Skip to main content
x

परांजपे, रजनी केशव

 रजनी केशव परांजपे या मूळच्या रजनी नारायण जोगळेकर. त्यांचा जन्म त्र्यंबकेश्‍वर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण व बी.ए. पर्यंतचे महाविद्यालयाचे शिक्षण नाशिक येथे झाले. विवाहानंतर त्या मुंबईला गेल्या. तेथे पंधरा वर्षे प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर त्यांनी मुंबई येथे समाजसेवेतील पदवी - (एम. एस.डब्ल्यू.) संपादन केली. त्यानंतर काही काळ रजनीताई मुंबईतील निर्मला निकेतनच्या कॉलेज ऑफ सोशलवर्क येथे व्याख्यात्या म्हणून काम करीत असत. तेथे त्या भारतीय सामाजिक प्रश्‍न तसेच संशोधन पद्धती हे विषय शिकवीत असत. त्यानंतर त्या जपानी विद्यापीठातून व्याख्यात्या म्हणून निवृत्त झाल्या.

महाविद्यालयामध्ये शिकवत असताना अनेक प्रकल्पांच्या निमित्ताने त्यांचे झोपडपट्ट्या, वाड्या, वस्त्यांवर जाणे होत असे. तेथील शाळेत न जाणाऱ्या मुलांकडे पाहताना, या मुलांपर्यंत शिक्षण पोचले पाहिजे असे त्यांना वाटायचे. त्याचप्रमाणे शिकणे म्हणजे सक्तीचे, निरस व कंटाळवाणे असते हा मुलांच्या आणि  पालकांच्या मनातला आकस दूर केला पाहिजे असे त्यांना नेहमी वाटत असे. आपल्या देशात साक्षरता मोहिमेचा प्रसार सरकारी पातळीवर तसेच अनेक स्वयंसेवी संस्थांकडून सुरू आहे. पण भारतात पस्तीस कोटींहून जास्त लोक निरक्षर आहेत. प्राथमिक शाळेत जाण्याच्या वयातील अडीच कोटी मुले शाळेत जात नाहीत. शिवाय जी मुले शाळेत जातात, त्यापैकी पहिल्या इयत्तेत जाणाऱ्या दर पाच मुलांपैकी दोन मुले शिक्षण पूर्ण करीत नाहीत. ही न शिकलेली मुले मोठी होऊन जेव्हा पालक होतात, तेव्हा त्यांना स्वत:लाच शिक्षणाचे महत्त्व फारसे न समजल्याने ते त्यांच्या मुलांना शाळेत पाठविण्याचे महत्त्व जाणत नाहीत. अज्ञानाबरोबरच गरिबी हाही मोठा अडसर असतोच. हे दुष्टचक्र भेदले जावे यासाठी  रजनी परांजपे यांनी डोअरस्टेप स्कूलही संकल्पना मांडली. म्हणजे ही मुले शाळेत येत नसतील तर ही मुले जिथे राहतात, तिथेच त्यांच्यासाठी शाळा सुरू करावयाची. रजनीताई परांजपे यांनी आपली एक विद्यार्थीनी बीना लष्करे हिच्या सहाय्याने १९८८-८९ मध्ये मुंबईत डोअरस्टेप स्कूलची स्थापना केली.

३ ते १४ या वयोगटातील शिक्षणापासून शाळेपासून वंचित असलेल्या गरीब मुलामुलींना त्यांच्या वाडी, वस्तीवर जाऊन शिकविणे सुरू केले. रजनीताईंचे काम मुंबईत जोरात सुरू असताना १९९३ मध्ये त्या पुण्यात वास्तव्यासाठी आल्या आणि त्यांनी पुण्यातही डोअरस्टेप स्कूलचे काम सुरू केले. अनेक वर्षे आपल्या सहकाऱ्यांसमवेत या मुलांसाठी काम केल्यावर रजनीताईंना एक गोष्ट जाणवली की गरीब मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या आपल्या संस्थेसारख्या इतरही काही संस्था आहेत. पण पुण्यामुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये अजूनही एक मोठा वर्ग आहे, ज्यांना शाळेपर्यंत पोचताच येत नाही - तो म्हणजे बांधकामावर असणाऱ्या मजुरांच्या मुलांचा! शहरी भागात सर्वात दुर्लक्षिली गेलेली ही मुले आहेत असे त्यांच्या लक्षात आले आणि या मुलांच्या शिक्षणासाठी मोठमोठ्या साईटसवर त्या त्या बांधकाम व्यावसायिकाच्या मदतीने डोअरस्टेपने शाळा तसेच गरज असेल तेथे पाळणाघरे सुरू केली. सध्या पुण्यातील औंध, बाणेर, हिंजवडी तसेच शिवणे उत्तमनगर, नांदेड, वडगाव, येथील ८० साईटवर ५ हजार मुले शिकत आहेत.

रजनीतार्ईंनी डोअरस्टेप स्कूलची बसही अभिनव पद्धतीने वापरली आहे. ज्या ठिकाणी मुलांना शिकवण्यासाठी जागा नसते तेथील मुले या बसमध्ये बसून शिकतात. अशी ती चाकांवरची शाळा आहे.

तसेच डोअरस्टेपच्या शाळेतून शिकून मुले महानगरपालिकेच्या किंवा इतर शाळेत जायला लागली तर त्या मुलांना शाळेत नेण्याआणण्याचा खर्च त्यांच्या पालकांवर पडू नये म्हणून संस्थेतर्फे ही बस व काही रिक्षा यातून ही व्यवस्था करण्यात येते. मुलांवर वाचनसंस्कार व्हावेत यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील सुमारे १०० शाळांमध्ये वाचन प्रकल्प सुरू केला आहे. गेली दहा वर्षे तो अखंड सुरू आहे. संस्थेकडे यासाठी सुमारे २५ हजार पुस्तके आहेत. मुलांना भाषेची ओळख व्हावी यासाठी काना, मात्रा, वेलांटी तसेच जोडाक्षरविरहीत गोष्टींची पुस्तके रजनीताई व सहकाऱ्यांनी तयार केली आहेत. नाममात्र किंमतीत ही पुस्तके उपलब्ध आहेत. आज ७४ व्या वर्षीदेखील रजनीताई आपले काम अतिशय तळमळीने करत असतात. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा बाया कर्वे पुरस्कार मिळाला आहे. अज्ञान, निरक्षरता आणि दारिद्य्र यांचे दुष्टचक्र भेदण्यासाठी गेली २०-२१ वर्षे निरलसपणे त्यांचे काम सुरू आहे.

- स्वाती क्षीरसागर 

परांजपे, रजनी केशव