Skip to main content
x

पत्की, अशोक गोविंद

       अशोक पत्की यांनी आपल्या सहजसुंदर स्वररचनांच्या बलस्थानाने भावसंगीत, मराठी चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी आणि दूरदर्शन-आकाशवाणी या सर्व माध्यमांमध्ये स्वतःची संगीतकार म्हणून ओळख निर्माण केली आहे. त्यांचा जन्म मुंबई येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील गोविंद पत्की गिरणीमध्ये नोकरीला होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईतील गोपी टँक म्युन्सिपल शाळेत झाले आणि मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण खारच्या बी.पी.एम. विद्यालयामध्ये झाले. शंकर-जयकिशन, रोशन, नौशाद यांच्या कार्यक्रमात त्यांची बहीण मीना पत्की गात असे. त्यांना सोबत करत असतानाच पत्की यांचा संगीतक्षेत्राशी जवळून संबंध आला. केवळ तीव्र निरीक्षणशक्तीने आणि रियाझाने हार्मोनियम आणि ढोलक ही वाद्ये ते चांगल्या प्रकारे वाजवू लागले. गाण्याची उपजत समज आणि शिकण्याची ऊर्मी यामुळे त्यांनी पं. मनोहर चिमोटे यांच्याकडे वर्षभर हार्मोनियम वादनाचे धडे गिरवले. पण वर्षभरातच ही शिकवणी बंद झाली. लहानमोठ्या कार्यक्रमात वादक म्हणून जात असताना चित्रपटविश्वाची आणि संगीतविश्वाची जवळून ओळख होत होती.

     संगीत क्षेत्रातच काहीतरी करायचे असा मनाशी निश्‍चय करून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील रॉबीन बॅनर्जी, बी.एच. कोहली, राहुल देव बर्मन या संगीतकारांकडे वादक म्हणून काम केेले. वादक आणि साहाय्यक संगीतकार म्हणून काम करताना मिळालेले अनुभव, प्रतिभाशाली कलाकारांच्या भेटी आणि श्यामराव कांबळेंसारखे मार्गदर्शक आणि स्नेही यांच्यामुळे त्यांची संगीत क्षेत्राविषयीची जाण समृद्ध झाली. ‘आकाशवाणी’ या माध्यमातून नव्याने उदयाला आलेल्या ‘जिंगल्स’ या प्रांतात पत्की यांनी २० वर्षे संगीतकार आणि वादक म्हणून काम केले आहे. ‘जिंगल्स’ तयार करताना जाहिरातदारांची अपेक्षा पूर्ण करण्याच्या कसरतीमध्ये स्वरांना आणि ‘मेलडी’ला असलेले प्राधान्य राखण्याकडे एक संगीतकार म्हणून पत्की यांचा कल होता. विविध उत्पादनांच्या शेकडो जिंगल्स पत्की यांनी आजवर केल्या आहेत. राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ ही सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली जिंगल. साक्षरता प्रसारासाठी केलेली कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातील ‘पूरबसे सूर्य उगा फैला उजियाला’ ही जिंगलसुद्धा स्मरणीय झाली.

     पं. जितेंद्र अभिषेकी यांच्यामुळे अशोक पत्की यांचा नाटकाच्या संगीताशी परिचय झाला. ‘मत्स्यगंधा’ ते ‘तू तर चाफेकळी’ या नाटकापर्यंत पत्की जितेंद्र अभिषेकी यांच्याबरोबर साहाय्यक संगीतकार म्हणून काम करत होते. याच काळात ‘धी गोवा हिंदू असोसिएशन’ या नाट्यसंस्थेशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ‘आटपाटनगरची राजकन्या’ हे रत्नाकर मतकरीलिखित नाटक स्वतंत्रपणे संगीत दिग्दर्शनासाठी पत्की यांना मिळाले. त्यानंतर ‘बिऱ्हाड-बाजलं’, ‘अखेरचा सवाल’, ‘तसे आम्ही सज्जन’, ‘दिसतं तस नसतं’ या नाटकांनाही त्यांनी संगीत दिले. सुयोग या नाट्यसंस्थेचे ‘मोरूची मावशी’ हे नाटक पत्की यांनी १९८५ साली संगीत दिलेले पहिले नाटक. नाटकातल्या फार्सिकल गाण्यांसाठी त्यांनी कलाकारांमधील स्वर व ताल या क्षमतांचा उपयोग करून घेतला. या यशानंतर ‘भ्रमाचा भोपळा’, ‘ब्रह्मचारी’, ‘लग्नाची बेडी’ यासारखी सुयोगची हलकीफुलकी नाटकेही अशोक पत्की आणि प्रशांत दामले यांच्या समीकरणाने यशस्वी झाली. ‘गांधी विरुद्ध गांधी’ या गंभीर नाटकाला पत्की यांनी दिलेल्या पार्श्वसंगीताची दखलही जाणकारांनी, समीक्षकांनी घेतली. सुयोग, मुंबई मराठी साहित्य संघ, गणरंग, कलावैभव, चित्रलेखा, श्रीचित्र अशा नामांकित नाट्यसंस्थेच्या २५० पेक्षाही जास्त नाटकांना पत्की यांनी संगीत दिले आहे. नाटकांचे आणि संगीत कार्यक्रमाचे परदेशदौरे करताना त्या-त्या संस्कृतीतील संगीतकलेची वैशिष्ट्ये टिपत मराठी नाटकातूनही ते मांडण्याचे प्रयोग त्यांनी यशस्वी केले. या प्रयोगातूनच ‘जादू तेरी नजर’ हा ऑपेरा संगीतबद्ध झाला.

      अशोक पत्की यांनी १९७२ साली अशोक जी. परांजपे यांच्या गीतांना चाली देऊन सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या ‘एकदाच यावे सखया’, ‘सहज तुला गुपित’ या भावगीतांची ध्वनिमुद्रिका एच.एम.व्ही.ने काढली. ‘केतकीच्या बनी’ या गाण्यामध्ये बंगाली संगीतातील संचारीचा प्रयोग केला आणि या गाण्यांमुळे ‘मेलोडियस संगीतकार’ म्हणून त्यांची एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली.

     अशोक पत्की यांनी गीतकार शांताराम नांदगावकर यांच्याबरोबरही अनेक वर्षे काम केले. ‘कारवाँ चालला’ या मुंबई आकाशवाणीवरील सांगीतिकेपासूनच या गीतकार-संगीतकार जोडीचे सूर जुळले आणि ‘काल राती स्वप्नामध्ये’, ‘अनुरागाचे थेंब झेलती’, ‘सूर झंकारले’, ‘सजल नयन नीत धार’, ‘गा गीत तू सतारी’, ‘चंद्र वाटेवरी’, ‘हसलीस एकदा’ अशा सुरेल, मोहक गीतांनी भावसंगीतात मोलाची भर घातली. पत्की यांनी भूपेंद्रसिंग, येशूदास, कविता कृष्णमूर्ती, शंकर महादेवन, कुणाल गांजावाला, शान अशा अमराठी गायकांनाही मराठी भावगीत, चित्रपटगीत, शीर्षकगीतांसाठी आवर्जून संधी दिली. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की नव्या पिढीशी आणि पर्यायाने बदलत्या संगीत प्रवाहाशी जुळवून घेत आहेत. स्वप्निल बांदोडकर यांनी गायलेले ‘राधा ही बावरी’ हे घराघरात पोहोचलेले गाणे याची साक्ष देते. पत्की यांनी ‘दर्याच्या दे गेर’, ‘सोबीत सफर’, ‘नाईन’ अशा कोकणी गीतांनाही संगीत दिले आहे.

      पत्की यांनी संगीतदिग्दर्शित केलेला ‘पैजेचा विडा’ (१९८५) हा पहिला चित्रपट. चित्रपटाला आवश्यक अशी प्रासंगिक गीते करताना निरनिराळ्या विषयांच्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. ‘अर्धांगी’ या चित्रपटातील गीताला सर्वप्रथम राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून पुरस्कार मिळाला. ‘आपली माणसं’ (१९९२) या चित्रपटात पत्की यांनी संगीतबद्ध केलेले केवळ एकच गाणे होते. आशा भोसले-सुरेश वाडकर यांनी गायलेल्या एकमेव गीतासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. ‘नणंद भावजय’, ‘मामला पोरींचा’, ‘हेच माझं माहेर’, ‘भेट’, ‘बिनधास्त’, ‘आईशपथ’ अशा सव्वाशेहून अधिक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. १९८८ च्या सुमाराला ‘दे टाळी’, ‘किस बाई किस’, ‘एकापेक्षा एक’, ‘प्रेम करू या खुल्लमखुल्ला’ या हलक्याफुलक्या विनोदी चित्रपटांनाही पत्की यांनी संगीत दिले. २००७ साली ‘अंतर्नाद’ (कोकणी) हा राजेंद्र तालक यांचा चित्रपट आणि त्याच कथेवर ‘सावली’ (मराठी) हा चित्रपट अशोक पत्की यांनी संगीत दिग्दर्शित केला. गुरुशिष्य परंपरेचा वेध घेणारी, आईवडील आणि मुले यांच्या नात्याचा शोध घेणारी कथा आणि त्याला साजेसे संगीत प्रेक्षकांना भावले. ‘अंतर्नाद’ या चित्रपटाला ५४ वा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि ‘सावली’ या चित्रपटासाठी राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार पत्की यांना मिळाला.

     ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चरित्रकथेवर आधारित चित्रपटासाठी सुरेश भटांच्या काही गझला पत्की यांनी संगीतबद्ध केल्या. सुरेश वाडकर आणि देवकी पंडित यांनी गायलेल्या गीतांमधून आणि समर्पक स्वररचनांमधून चित्रपटाचा संघर्षमय, करुण आणि सकारात्मक विचार अधिक परिपूर्ण झाला. या चित्रपटातील स्वररचनांसाठी सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून पत्की यांना मिफ्टा पुरस्काराने सन्मानित केले. २०१२ साली आलेल्या चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘तुकाराम’ या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन अशोक पत्की आणि अवधूत गुप्ते यांनी केले. पत्की यांनी ‘शितू’, ‘अलिशा’, ‘सावरीयाँ डॉट कॉम’ या कोकणी चित्रपटांनाही संगीत दिलेले आहे.

     ‘दूरदर्शन’ मालिकांच्या ‘शीर्षकगीतां’ना दिलेले संगीत अशोक पत्की यांच्या कारकिर्दीमधील महत्त्वपूर्ण योगदान आहे. ‘गोट्या’ या मालिकेप्रमाणे ‘बीज अंकुरे अंकुरे’ हे शीर्षकगीतही अतिशय लोकप्रिय झाले. शीर्षकगीतांना भावगीतांच्या दर्जाच्या चाली देऊन ‘पिंपळपान’, ‘आभाळमाया’, ‘वादळवाट’, ‘मानसी’, ‘अधुरी एक कहाणी’ ही शीर्षकगीते घरोघरी पोहोचली.

      अशोक पत्की चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ संगीतसृष्टीमध्ये काम करताना नव्या आणि जुन्या पिढीच्या संगीतामध्ये दुवा जोडणारे आणि दोन्ही पिढ्यांना सामावून घेणारे संगीतकार आहेत.

- नेहा वैशंपायन

पत्की, अशोक गोविंद