Skip to main content
x

परांजपे, श्रीकांत रामचंद्र

     भारतीय अणुशक्ती विकासाच्या त्रिस्तरीय कार्यक्रमाचा डॉ. होमी भाभा यांनी आखलेला प्रस्ताव भारत सरकारने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर थोड्याच दिवसांनी स्वीकारला होता. त्या दिशेने अणुसंशोधन कार्यक्रमाच्या पहिल्या दोन दशकांच्या काळात या कार्यक्रमाची सूत्रे भाभांच्या हाती होती. तथापि १९६६ सालच्या सुरुवातीसच डॉ. भाभांचा विमान अपघातात अकाली मृत्यू झाल्यानंतर ही जबाबदारी डॉ. विक्रम साराभाईंच्या खांद्यावर सोपविली गेली. त्यानंतरच्या अणुऊर्जा कार्यक्रमाबाबतची महत्त्वपूर्ण आखणी करणाऱ्या वैज्ञानिकांमध्ये श्रीकांत परांजपे यांचे नाव, एक अभ्यासू, मौलिक तत्त्वचिंतक, कर्तबगार अभियंता/वैज्ञानिक म्हणून प्रामुख्याने घ्यावे लागेल यात तिळमात्रही संशय नाही.

     श्रीकांत परांजपे, तसे पाहता रासायनिक अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर. या विषयाचा अणुविज्ञानाशी संबंध असलाच तर तो दूरान्वयानेच आहे असे म्हणावे लागेल. श्रीकांत परांजपे यांचा जन्म व शालेय शिक्षण मुंबईतच झाले. इंटर सायन्सपर्यंतचे शिक्षण मुंबईतच इस्माइल युसुफ महाविद्यालयात पूर्ण करून, त्यांनी रासायनिक अभियांत्रिकीची पदवी १९५५ साली मुंबईच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’ (आय.सी.टी.) मधून उच्च गुणवत्ता श्रेणी मिळवून संपादन केली. नोकरीसाठी परांजपे यांनी तेव्हा बाल्यावस्थेत असलेल्या अणुशक्ती विभागात अर्ज केला आणि त्यांना नेमणूक मिळाली ती अणुभट्टी अभियांत्रिकी (रिअ‍ॅक्टर इंजिनिअरिंग) विभागात. १९५५ ते १९५८ अशी पहिली तीन वर्षे, अणुशक्ती केंद्राच्या तुर्भे येथील प्रयोगशाळेत भारतीय बनावटीच्या पहिल्या ‘अप्सरा’ या अणुभट्टीच्या सुरुवातीसच आराखडा बनविण्याच्या आणि रचनेच्या कामात परांजपे सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांचा अणुभट्टी अभियांत्रिकीचा भरभक्कम पाया घातला गेला. परांजपे या कामात निष्णात झाले. तो कालखंड जगभर अणुयुगाच्या उदयाचा असला, तरी पश्चिमी प्रगत राष्ट्रांत चालू असलेल्या अद्ययावत संशोधनाबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात येत होती. डॉ.भाभांनी मात्र या क्षेत्रात भारताला स्वयंनिर्भर बनविण्याचा जणू विडाच उचलला होता आणि त्यानुसार ठाम पावले टाकीत वाटचाल सुरू केली होती.

     अणुविज्ञानाचा उपयोग मनुष्य अनेक प्रकारांनी करू शकतो. अणुऊर्जा आयोगाने अणुभंजन प्रक्रियेत उपलब्ध होणारी प्रचंड ऊर्जा विद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी वापरण्याचे प्रमुख उद्दिष्ट मनाशी ठेवून अणुविद्युत ऊर्जा प्रकल्पांची साखळी बनविण्यासाठीचे मोठे प्रकल्प उभारण्याचे कार्य स्वीकारले होते. यासाठी भंजनक्षम इंधन म्हणून युरेनियमचा वापर करणे गरजेचे होते. जगाच्या युरेनियम खनिज साठ्यांपैकी भारतात उपलब्ध असलेले युरेनियम फारच थोडे आहे. नैसर्गिक युरेनियममध्ये युरेनियमचा २३५ वस्तुमानाचे समस्थानिक भंजनक्षम असते. परंतु, ते एकूण साठ्यात फक्त ०.७ टक्के इतकाच अल्प प्रमाणात असतो. युरेनियम २३५ चे प्रमाण वाढविणे म्हणून महत्त्वाचे ठरते, तथापि हे तंत्र सहजसाध्य नाही याचीही जाणीव सर्वांना होती. भारतात केरळच्या किनारपट्टीजवळ थोरियम या मूलद्रव्याने युक्त रेती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. थोरियमच्या  समस्थानिकांपैकी थोरियम २३३ हे समस्थानिक भंजनक्षम नसले, तरी त्याचे रूपांतर युरेनियम २३३ या भंजनक्षम समस्थानिकात करता येते. त्यामुळे अणुइंधनाच्या बाबतीत स्वयंनिर्भरता साध्य करण्याचे मोठेच आव्हान भारतीय अणुऊर्जा विकास कार्यक्रमापुढे उभे ठाकले होते.

     युरेनियम २३५ समस्थानिकाचे न्यूट्रॉन आदळल्यावर भंजन झाल्याने ऊर्जा निर्माण होण्याच्या प्रक्रियेत प्रचंड ऊर्जेबरोबरच दोन किंवा अधिक न्यूट्रॉन कणदेखील फेकले जातात. त्यांतील काही न्यूट्रॉन कण बाजूच्याच युरेनियम २३८ अणूमध्ये सामावू शकतात. या प्रक्रियेत युरेनियम २३९ हा किरणोत्सारी अणू बनतो. त्यापासून पुढे जाऊन प्लूटोनियम २३९ हा मानवनिर्मित नव्या मूलद्रव्याचा अणू बनतो. प्लूटोनियम २३९ हादेखील एक भंजनक्षम अणू आहे. म्हणजे एकीकडे भंजनक्षम अणू संपून गेला, जळून गेला, तर दुसरीकडे नवा भंजनक्षम इंधनाचा अणू निर्माण झाला. या प्रक्रियेला ‘इंधन-जनन’ म्हणता येईल. मूळ इंधन स्रोत मर्यादित असल्याने अशा इंधनजनक तंत्राचे महत्त्व अधोरेखित होते. परांजपे यांचे या संदर्भातील योगदान भारताच्या अणुकार्यक्रमाला समर्थ, स्वयंपूर्ण आणि सुयोग्य दिशा देण्याच्या बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले.

     १९६६ साली डॉ. साराभाईंनी जगभर विकसित केल्या गेलेल्या निरनिराळ्या अणुभट्टी प्रक्रियांचा तौलनिक अभ्यास करून भारतीय अणुऊर्जा निर्मितीसाठी सुयोग्य व हितावह ठरतील, अशा पर्यायांची निवड करण्याचे महत्त्वाचे निर्णय घेण्यास अग्रक्रम दिला. भारताचा पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूरमध्ये पूर्णतया अमेरिकेच्या मदतीने उभा राहिला होता. तथापि क्रमश: भारताने स्वयंनिर्भरतेकडे वाटचाल शक्य तितक्या लवकर करावी हा विचार निश्चितच होता. यासाठी डॉ. साराभाई, डॉ. सेठना, यांच्याबरोबर परांजपे व इतर दोन वरिष्ठ वैज्ञानिक यांच्या चमूने परदेशी जाऊन सर्व उपलब्ध पर्यायांचा परामर्श घेतला. परदेशातील अणुविद्युत प्रकल्पातील अनुभव, भारताच्या बाबतीतील बलस्थाने, कच्चे दुवे, इत्यादींचा सखोल अभ्यास करून निर्णय घेण्याचे ठरविले.

     या अभ्यासाच्या अनुषंगाने परांजपे यांच्याकडे ‘द्रुतप्रजनक न्यूट्रॉन अणुभट्टी’ (फास्ट ब्रीडर रिअ‍ॅक्टर) प्रकल्प उभारण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. ही अणुभट्टी चेन्नईजवळ कल्पक्कम येथे उभी करण्याचे ठरले. पुढे १९७० साली भारताने या क्षेत्रात प्रगत असलेल्या फ्रान्सबरोबर इंधनजनक शीघ्रगती अणुविज्ञानविषयक सहकार्य करार केला. त्यानुसार भारतीय चमूच्या प्रमुखपदी परांजपे यांची नेमणूक झाली. तथापि, १९७४ साली भारताने पोखरण येथे शांततापूर्ण अणुचाचणीचा यशस्वी प्रयोग केल्याने हा करार अर्धवट असतानाच फ्रान्सने संपुष्टात आणला. अशा बिकट परिस्थितीने डगमगून न जाता, परांजपे यांनी मोठ्या जिद्दीने, मेहनत घेऊन इंधनजनक प्रायोगिक अणुभट्टी प्रकल्प यशस्वी करून दाखविला. अणुभट्टीचा तपशीलवार आराखडा मांडणे, त्यानुसार प्रायोगिक अणुभट्टीची बांधणी करणे, त्यावर सर्व सुरक्षिततेच्या चाचण्या घेणे, अणुभट्टीची इंधनजनक क्षमता अपेक्षेनुसार असल्याची खात्री करणे, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे अणुभट्टी वर्षानुवर्षे यशस्विरीत्या चालविणे, अशा सर्व पायऱ्या सर करण्याचे शिवधनुष्य परांजपे यांनी लीलया पेलले आहे. परांजपे चेन्नईजवळ कल्पक्कमच्या इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राचे संचालक म्हणून १९९२ साली निवृत्त झाले.

     परांजपे यांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत इंधनजनक अणुभट्टी तंत्रामध्ये अनेक नव्या कल्पना मांडल्या. मिश्रधातूंच्या संयुगांचा इंधन म्हणून वापर करण्याची त्यांची कल्पना त्यातलीच एक. सध्या परांजपे यांच्या निवृत्तीनंतर ५०० मेगावॅट विद्युत निर्मितीचा इंधनजनक अणुभट्टी प्रकल्प कल्पक्कम येथे साकार होत आहे. अपेक्षा आहे, की हा प्रकल्प २०११ सालापर्यंत पूर्णत्वाला जाईल.

     आपल्या व्यावसायिक यशाचे श्रेय स्वत:पेक्षाही आपल्या बरोबरच्या सहकाऱ्यांनाच देण्याचा मनाचा मोठेपणा परांजपे यांच्या व्यक्तिमत्त्वास उठून दिसतो. अणुशक्ती केंद्राच्या कारकिर्दीत परांजपे यांना अमेरिकेच्या एन्रिको फर्मी केंद्रात काही महिने काम करण्याची संधी मिळाली होती. त्या वेळी परांजपे यांनी त्या केंद्रात काही अवघड प्रश्नांची उकल करून तेथल्या वैज्ञानिकांकडून वाहवा मिळविली होती. त्या वेळी एन्रिको फर्मी केंद्राचे प्रमुख त्यांना म्हणाले ‘‘परांजपे! संशोधनकार्यात अडचणी येतातच. कठीण समस्या उभ्या राहतातच. अशा प्रसंगी समस्यांची उकल करण्याच्या प्रयत्नांत इतरांशी विचारविनिमय जरूर करावा. तथापि, इतरांच्या विचारप्रणालीवर पूर्णतया विश्वास ठेवून विसंबू मात्र नये. इतकेच काय, अगदी आपण स्वत: घेतलेल्या पवित्र्यावरही घाई-गडबडीत निर्णय घेऊ नयेत. काही काळ जाऊ द्यावा. या काळात आपल्यालाच आपल्या विचारांतील कच्चे दुवे लक्षात येऊ शकतात आणि परिणामी, अधिक योग्य मार्ग दिसू शकतो!’’

     परांजपे यांच्या अनुभवाचा हा गुरुमंत्र म्हणजे त्यांच्या यशाची गुरुकिल्लीच होय. भारत सरकारने २००७ सालचा ‘जीवन गौरव’ (लाइफ टाइम अचीव्हमेन्ट अवॉर्ड) पुरस्कार ३० ऑक्टोबर, २००८ रोजी दिल्ली येथे, पंतप्रधानांच्या हस्ते श्री.परांजपे यांना प्रदान केला आहे.

डॉ. गो. के. भिडे

परांजपे, श्रीकांत रामचंद्र