Skip to main content
x

पत्की, बाळकृष्ण गोपाळ

पत्की, भाई

        पन्नासच्या दशकात अभिनव मुद्राक्षररचना आणि जाहिरातींच्या कल्पक मांडणीतून जाहिरात क्षेत्रात एक नवी संवेदनशीलता आणणारे संकल्पनकार बाळकृष्ण गोपाळ पत्की यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख येथे झाला. त्यांची घरची परिस्थिती गरीबीची होती त्यामुळे चित्रकला शिकून काय करणार?, अशी घरच्यांना काळजी होती. पण शालेय शिक्षण झाल्यावर पत्की मुंबईला आले. त्यांनी १९४४ साली सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला व १९४८ साली त्यांनी जाहिरातकलेतील पदविका (कमर्शिअल आर्ट) प्राप्त केली.

        जे.जे.मध्ये त्या वेळेस व्ही.एन.आडारकर उपयोजित कला विभागाचे (अप्लाइड आर्ट) प्रमुख होते आणि  चार्ल्स जेरार्ड संचालक (डायरेक्टर) होते. रंगचित्रकलेला (पेंटिंग) व्ही.एस. गायतोंडे, मोहन सामंत, तय्यब मेहता असे नंतर नावारूपाला आलेले चित्रकार पत्की यांच्याबरोबरच शिकत होते. या चित्रकार मित्रांच्या सहवासामुळे पत्की यांना चित्रकलेतले प्रवाह, रंगलेपनाचे तंत्र यांबद्दल बरेच काही शिकायला मिळाले. प्रभाशंकर कवडी, अभ्यंकर हे त्यांचे शिक्षक होते.

        त्या काळात ‘कमर्शिअल आर्ट’चा विभाग नुकताच सुरू झालेला होता. जाहिरातकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण उपलब्ध नव्हते. त्यामुळे रद्दीतली चित्रांची पुस्तके तीन रुपये किलोने विकत घ्यायची आणि त्यांतल्या चित्रांचा, जाहिरातींचा अभ्यास करायचा अशी पत्की आणि त्यांच्या सहाध्यायांची पद्धत होती.

        पत्की १९५० साली ‘शिल्पी’ या जाहिरातसंस्थेत रुजू झाले. कला संचालक (आर्ट डायरेक्टर) या नात्याने त्यांनी ‘कॅलिको’ मिल्सच्या वस्त्रप्रावरणांच्या जाहिराती केल्या व एक नवा प्रवाह भारतीय जाहिरातकलेत आणला. त्यांनी याच काळात ‘मुकुंद स्टील’च्या जाहिरातीही केल्या. ते १९५५ मध्ये भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळवून उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. लंडनच्या सेंट्रल स्कूल ऑफ आटर्स अ‍ॅण्ड क्राफ्ट्स या संस्थेत मुद्राक्षरकला (टायपोग्रफी) आणि ग्रंथनिर्मिती (बुकमेकिंग) या क्षेत्रात त्यांनी विशेष शिक्षण घेतले.

        वर्षभराच्या वास्तव्यात हर्बर्ट स्पेन्सर, सॉल बास अशा मुद्राक्षरतज्ज्ञांच्या  मार्गदर्शनाचा त्यांना लाभ झाला आणि त्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. हर्बर्ट स्पेन्सर उत्तम शिक्षक होते. ‘टायपोग्रफिका’ या मुद्राक्षरकलेला वाहिलेल्या नियत-कालिकाचे ते संपादक होते. ‘पेनरोज’ या मुद्रण क्षेत्राशी संबंधित प्रसिद्ध वार्षिकाचेही पुढे ते संपादक झाले. साधणाऱ्या रोजच्या जीवनातल्या घटकांची अनपेक्षित नाती कशी जोडायची, त्यातून वाचकाला विचारप्रवृत्त कसे करायचे याचे वस्तुपाठ पत्की यांना स्पेन्सर आणि सॉल बास यांच्या मर्मदृष्टीतून अवगत झाले. सॉल बास पन्नासच्या दशकातील हॉलिवुड चित्रपटांचे ग्रफिक डिझाइनर म्हणून प्रसिद्ध होेते. आल्फ्रेड हिचकॉकच्या चित्रपटांची भित्तिचित्रे, अनेक चित्रपटांच्या सुरुवातीच्या श्रेयनामावल्या (टायटल सिक्वेन्सेस) त्यांनी केल्या होत्या. संकल्पनात्मक मुखपृष्ठांचे जनक असलेल्या बास यांनी साधी, पण प्रतीकात्मक दृश्यभाषा विकसित केली होती.

        पत्की यांच्यावर लिओ लिओनी यांचाही असाच प्रभाव पडला. लिओनी हे ‘फॉर्च्युन’ मासिकाचे कला दिग्दर्शक (आर्ट डायरेक्टर) तर होतेच; पण ग्रफिक डिझाइनर, मुलांच्या पुस्तकांचे कथाचित्रकार (इलस्ट्रेटर) आणि लेखक म्हणूनही त्यांचा लौकिक होता. कॅलिकोचे ‘सी’ अक्षराचे बोधचिन्ह (लोगो) पत्की यांनी तयार केले, ते लिओ लिओनी यांच्या मार्गदर्शनाखाली.

        पत्की यांनी जाहिरातीच्या संकल्पनात, मांडणीत आणि मुद्राक्षररचनेत एक नवी दृष्टी आणली. ‘कॅलिको’च्या जाहिरातींमध्ये याचा प्रत्यय येतो. जाहिरातीमध्ये काळ्या आणि पांढऱ्या अशा दोनच छटांचा वापर, विषयाला अनुरूप अशी मुद्राक्षर योजना, पांढऱ्या अवकाशाचा (व्हाइट स्पेस) कलात्मक वापर आणि मांडणीतली काव्यात्म वाटावी अशी लयबद्धता ही भाई पत्की यांच्या शैलीची वैशिष्ट्ये सांगता येतील. ‘मुकुंद स्टील’साठी केलेल्या जाहिरातींमधून बा’हाउस, जर्मन किंवा स्विस मुद्राक्षर मांडणी, हर्बर्ट स्पेन्सर अशा पाश्चात्त्य परंपरेतून आलेल्या मुद्राक्षर मांडणीचा प्रभाव स्पष्ट दिसतो.

        भाई पत्की यांची ख्याती मुद्राक्षररचनेच्या क्षेत्रात झाली हे खरे असले तरी ‘लॅक्मे’च्या सौंदर्यप्रसाधनांसाठी त्यांनी रेखाटनेही (स्केचेस) तितक्याच प्रभावीपणे केली. छायाचित्रकलेतील ‘फोटोग्रम’ तंत्राचा वापरदेखील त्यांनी जाहिरातकलेत कल्पकतेने करून घेतला.

        पत्की यांनी केलेल्या जाहिरातींमागे डिझाइन या विषयाची एक व्यापक आणि शास्त्रीय दृष्टी होती. दैनंदिन जीवनातील सांस्कृतिक आशय, तसेच उत्पादित वस्तूंमागची सौंदर्यदृष्टी आपण विसरता कामा नये असे पत्की यांचे म्हणणे होते. डिझाइनरचा वर्तमानाशी संपर्क असला पाहिजे, तरच तो उद्योजकाला (क्लायन्ट) आणि त्याच्या उत्पादनांना विक्रीच्या बाबतीत आघाडीवर ठेवू शकेल; त्यासाठी सर्जकता, व्यावहारिक शहाणपण आणि गिर्‍हाइकाच्या संकल्पनेविषयीच्या समस्या सोडविण्यासाठी त्याला व्यावसायिक दृष्टी असली पाहिजे यावर त्यांचा भर होता.

        भाई पत्की यांनी केलेल्या एका जाहिरातीत पुढील वाक्य आहे : ‘तांत्रिक अवजारे प्रत्यक्ष कामातील अचूक क्षमतेवर जोखली जातात, तर माणसाची उपजत सौंदर्यवृत्ती त्यांचे परिवर्तन सौंदर्यपूर्ण वस्तूत करते.’ 

भाई पत्की यांचे जाहिरातकलेतील योगदान असेच संपर्कमाध्यमांच्या अभ्यासातून आणि तरल, सौंदर्यपूर्ण भाववृत्तीतून आलेले आहे. त्यामुळे जाहिरात क्षेत्रावर भाई पत्की यांच्या शैलीचा प्रभाव बराच काळ टिकून राहिला. भाई पत्की यांनी अभिजात चित्रकलेचाही छंद जोपासला. त्यांनी आधुनिक शैलीमध्ये केलेली चित्रेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनांमधून त्यांची चित्रे प्रदर्शित झाली इतकेच नव्हे, तर १९५५ साली व्हेनिस बिनाले प्रदर्शनात समकालीन भारतीय चित्रकलेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली होती. त्यांनी केलेल्या जाहिरातींना ‘कॅग’तर्फे (कमर्शिअल आर्टिस्ट्स गिल्ड) देण्यात येणारी पारितोषिके तर मिळालीच; पण आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेल्या दोन ग्रंथांमध्ये त्यांच्या कामाची दखल घेतली गेली.

        स्वित्झर्लंडमधील झूरिच येथून १९६२ साली प्रसिद्ध झालेल्या ‘हूज हू इन ग्रफिक आर्ट - अ न्यू व्हेंचर’ (संपादक : वॉल्टर अ‍ॅमस्टट्झ) या ग्रंथात तसेच इटलीतून १९९८-९९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या आणि फ्रेडरिक इरिडी, निकोलस ऑट व बर्नार्ड स्टीन यांनी संपादित केलेल्या) ‘टायपो : व्हेन, हू, हाऊ : टायपोग्रफी’ या ग्रंथात भाई पत्की यांचे जाहिरात-मुद्राक्षरकलेतील निवडक काम समाविष्ट करण्यात आलेले आहे.

        भाई पत्की यांच्या काळातच जाहिरातकलेच्या कक्षा विस्तारल्या. या काळातल्या जाहिरातींमधून एक नवी दृश्यभाषा (व्हिज्युअल लँग्वेज) घडत होती. वाघुळकरांच्या काळातले अभिजात चित्रकलेशी असलेले नाते, कोलटकरांसारख्यांच्या संकल्पनातील विचारगर्भ सांस्कृतिक संदर्भ आणि पत्की यांच्या दृश्यघटकांच्या मांडणीतली अभिनव सर्जकता यांनी दृश्यभाषा घडत होती. वाय.टी. चौधरीसारख्यांच्या कॉर्पोरेट आयडेंटिटी आणि पॅकेजिंग क्षेत्रातल्या कामामुळे जाहिरातकलेचे क्षेत्र विस्तारत होते. मुद्रण माध्यमाच्या कक्षा ओलांडून डिझाइन आणि दृक्संवादकला (कम्युनिकेशन आर्ट) रेडिओ, दूरदर्शन अशा नव्या संपर्कमाध्यमांद्वारा ती बहुकेंद्री होत होती.

        भाई पत्की यांनी ‘कॅलिको’च्या उत्पादनांना वेगळा चेहरामोहरा दिला. ब्रँड ही संकल्पना नंतरच्या काळात एक कलात्मक आणि आर्थिक मूल्य म्हणून शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडली गेली; पण पत्की यांनी ‘कॅलिको’चा ब्रँड प्रस्थापित केला. तोच मार्ग नंतर ‘रेमण्ड’, ‘विमल’ इत्यादींनी अनुसरला. ‘फॅशन शो’ किंवा वस्त्रसंकल्पनेचे (फॅशन डिझाइन) क्षेत्रही नंतर विकसित झाले; पण पत्कींच्या काळात त्याची सुरुवात झालेली होती.

        भाई पत्की या साऱ्या दृश्यजाणिवांचा  एक भाग होते आणि त्या घडवण्यात, संस्कारित करण्यातही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.

- दीपक घारे, रंजन जोशी

पत्की, बाळकृष्ण गोपाळ