Skip to main content
x

पटवर्धन, माधव त्र्यंबक

वी माधव जूलियन यांचा जन्म त्यांचे थोरले मामा महादेव विश्वनाथ सहस्रबुद्धे यांच्या घरी, बडोद्याला झाला. आरंभीची आठ-नऊ वर्षे ही गुजरातमधील बडोदा, भडोच, पुणे जिल्ह्यातील मुळशी पेट्यातील आवळस येथे गेली. १९०४साली ते आवळसहून बडोद्याला आले. तेथेच त्यांचे बहुतेक शालेय शिक्षण व पुढे महाविद्यालयीन शिक्षण झाले. बडोद्यातील त्यांचे वास्तव्य त्यांच्या व्यक्तिगत व वाङ्मयीन जीवनाच्या घडणीत विशेष महत्त्वाचे आहे.

त्यांच्या सुधारकी विचारांमुळे ते मामांच्या घरातून बाहेर पडून स्वतंत्रपणे राहू लागले. याच काळात त्यांच्याभोवती रा.वि.मराठे, विठ्ठलराव घाटे, शांता हेर्लेकर प्रभृतींचे काव्यप्रेमी मित्रमंडळ जमा झाले. राजकवी चंद्रशेखर यांच्याशीही त्यांचा निकटचा संबंध आला. इथेच त्यांच्या माधवनावाला जूलियनया नावाची जोड मिळून ते माधव जूलियनझाले. मारी कौरेलीच्या ॠेवी ॠेेव चरपया कादंबरीत जूलियन अ‍ॅडालेहे एक पात्र आहे. तो स्वच्छंदी, बड्या दांभिकांचे दंभ उघड करणारा, रोमॅन्टिक कवी आहे. माधवरावांची मैत्रीण शांता हेर्लेकर यांनी माधवरावांना सांगितले की, “तुम्ही त्या जूलियन अ‍ॅडालेसारखे आहात.त्यातील जूलियनहे नाव आपल्या माधवनावाला जोडून ते माधव जूलियनझाले. त्याच टोपणनावाने ते कविता लिहू लागले.

१९१६साली ते फारसी विषय घेऊन बी.ए.झाले व १९१८साली फारसी-इंग्रजी घेऊन ते एम.ए.झाले, आणि पुण्याला डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्गसन महाविद्यालयात फारसी व इंग्रजी या विषयांचे प्राध्यापक झाले. इथेच त्यांचा सर्व तर्‍हेच्या नवतेचा उत्साहाने पुरस्कार करणार्‍या श्री.बा.रानडे यांच्याशी स्नेह जमला. यातूनच आधुनिकतेचा जीवनात व साहित्यात हिरिरीने पुरस्कार करणार्‍या रविकिरण मंडळाची स्थापना झाली (९सप्टेंबर १९२३). या वातावरणात, मित्रांच्या सहवासात माधवरावांचे कवित्व बहरले; त्यांना प्रतिष्ठा, मान्यता मिळत गेली.

अशा चढतीच्या काळातच त्यांच्यावर मोठा आघात झाला. डेक्कन एज्युकेशन सोसायटीतील काही विरोधकांच्या कटकारस्थानांनी माधवरावांना प्रथम दोन वर्षे निर्वेतन रजेवर जावे लागले, आणि नंतर सोसायटीचा राजीनामा द्यावा लागला (१९२५). या मधल्या दोन वर्षांत माधवरावांनी अंमळनेरच्या प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी केली (१९२४ ते १९२६). तेथून सुटल्यावर १९२६ ते १९२८ या दोन वर्षांत त्यांनी पुण्याच्या भावे स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी केली. त्यानंतर १९२८सालापासून अखेरपर्यंत (१९३९) त्यांनी कोल्हापूरला राजाराम कॉलेजात फारसी व इंग्रजी विषयांचे प्राध्यापक म्हणून काम केले. राजाराम कॉलेजात रुजू होण्यापूर्वी  त्यांनी गंगूताई गरुड (विवाहानंतर लीलाबाई पटवर्धन) यांच्याशी लग्न केले (२९मे १९२८). यापुढे लौकिकार्थाने त्यांच्या जीवनास स्थैर्य आले. १९३६साली जळगावला भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले. फेब्रुवारी १९३९ मध्ये त्यांना छंदोरचनाया बृहत् ग्रंथासाठी मुंबई विद्यापीठाची सर्वोच्च अशी डी.लिट.पदवी मिळाली. असे चढतेवाढते यश मिळत असतानाच, पुण्यात नव्यानेच बांधलेल्या (१९३६) आपल्या निवान्तया बंगल्यात, अवघ्या शेहेचाळिसाव्या वर्षी २९नोव्हेंबर १९३९ या दिवशी या अशांत आत्म्याला चिरशांती मिळाली.

मराठी साहित्य-संस्कृतीच्या क्षेत्रात माधवरावांनी मोलाचे वाङ्मयीन कार्य केले असले, तरी त्यांची पहिली, मुख्य ओळख कवी- माधव जूलियन म्हणूनच आहे. काव्यक्षेत्रात माधवरावांचे कार्य चतुर्विध आहे. त्यांनी प्रत्यक्ष स्फुट, दीर्घ काव्यरचना केली; उमरखय्यामच्या रुबायांचे तीन वेळा, तीन प्रकारांनी भाषांतर केले; काव्यविचार केला, काव्यसमीक्षा केली; आणि पद्यरचनाशास्त्रावर छंदोरचनाहा बृहत् ग्रंथ निर्माण केला. त्यांचे स्फुट काव्याचे संग्रह: गज्जलांजलि’ (१९३३, १०८ गज्जल); ‘स्वप्नरंजन’ (१९३४, ११३ स्फुट भावकविता); आणि मधुलहरी व इतर कविता’ (प्रकाशन माधवरावांच्या निधनोत्तर-१९४०, २६ स्फुट भावकविता). यांखेरीज तुटलेले दुवेहा सुनीतसंग्रह अथवा सुनीतमाला (१९३८, १०१ सुनीते). गज्जलांजलिमध्ये सामान्यतः फारसी वृत्तांमधील गज्जलांचा संग्रह आहे. प्रस्तुत पद्यसंग्रह हा एक हौसेचा प्रयोग आहे.’ (माधव जूलियन, प्रस्तावना). यातील बहुसंख्य गज्जला या प्रेमविषयक आहेत. फारसीतील गज्जल हा पद्यप्रकार त्यांनी मराठीत आणला; अनेक फारसी वृत्ते मराठीत आणली; पुढील कवींना अभिव्यक्तीसाठी अनेक पद्यरचनाबंध उपलब्ध करून दिले. माधवरावांनी फारसी गज्जलांची वृत्ते वापरली; पण फारसी गज्जलांतील अनेक शेरांची साखळी असे त्यांचे स्वरूप न ठेवता, त्या स्वतंत्र-स्वयंपूर्ण मराठी भावकविता केल्या.

स्वप्नरंजनहा त्यांच्या भावकवितांचा दुसरा, महत्त्वाचा संग्रह. याच्या प्रस्तावनेत माधव जूलियनांनी लिहिले आहे, ‘आत्मरचनेसाठी आरंभ केला, तरी काव्याची समाप्ती ही रसिकरंजनासाठीच असते.या कवितांतून माधव जूलियनांच्या भावजीवनाची सलग प्रतीती येते. यांतल्या बर्‍याच कविता ह्या आत्मभावजीवनाचा आविष्कार करणार्‍या आहेत; त्यांची ध्येयवादी, तत्त्वनिष्ठ भाववृत्ती आणि व्यावहारिक जीवनात होणारी तिची ओढाताण यांचा आविष्कार यांतील अनेक कवितांतून होतो. या संग्रहात काही नाट्यगीतेही आहेत. संसारात स्थिर झालेले, कुटुंबवत्सल माधवराव मधुलहरी आणि इतर कविताया संग्रहातील अनेक कवितांतून दिसतात. तरी अजूनही काही कवितांतून अंतरंगातील ओढाताण उसळून येतेच. यात काही कविता सामाजिक जाणिवेच्याही आहेत.

तुटलेले दुवेहा माधवरावांनी वेळोवेळी लिहिलेल्या १०१ सुनीतांचा संग्रह आहे. माधवरावांनी केलेले सुनीतरचनेचे अनेक प्रयोग या संग्रहात आहेत. म्हटले तर हा स्वतंत्र, सुट्या सुनीतांचा संग्रह आहे; पण ही सुनीते एका धूसर, विफल प्रेमकहाणीच्या सूत्रात गुंफलेली असल्याने ती एक अखंड सुनीतमालिकाही आहे.

माधवरावांनी उमरखय्याम या पर्शियन कवीच्या (तो केवळ कवी नव्हता, उत्तम गणिती; खगोलशास्त्रज्ञही होता) रुबायांचे तीन वेळा, तीन वेगवेगळ्या प्रकारांनी भाषांतर केले आहे. उमरखय्यामकृत रुबायामध्ये मूळ पर्शियन रुबायांचे यथामूल भाषांतर केलेले आहे. फिज्जेरल्डने उमरखय्यामच्या काही फारसी रुबायांचे जे स्वतंत्र रूपांतर इंग्रजीत केले, त्याच्या पहिल्या आवृत्तीचे द्राक्षकन्याहे निवळ भाषांतर आहे. मधुलहरीहे फिज्जेरल्डच्या रुबायांच्या भाषांतराच्या चौथ्या आवृत्तीचे यथामूल भाषांतर आहे. यात फिज्जेरल्डने सव्वीस रुबायांची भर घातलेली आहे.

विरहतरंग’ (१९२६) सुधारक’ (१९२८), ‘नकुलालङ्कार’ (१९३९) ही माधवरावांची तीन दीर्घ कथाकाव्ये. विरहतरंगहे हळवे, तरल प्रेमकाव्य आहे. प्रभाकर हा काव्यात्मक वृत्तीचा महाविद्यालयीन तरुण, आणि इंदू ही विधवा महाविद्यालयीन तरुणी यांच्या काहीशा गूढतरल प्रेमसंबंधांची कहाणी यात आहे (३३ तरंग, २३२ श्लोक). सुधारकमध्येही प्रेमभावनेची विविध चित्रे आहेत, पण ते एक सामाजिक दीर्घकाव्यही आहे. बोलक्या सुधारकांच्या पार्श्वभूमीवर वासू हा आदर्श सुधारक, हा नायक या दीर्घकथाकाव्यात उभा केलेला आहे. याचे उपोद्घात, उपसंहार आणि अठरा अध्याय आहेत. नकुलालङ्कारमध्ये (४४ खंड) नकुल ही खटपटी-लटपटी व्यक्ती अखेरीस एका विद्यापीठाची कुलगुरू कशी होते याची अलंकारिक भाषेत सांगितलेली चित्रकहाणी आहे. मोरोपंती थाटाचे हे दीर्घकथाकाव्य असल्याने त्यातील भेदक उपरोध हा दुर्लक्षित राहिला आहे. साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रांतील अनाचारांचे परखड दर्शन यात घडविलेलेे आहे.

भावपूर्ण पंडित कवी

प्रत्यक्ष काव्यनिर्मितीबरोबर माधवरावांनी काव्यविचार व काव्यसमीक्षाही केलेली आहे. त्यांच्या अशा लेखांचे काव्यविहार’ (१९४७) व काव्यचिकित्सा’ (१९६४) हे दोन संग्रहही आहेत. काव्याचे जे बहिरंग पद्यरचना, त्याचे समग्र आलोकन करून त्यांनी छंदोरचना’ (आ.१, १९२७, आमूलाग्र नवसंशोधित द्वितीयावृत्ती, १९३७) हा बृहत्ग्रंथ सिद्ध केला. या ग्रंथासाठीच त्यांनी मुंबई विद्यापीठाची डी.लिट.ही सर्वोच्च पदवी संपादन केली. माधवराव हे मराठीतील पहिले डी.लिट. (फेब्रुवारी १९३९) होत. शाळेतील शिक्षकांना उपयुक्त व्हावे या हेतूने यानंतर माधवरावांनी पद्यप्रकाश’ (१९३८) हे छोटेखानी पुस्तक तयार केले.

याखेरीज माधवरावांनी फारसी-मराठी-कोशसिद्ध केला (१९२५). मराठीमधील हा पहिलाच फारसी-मराठी-कोश’. या दिशेने नंतर हे काम डॉ.यू.म.पठाण यांनी पुढे नेले.

मराठी साहित्य व भाषा यांच्या सर्वांगीण उन्नतीकडे माधवरावांचे लक्ष होते. मराठी भाषेवरील हिंदी व इंग्रजी भाषांच्या आक्रमणाविरुद्ध त्यांनी भाषाशुद्धीची चळवळ केली. भाषाशुद्धीच्या चळवळीमागील माधवरावांची भूमिका सांस्कृतिक होती. भाषाशुद्धीवरील त्यांचे लेख, भाषणे यांचा संग्रह त्यांनी भाषाशुद्धिविवेक’ (१९३८) या नावाने काढला होता. भाषाशुद्धीया शब्दप्रयोगामुळे काही चुकीचा समज होण्याचा संभव असतो. म्हणून त्यांनी एका लेखात र्झीीळीाया शब्दाऐवजी डुरवशीहळीाहा शब्द वापरला आहे. भाषाशुद्धीची चळवळ ही स्वत्वसंरक्षणाची आणि स्वत्वसंवर्धनाचीआहे. भाषाशुद्धीबरोबरच लेखनशुद्धीवरही त्यांनी काही लेख लिहून मराठी लिपीमध्ये काही सुधारणा सुचवल्या.

मराठी रसिकांना, जाणकारांना माधवराव पटवर्धनांची मुख्य ओळख कवीम्हणून आहे - त्यातही प्रणयपंढरीचा वारकरीम्हणून आहे. वासनाविरहित, निरपेक्ष, उत्कट प्रेमाची ओळख त्यांनी मराठी मनाला करून दिली. त्यांनी फारसी वृत्तांमध्ये पद्यरचना करून मराठी कवींना त्या वृत्तांची माहिती करून दिली, आणि काव्यरचनेसाठी अनेक नवे पद्यबंध उपलब्ध करून दिले. त्यांनी मराठी छंदोविचारांचा भरभक्कम पाया घालून दिला. ना.ग.जोशी यांनी याच दिशेने मराठी छंदोविचार पुढे नेला.

माधवरावांना पंडित कवीअसे संबोधण्याची एक प्रथा आहे. पण, त्यांच्या एकंदर लेखनात कवित्व आणि पांडित्य एकमेकांवर मात करीत नाहीत, या दोन्ही प्रवृत्ती परस्परपूरक व पोषक होतात. मराठी भाषेचा व इतिहासाचा प्रखर अभिमान त्यांनी जागवला. स्व (मराठी) भाषेचा विचार व वापर गंभीरपणाने, जागरूकपणाने करावयाला हवा याची तीव्र जाणीव त्यांनी मराठी माणसांमध्ये निर्माण केली. आज तर अशा जाणिवेची निकडीची गरज आहे.

- प्रा.डॉ.सु.रा.चुनेकर

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].