Skip to main content
x

पटेल, गीव्ह गुस्ताद

            गीव्ह गुस्ताद पटेल यांचा जन्म मुंबईत एका पारशी कुटुंबात झाला. त्यांचे वडील दंतचिकित्सक होते. गीव्ह पटेल यांचे शिक्षण सेन्ट झेवियर्स शाळेत आणि महाविद्यालयामध्ये झाले. त्यानंतर त्यांनी ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालयामधून १९६५ मध्ये वैद्यकीय पदवी घेतली. चित्रकलेचे कौशल्य त्यांनी स्वतःच आपल्या कामातून आत्मसात केले.

            पटेल कुटुंबाचे मूळ गाव दक्षिण गुजरातमधले नाटगोल हे खेडे होय. गीव्ह पटेल लहानपणी तेथे सुट्टीत जायचे. डॉक्टर झाल्यावर त्यांनी याच गावाच्या परिसरात सरकारी नोकरीही केली. त्यांच्या चित्रांतून, कवितेतून आणि नाटकांतून या गावातील जीवेन आणि तिथला निसर्ग आपल्या प्रत्ययास येतो.

            गीव्ह पटेल लोकांसमोर त्यांच्या ‘पेलिटिशियन सिरीज’मुळे आघाडीचे चित्रकार म्हणून उदयाला आले. त्यांनी ६० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि ७० च्या दशकाच्या पूर्वार्धात केलेली ही चित्रे आपल्या राज्यकर्त्यांचे नैतिक अधःपतन आणि भ्रष्टाचार भेदकपणे दर्शवतात. त्यांच्या मांडणीतल्या संयमीपणामुळे त्यांचा आशय अधिक तीव्रपणे जाणवतो. या काळात युवा कलाकार सामाजिक विषयांकडे वळू लागले होते. तत्पूर्वीच्या पिढीच्या अमूर्तवादी आणि आध्यात्मिक तत्त्वज्ञानाने प्रभावित शैलींनी त्यांच्या सर्जनशीलतेची भूक भागू शकत नव्हती.

            ‘पेलिटिशियन सिरीज’नंतर पटेल यांची महत्त्वाची चित्रे म्हणजे त्यांची ‘रेल्वे प्लॅटफॉर्म’ ही चित्रमालिका. उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या बाकावर बसून गाड्यांची ये-जा पाहण्याच्या अनुभवांतून या चित्रांचा उगम झाला, पण या चित्रांमध्ये आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे पटेल यांनी प्लॅटफॉर्मवर एकही व्यक्ती रंगवलेली नाही. प्लॅटफॉर्म पूर्णतः निर्मनुष्य आहेत. एक गाडी येऊन त्यातली गर्दी निघून जाते आणि दुसऱ्या गाडीची गर्दी अजून यायची असते तो हा क्षण. (हे ३० वर्षांपूर्वी होत असे!) या नेहमी गजबजलेल्या; पण चित्रातील निर्मनुष्य प्रतिमांतून आपल्याला चित्रकाराची या शहराच्या गडबड गोंधळात एकांत शोधण्याची गरज जाणवते.

            त्यानंतरच्या काळात पटेल यांनी रंगवलेल्या इतर शहर-प्रतिमांतून अशीच गूढ आणि सुंदर शांतता पसरलेली दिसते. ‘हातगाडीजवळ दोन माणसे’, ‘भाजीवाला’, ‘बस स्टॉप’ ही त्या काळातली काही चित्रे आहेत. चित्रकार एकाच वेळी दोन भिन्न गोष्टींचे भान ठेवून काम कसे करतो ते आपल्याला या चित्रांमध्ये दिसते. एका बाजूला असलेली चित्राच्या माध्यमातून, रंग आणि आकारातून अद्भुत अनुभव साकारण्याची गरज, तर दुसर्‍या बाजूला असलेली लोकांच्या दैनंदिन जीवनातली ओढाताण आणि या जीवनाशी जोडलेले कलाकाराचे संबंध.

            जीवनाशी असलेल्या या बांधीलकीतून आणि समाजातल्या वाढत्या हिंसाचारामुळे १९८० आणि १९९० च्या दशकात पटेल यांच्या चित्रांत जखमी माणसे आली व मृतांच्या प्रतिमा वारंवार येऊ लागल्या. यांतली काही चित्रे धक्कादायक आहेत. मनुष्य स्वभावातल्या आणि एकूण समाजातल्या अति भयंकर वृत्तीकडेसुद्धा निर्भीड आणि तटस्थ दृष्टीने पाहू शकण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. पटेल आपल्या सर्जनप्रक्रियेत प्रत्यक्ष अनुभव आणि अनुभव-स्मरणाला महत्त्व देतात. कलाकाराकडे स्वतःचे असे काय असते, तर त्याचा अनुभव. पण आपण अनुभव समजून घेण्याच्या प्रयत्नात त्याला कुठल्यातरी वैचारिक चौकटीत बसवतो आणि त्या अनुभवाची खोली गमावून बसतो. कलाकाराला विशेषतः यापासून सावध राहावे लागते.

            गेली वीस वर्षे एका विशिष्ट विषयाने पटेल यांना गुंतवून ठेवलेले आहे. तो विषय आहे विहिरीत डोकावून पाहिल्यावर दिसणारे दृश्य. पटेल यांच्या नारगोल या गावी व त्या परिसरात असलेल्या विहिरी खोल नसतात. बऱ्याच वेळा आपण वाकून विहिरीतल्या पाण्याला हातही लावू शकतो. तर अशा विहिरीमध्ये बघताना जे पाणी दिसते; पाण्यात प्रतिबिंबित झालेले आकाश, ढग दिसतात आणि आजूबाजूला असलेले डोंगर, माती, झाडे, झुडुपे दिसतात; या सार्‍याचे दृश्य पटेल रंगवतात. ही चित्रे एका अर्थी निसर्गचित्रेच आहेत. पण निसर्गामध्ये डोकावून पाहण्याची ही कृती पटेल यांना स्वतःच्या मनामध्ये डोकावून पाहण्यासारखी वाटू लागली आणि हा शोध त्यांनी चालू ठेवला आहे.

            आपल्या चित्रांतून आणि लिखाणातून समकालीन जीवनाचा, त्यातल्या गुंतागुंतीचा, अमानुषतेचा आणि सौंदर्याचाही शोध पटेल यांनी घेतला. तीन वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या शिल्पांचे पहिले प्रदर्शन भरवून आपल्या सदासतेज क्रियाशीलतेचा पुरावा दिला. त्यांची ही शिल्पे दोन विषयांवर आधारित आहेत. महा-भारतातल्या एकलव्याच्या गोष्टीवर आधारित शिल्पामध्ये सारे नाट्य एकलव्याच्या हातावर व तोडलेल्या अंगठ्यावर केंद्रित झालेले आहे. दुसरा विषय आहे पाश्‍चात्त्य मिथ्यकथांमधल्या डॅफनीच्या गोष्टीचा. अपोलो या देवाच्या वासनेपासून बचाव करण्यासाठी सुंदर डॅफनीचे रूपांतर झाडामध्ये होते. शिल्पामध्ये पटेल डॅफनीच्या देहाच्या अर्धवट रूपांतरित स्थितीचे दर्शन घडवतात.

            पटेल यांचे एकूणच कलेविषयीचे कुतूहल व्यापक आहे. त्यांचे वाचन चतुरस्र आहे. त्यांना पाश्‍चात्त्य आणि हिंदुस्थानी संगीताची आवड आहे. वेगवेगळ्या संस्कृतींची आणि वेगवेगळ्या कलाप्रकारांची त्यांना सखोल ओळख आहे. या सगळ्यांमुळे मानवी स्वभावाने इतिहासात आणि वर्तमानात धारण केलेल्या सर्व रूपांबद्दल पटेल यांना सूक्ष्म मर्मदृष्टी आहे आणि सहानुभूतीही. म्हणूनच त्यांची चिकित्सक दृष्टी त्यांच्या मित्र-कलाकारांकरिता आणि युवा कलाकारांकरिता महत्त्वाची ठरली आहे.

            पटेल यांचे पहिले प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये १९६६ साली भरले. त्यानंतर त्यांच्या चित्रांची बरीच प्रदर्शने देशात व परदेशात भरवण्यात आली आहेत.

            त्यांच्या १९७१ ते २००६ या काळातल्या काही निवडक चित्रांचे प्रदर्शन दिल्लीच्या थ्रेशोल्ड गॅलरीमध्ये आणि मुंबईच्या केमोल्ड गॅलरीमध्ये भरले होते.

            वुड्रो विल्सन फेलो, स्मिथसोनियन इन्स्टिट्यूट, वॉशिंग्टन डी.सी. (१९८४), रॉकफेलर फेलो, युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो (१९९२), रायटर इन रेसिडेन्स, युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनिया (२००३) अशा शिष्यवृत्या आणि पुरस्कार गीव्ह पटेल यांना मिळाले आहेत.

            गीव्ह पटेल चित्रकार, कवी आणि नाटककार म्हणून प्रसिद्ध आहेत. मधूनमधून ते टीकाकाराची भूमिकाही धारण करतात. त्यांचे सगळे लिखाण इंग्रजीमधून आहे. ‘अख्खो’ नावाच्या सतराव्या शतकातल्या गुजराती संतकवीच्या कवितांचा त्यांनी अनुवाद केला आहे.

            पटेल यांचे तीन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘पोएम्स’ (१९६६), ‘हाऊ डू यू विथस्टँड, बॉडी’ (१९७६) आणि ‘मिरर्ड, मिररिंग’ (१९९१) अशी या संग्रहांची नावे आहेत. ‘प्रिन्सेस’, ‘शावाक्षा’ आणि ‘मि. बेहराम’ ही त्यांची तीन नाटके सत्तर ते नव्वदच्या दशकांत रंगभूमीवर आली. या तीन नाटकांचा संग्रह ‘सीगल बुक्स’ने प्रकाशित केला आहे. त्यांपैकी ‘मि. बेहराम’ या नाटकाचा मराठी अनुवाद शांता गोखले यांनी केला आहे. जे. कृष्णमूर्ती फाउण्डेशनच्या ऋषी व्हॅली स्कूल येथील विद्यार्थ्यांसाठी गीव्ह पटेल वर्षातून एकदा तिथे जाऊन पोएट्री वर्कशॉप घेत असतात. या उपक्रमातून सिद्ध झालेला विद्यार्थ्यांच्या कवितांचा एक संग्रह ‘पोएट्री विथ यंग पीपल’ या नावाने साहित्य अकादमीने प्रकाशित केला आहे.

            डॉ. गीव्ह पटेल २००५ मध्ये आपल्या वैद्यकीय सेवेमधून निवृत्त झाले. ते मुंबईत राहतात आणि कलाक्षेत्रातल्या आपल्या कामात पूर्ण वेळ गुंतलेले असतात. १९६० च्या दशकात चित्रकारांची एक नवी पिढी निर्माण झाली. त्यात जे महत्त्वाचे प्रवाह होते त्यांपैकी बडोदा स्कूलला समांतर अशा सामाजिक वास्तवाचे चित्रण करणाऱ्या चित्रकारांपैकी गीव्ह पटेल एक महत्त्वाचे चित्रकार मानले जातात.

- सुधीर पटवर्धन

पटेल, गीव्ह गुस्ताद