Skip to main content
x

परांजपे, कपिल हरी

     कपिल हरी परांजपे यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांची आई माणक परांजपे एल्फिन्स्टन महाविद्यालयात फ्रेंच भाषा शिकवित असे आणि वडील हरी कृष्ण परांजपे सिडनेहॅम महाविद्यालयात अर्थशास्त्र शिकवित असत. पुढे ते दोघेही दिल्लीत स्थायिक झाल्याने कपिल परांजपे यांचे शालेय शिक्षण दिल्लीच्या शाळांमध्ये झाले.

     कपिल परांजपे यांनी आय.आय.टी. प्रवेश परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळूनसुद्धा गणित या विषयाच्या आवडीमुळे कानपूर आय.आय.टी.त गणित विषय घेऊन एम.एस्सी. केले.

     लहान वयातच परांजपे यांना गणित व भौतिकशास्त्राची गोडी लागली. याचे श्रेय ते आपले गुरुजन, पालक आणि वडिलांच्या संग्रहातील पॉप्युलर सायन्स व रशियन गणिताची पुस्तके यांना देतात. कानपूर येथील प्रज्ञावंत गुरू, विद्यार्थिमित्र, सहकारी यांच्याशी चर्चामंडळात सखोल चर्चा करताना त्यांनी गणिताबरोबरच भौतिकशास्त्र, संगणक, विज्ञान, संगीत, राजकारण, तत्त्वज्ञान व समाजजीवन यांचाही अभ्यास केला. कोणत्याही विषयाच्या गाभ्याकडे जाऊन संशोधन करण्याची सवय परांजपे यांना लागली, त्यामुळेच त्यांचा दृष्टिकोन विकसित होत गेला.

     आय.आय.टी. कानपूरनंतर १९८२ साली कपिल परांजपे मुंबईला टाटा मूलभूत संशोधन संस्थेमधील (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये) गणित विभागात आले. १९८९ ते १९९१ साली ते परदेशी जाऊन आले. १९९४ साली परांजपे बंगळुरु येथील टाटा इन्स्टिट्यूटच्या विभागात गेले. १९९६ सालापासून ऑगस्ट २००९ सालापर्यंत कपिल परांजपे यांनी चेन्नईच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसमध्ये संशोधन केले आणि ऑगस्ट २००९ सालापासून ते चंदीगडच्या मोहाली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्यूकेशन अ‍ॅण्ड रिसर्च (आयझेर) मध्ये प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. त्यांच्या पत्नी सुदेष्णा याही आयझेरमध्ये भौतिकशास्त्र शिकवितात.  

     बैजिक भूमिती (अल्जिब्राईक जॉमेट्री), विशेषत: बैजिक चक्रे (अल्जिब्राइक सायकल्स) हा परांजपे यांचा प्रमुख संशोधनाचा विषय असून त्यांनी त्यावर वीस शोधनिबंध लिहिलेले आहेत. हे शोधनिबंध नावाजलेल्या देशी व परदेशी नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेले आहेत. विषयाच्या गाभ्यात जाऊन ‘संशोधनाची’ सवय असल्याने ‘बैजिक चक्रे’ व ‘हॉज उपपत्ती’ यांतील परस्परसंबंधावर त्यांनी सखोल संशोधन केले. परिणामी क्ले मॅथेमॅटिक्स इन्स्टिट्यूटने ‘हॉज’ उपपत्तीची निवड पारितोषिकपात्र म्हणून जाहीर केली.

     सोपे दृष्टान्त देऊन गणिती विषयाची सूक्ष्म छटा उकलून दाखवण्याच्या त्यांच्या हातोटीमुळे परांजपे यांचे हे संशोधन चांगलेच नावाजले गेले. गणिताच्या अनेक शाखांची त्यांनी आपल्या संशोधनाशी सांगड घातली. त्यांपैकी अंकगणितावर लिहिलेला ‘अ जॉमेट्रिक कॅरॅक्टरायझेशन ऑफ अ‍ॅरिथमॅटिक व्हरायटीज’ हा २००२ साली प्रसिद्ध झालेला त्यांचा शोधनिबंध विशेष गाजला. १९९९ साली त्यांना बिर्ला तरुण वैज्ञानिक पुरस्कार मिळाला, तसेच त्यांना २००४-२००५ सालचा शांतिस्वरूप भटनागर पुरस्कारही मिळालेला आहे. त्यांच्या संशोधनामुळे अनेक ठिकाणी गणिती कार्यक्रमांत सहभागी होण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. त्यात कानपूर, म्हैसूर, पुणे, मुंबईची टाटा मूलभूत संशोधन संस्था या भारतीय स्थानांचा समावेश आहे. पॅरिस, शिकागो, इसेन येथील विद्यापीठे, ‘मॅक्स प्लॅन्क इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिक्स’, ‘कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या संस्थांतून त्यांनी बराच काळ संशोधन केले. हर्मन वाईल (जर्मन), अलेक्झांडर ग्रॅथेडिक (फ्रान्स), ऑस्कर झरिस्की (अमेरिका), डेव्हिड हिल्बर्ट (जर्मन) यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उमेदवार पीएच.डी. करीत आहेत. २००९ साली त्यांना ‘इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी’ची फेलोशिप मिळाली. तर २०१९ साली ‘द वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सेस’ची फेलोशिप मिळाली.

मृणालिनी साठे

परांजपे, कपिल हरी