पटवर्धन, विनायक भाऊसाहेब
महर्षी अण्णासाहेबांचे घराणे मूळचे सरदारी बाण्याचे होते. कोकणात पेशव्यांच्या आरमाराचे अधिपती धुळप म्हणून होते. त्यांच्या पदरी अण्णासाहेबांचे पूर्वज फडणीसपदी काम करीत असत. त्यानंतर त्यांचे पिताश्री यांनी वकिलीची परीक्षा देऊन मुंबईत वकिली केली. तथापि, तेथील हवा न सोसल्याने त्यांनी पुण्यात शनिवारवाड्याजवळ घर बांधून तेथे हे कुटुंब राहावयास आले. त्यांचे वडील भाऊसाहेब हे एक रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचे, विलासी स्वभावाचे होते. त्यांची पत्नी साध्वी जानकीबाई होत्या. यापण करारी आणि स्वाभिमानी होत्या, तसेच त्या तपस्वी व अत्यंत श्रद्धाळू होत्या. पटवर्धनांचे कुलदैवत गजानन होते.
त्या रोज ओंकारेश्वर, गुंडाचा गणपती व भिकारदास मारुतीच्या दर्शनाला जात असत. त्यांना मुली झाल्या; पण पुत्र संतान झाले नव्हते, म्हणून जानकीबाईंनी गुंडाच्या गणपतीला प्रदक्षिणा घातल्या. कठोर तपाचरण केले. त्याचे फळ म्हणजे वैशाख वद्य चतुर्थीला, शके १७६९ रोजी त्यांना पुत्ररत्न लाभले. त्याचे नाव ‘विनायक’ असे ठेवले, ते हे महर्षी अण्णासाहेब होत. त्यांच्या पाठीवर २—३ वर्षांनी त्यांना एक भाऊ झाला. त्याचे नाव नारायण होते. आईचा देवदर्शनाचा नेम ते अत्यंत श्रद्धेने करीत असत. अण्णासाहेबांचा विवाह दामल्यांच्या रमाबाई यांच्याबरोबर झाला. त्यांना एक मुलगा व एक मुलगी झाली.
अण्णासाहेब हे तैलबुद्धीचे होते आणि त्यांची अफाट स्मरणशक्ती होती. त्यांचे राहणीमान श्रीमंती थाटाचे व ऐटबाज होते. पुण्यात डेक्कन कॉलेजमध्ये बी.ए. पदवी संपादन केल्यावर पुढे सन १८६८ ते १८८० पर्यंत ते मुंबईस होते. तेव्हा त्यांनी एलएल.बी. व एल.एम. अॅण्ड एस. या लॉ व वैद्यकीय शिक्षणाच्या पदव्या संपादन केल्या. त्याबरोबर आयुर्वेदाचाही अभ्यास केला.
पुण्यात आल्यावर त्यांनी वैद्य महादेवशास्त्री लागवणकर यांच्याकडे आयुर्वेदाचे शिक्षण घेतले. वडिलांच्या सांगण्याप्रमाणे विनायकरावांनी प्रथम वकिलीचा व्यवसाय पुणे येथे राहून उत्तम प्रकारे केला. विद्यार्थिदशेत त्यांनी सामाजिक चळवळीत भाग घेतला होता. पुढे त्यांनी म.गो. रानडे, विष्णुशास्त्री पंडित, लोकमान्य टिळक यांच्याबरोबर सामाजिक व राष्ट्रीय कार्यात पुष्कळ सहभाग घेऊन कार्य केले. तथापि, सुधारकांची अभिमानशून्यता, आर्य संस्कृतीचे अज्ञान, त्याबद्दलची उदासीनता पाहून त्यांनी या लोकांना रामराम ठोकला. त्यानंतर त्यांनी त्या वेळच्या म्युनसिपालिटीच्या निवडणुका लढविल्या व त्यांत ते निवडून येत असत. त्या वेळी त्यांनी समाजहिताची पुष्कळ कामे केली. संस्थानी चळवळीत त्यांनी सहभाग घेतला. त्यांची प्रकरणे कोर्टात चालविली.
पुण्यात अण्णासाहेबांनी माधवराव नामजोशी यांच्या मदतीने ‘किरण’ नावाचे मराठी आणि ‘डेक्कन स्टार’ नावाचे इंग्रजी पत्रक सुरू केले. पुढे नामजोशींना ते काम जमेना म्हणून ते बंद झाले. पुढे ‘केसरी’ व ‘मराठा’ ही पत्रके सुरू झाली. ते मोठ्या अभिमानाने म्हणत असत की, ‘‘या दोन्ही वर्तमानपत्रांचे डिक्लरेशन माझ्या हातचे आहे.’’ ते मद्रासला एका प्रकरणाच्या कामानिमित्ताने सुमारे ३—४ वर्षे होते. मद्रासच्या वास्तव्यात त्यांची भेट रामचंद्र अय्यास्वामींशी पडली. त्यांच्यामुळे कांचीपीठाशी त्यांचा संपर्क झाला होता. त्या वेळी त्यांना अनेक प्रकारच्या मंत्रशास्त्राची माहिती झाली होती. त्याच वास्तव्यात त्यांना घटसर्पाच्या आजारातून अंतकाळचा देखावा दिसला. त्यातून ते बरे झाले; पण त्यांच्यात फार मोठे परिवर्तन झाले. ते केवळ पंचा—उपरण्यावर राहू लागले. डोक्यास मुंडासे बांधत असत. मुलांच्या मुंजीनिमित्ताने ते पुण्यास आले; परंतु तेथून परत कोठेही गेले नाहीत. (फक्त आळंदीस गुरुस्थान म्हणून जात असत.)
कांचीच्या महाराजांनी अण्णासाहेबांचा गौरव अशा शब्दांत केला होता की, ‘‘हा कोहिनूर हिरा आहे. हा साक्षात दक्षिणेकडचा अगस्ती आहे.’’
सरदार रायरीकर यांच्यामुळे आळंदीच्या नृसिंह सरस्वती स्वामींची भेट झाली होती. हेच अण्णासाहेबांचे गुरू होते. त्यांच्याकडे येणे—जाणे वाढले होते. योगमार्गाचा अभ्यास झाला होता. एकदा स्वामींनी त्यांना सांगितले, वकिली बंद करून वैद्यकीय व्यवसाय सुरू करावा. त्याप्रमाणे ते रुग्णांना आयुर्वेदाप्रमाणे चिकित्सा आणि औषधे देऊ लागले. आता त्यांच्यातील दैवी शक्तीचा अनुभव सर्वांना येऊ लागला.
अण्णासाहेब यांच्याकडे गरीब, श्रीमंत, सर्व जाती-धर्मांचे लोक येत असत. ते सर्वांना समान वागणूक देत असत. त्यांनी अनेकांना फार मोठ्या असाध्य रोगांतूनही बाहेर काढले होते. एकूणच दैवी योजनेचे काम सुरू होते. त्यांना नाडीपरीक्षेचे दर्शन, स्पर्शन व प्रश्न यांचे जबरदस्त ज्ञान होते. अशा प्रकारे वैद्यकीय सेवा-कार्य सुरू होते.
मद्रासहून पुण्यात परतल्यावर त्यांचा सर्वप्रकारे सर्वसंग परित्याग झाला होता. पारमार्थिक गुणांचा आविष्कार प्रकट होत होता. जरी पेहराव व रूप बदलले असले, तरी त्यांची तेजस्विता कमी झाली नव्हती. नेहमी प्रसन्न मुद्रा असे. ते हास्यविनोद करीत असत. बराच काळ ते रुग्ण तपासत असत. इतर वेळी ते साधनेत असत. त्यांची झोप अत्यल्प होती. आहारही अत्यंत अल्प झाला होता. अण्णासाहेब संध्या वंदन, श्रीगुरुचरित्र ग्रंथ वाचन, विष्णुसहस्रनामाचा पाठ करीत असत; तसेच त्यांचा योगाभ्यासही होता. ते रोज ओंकारेश्वर मंदिर, गुंडाचा गणपती यांचे दर्शन घेत असत.
ते लोकमान्य टिळकांसह अनेकांचे गुरू होते. ते एक श्रद्धास्थान होते. याशिवाय महात्मा गांधी, अरविंद घोष, दादासाहेब खापर्डे, काळकर्ते परांजपे, डॉ. नानासाहेब देशमुख, या सर्वांच्या त्यांच्याशी गाठीभेटी झाल्या होत्या. काहींचे सातत्याने येणे-जाणे होते. असे हे धैर्यशील, साहसी, नि:स्वार्थी, त्यागी, अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे नि:संगता, परोपकार बुद्धीचे थोर दैवी गुणसंपत्तीचे अण्णासाहेब होते.
एकूणच मद्रासहून १८८४ साली पुण्याला परत आल्यावर १९१७ पर्यंत म्हणजे ३३ वर्षे ते अशा उन्मनी स्थितीत होते. १९०२ साली त्यांच्या पत्नी निवर्तल्या. त्यानंतर शके १८३९ माघ शुद्ध एकादशीस, १९१७ साली त्यांनी देह सोडला. पुण्यात ओंकारेश्वराजवळच्या नदीपात्रात त्यांच्यावर अग्निसंस्कार झाला. पुणे येथे लोकांनी त्यांची समाधी बांधली आहे. तेथे आजही त्यांचा उत्सव संपन्न होत असतो.