंबई  शहरातील निवडणुका शांतपणे व सुरळीतपणे पार पाडण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. ती त्यांनी समर्थपणे पार पाडली. त्यानंतर त्यांनी केंद्रशासनाच्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणार्‍या  पेट्रोलियम मंत्रालयात उपसचिव म्हणून पाच वर्षे काम केले.

         केंद्रशासनातील प्रतिनियुक्तीवरून आल्यावर मंत्रालयात सहसचिव, विभागीय आयुक्त, मुंबई, सचिव (महसूल), सचिव (शिक्षण), सचिव (सामान्य प्रशासन विभाग), सचिव (नियोजन) या महत्त्वाच्या पदांवर काम केले. पुढे त्यांची केंद्रशासनाच्या नियोजन मंडळाचे सल्लागार म्हणून नेमणूक झाली. तेथे त्यांनी दोन वर्षे काम केले. महाराष्ट्रात परत आल्यावर त्यांनी पुन:श्च सचिव (नियोजन) या महत्त्वाच्या पदाची धुरा सांभाळली. याच काळात त्यांनी डॉ.एस.एच. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जिल्हा नियोजन’ या विषयावर प्रबंध लिहिला व मुंबई विश्वविद्यालयातून पीएच.डी. मिळवली.

         सचिवपदावर असताना, राज्यकर्त्यांना न रुचणारे असले तरी आपले मत परखडपणे व स्पष्टपणे नोंदविणारे म्हणून परांजपे यांची ख्याती होती. ‘मुख्यमंत्रिपदावर असताना शासनाची जमीन सवलतीने घेणे उचित ठरणार नाही’, असा परखड सल्ला त्यांनी एका मुख्यमंत्र्यांना दिला होता. तो सल्ला त्या वेळच्या मुख्यमंत्र्यांनी मानला एवढेच नव्हे, तर परांजपे यांना त्याबद्दल धन्यवाद दिले.

          तसेच एका प्राध्यापकाला पदोन्नती नाकारली म्हणून तक्रार आल्याने त्या वेळचे मुख्यमंत्री प्रक्षुब्ध झाले होते व सबंध शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी असा त्यांचा मानस होता. त्या वेळी परांजपे शिक्षण विभागाचे सचिव होते. परांजपे यांनी स्वत: मुख्यमंत्र्यांकडे जाऊन प्रकरणातील परिस्थिती विशद केली व संबंधित प्राध्यापकास पदोन्नती योग्य कारणास्तव नाकारली हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच जर कारवाई करावयाची असेल, तर ती प्रथम त्यांच्याविरुद्ध परखडपणे करा असे सांगितले. मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात परांजपे यांचे म्हणणे पटले व प्रकरण योग्य तऱ्हेने हाताळल्याबद्दल शिक्षण विभागाची प्रशंसा केली.

           मुख्य सचिवपदी असताना, कै.पांडुरंग जयराव चिन्मुळगुंद, आय.सी.एस. यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या चिन्मुळगुंद ट्रस्टतर्फे प्रशासनातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ज्येष्ठ प्रशासकांना दिला जाणारा चिन्मुळगुंद पुरस्कार १९८९ मध्ये त्यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

          सेवानिवृत्तीच्या नियमानुसार ते मुख्य सचिव या पदावरून ३० सप्टेंबर १९८८ रोजी सेवानिवृत्त होणार होते. त्या सुमारास त्यांच्या सुविद्य पत्नी रजनी परांजपे यांना ‘इंटरनॅशनल सोशल वेल्फेअर’ या विषयासाठी अतिथी प्रोफेसर म्हणून शिकोकू ख्रिश्चन विद्यापीठ, जपान येथून बोलावणे आले होते. तेथे त्यांना सप्टेंबर १९८८ च्या पहिल्या आठवड्यात रुजू व्हावयाचे होते. त्यांच्यासमवेत जपानला जाता यावे म्हणून परांजपे यांनी सेवानिवृत्तीच्या एक महिना आधीच म्हणजे ३१ ऑगस्ट १९८८ रोजी सेवानिवृत्ती घेतली.

          जपानमधून वर्षभराने परत आल्यानंतर रजनी परांजपे यांना जपानमध्येच कायमस्वरूपी प्राध्यापक  म्हणून  नेमणूक मिळाली. या वेळी परांजपे दाम्पत्य पुन्हा जपानला गेले. जपानमधील वास्तव्यात परांजपे यांनी जपानमधील सामाजिक, आर्थिक व राजकीय व्यवस्थेचा सर्वंकष अभ्यास केला व ‘जपान, अ जायंट इन डिस्ट्रेस’ हे माहितीपूर्ण पुस्तक लिहिले. ते दिल्ली येथील ‘अजंठा बुक्स इंटरनॅशनल’ या प्रकाशन संस्थेतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.

          जपानच्या वास्तव्यात परांजपे यांनी शिकोकू विद्यापीठात ‘पीस फिलॉसॉफी ऑफ गांधी’ या विषयावर अनेक व्याख्याने दिली. परांजपे यांनी सेवानिवृत्तीनंतर पुण्यात वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला.

         पुणे शहराच्या विकासासाठी कृती आराखडा  करण्याकरिता त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती (परांजपे समिती) नेमण्यात आली होती. सदर समितीने पुणे शहराच्या वाहतूक, कचरा, रस्ते, पाणीपुरवठा या समस्यांच्या संदर्भात अभ्यास करून महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या.

- श्रीधर जोशी

परांजपे, केशव गणेश