Skip to main content
x

पुजारी, दशरथ धनकोडी

शरथ धनकोडी पुजारी यांचा जन्म बडोदा येथे झाला. त्यांचे वडील हे आयुर्वेदाचार्य व मालीशतज्ज्ञ होते. त्यांच्या आईचे नाव कमलाबाई होते. पुजारी यांचे आई-वडील सुरुवातीला मुंबईमध्ये राहत. पुढे बडोद्याच्या राजांच्या व्याह्यांवर उपचार करण्याकरिता ते बडोद्याला गेले. दशरथ पुजारी यांचे शालेय शिक्षण मुंबईतील युनियन हायस्कूलमध्ये झाले. तेव्हा ते मुंबईतील गिरगाव भागात राहत होते. नंतर त्यांनी आई-वडिलांसोबत मुंबई सोडून बार्शी येथे स्थलांतर केले. तेथे योगायोगाने त्यांना शास्त्रीय गायक गोपाळ भातंबरेकर यांचा शेजार लाभला. गोपाळ भातंबरेकरच पुजारी यांना गुरू म्हणून लाभले.                                           

आपल्याला गायन जमणार नाही या भीतीपोटी एच.एम.व्ही. कंपनीच्या अधिकाऱ्यांना भावगीते गायला नकार देणारे पुजारी पुढे भावगीत क्षेत्रात गायक, संगीतकार म्हणून गजानन वाटवे, सुधीर फडके यांच्या पंक्तीत जाऊन बसले. त्यांनी अनेक गीतांना चाली लावल्या.
सुरुवातीला जे. एल. रानडे, जी. एन. जोशी, ज्योत्स्ना भोळे यांची गाणी ऐकून पुजाऱ्यांनी भावगीतांचा अभ्यास केला. गीतांना चाली लावण्याचा छंदच त्यांना जडला. पुढे त्यांनी ‘श्रीराम घनश्यामा’ व ‘हास रे मधु हास ना’ ही दोन गीते, संगीत दिग्दर्शकाच्या भूमिकेतून स्वरबद्ध केली व ती प्रमोदिनी देसाई यांनी सुरेल आवाजात गायिली, आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने पुजारी यांच्या संगीत दिग्दर्शकाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली.
१९५२ साली ते आकाशवाणीची स्वरचाचणी देऊन आकाशवाणीवर नियमित गाऊ लागले. डोळसपणे संगीताची दुनिया पाहणारा व अनुभवणारा सुजाण संगीतकार, गायक म्हणून पुजारी यांची प्रतिमा निर्माण झाली. त्यांनी संगीत दिग्दर्शक या नात्याने सुमन कल्याणपूर, माणिक वर्मा, सुलोचना चव्हाण, मधुबाला जव्हेरी, शोभा गुर्टू, उषा वर्तक, कुमुद भागवत, वाणी जयराम इत्यादी गायकांकडून उत्तमोत्तम गाणी गाऊन घेतली. पुजारी यांनी ध्वनिमुद्रित केलेली भावगीते, भक्तिगीते, युगुलगीते विलक्षण लोकप्रिय ठरली.
‘रिमझिम झरती श्रावणधारा’, ‘केशवा माधवा’, 'वाऱ्यावरती घेत लकेरी’, ‘जगी ज्यास कोणी नाही’, ‘मृदुलकरांनी छेडीत तारा’, ‘आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे’, ‘आस आहे अंतरी या’, ‘रात्र आहे पौर्णिमेची’, ‘ऊर्मिला मी निरोप तुज देता’, ‘चल ऊठ रे मुकुंदा’, ‘जुळल्या सुरेल तारा’, ‘ते नयन बोलले काहीतरी’, ‘देव माझा विठू सावळा’, ‘नकळत सारे घडले’, ‘नंदाघरी नंदनवन फुलले’, ‘पैंजण रुमझुमले’, ‘प्रीत सागरी तुझ्या स्मृतीचे’ इ. सुमन कल्याणपूर यांनी गायिलेली व पुजारी यांनी स्वरबद्ध केलेली गाणी अविस्मरणीय ठरली, तर माणिक वर्मांनी गायिलेली, ‘कृष्णा पुरे ना थट्टा किती ही’, ‘चरणी तुझिया मज देई वास हरी’, ‘जनी नामयाची रंगली कीर्तनी’, ‘त्या सावळ्या तनूचे मज लागले’, ‘नका विचारू देव कसा’, ‘निळ्या नभातून नील चांदणे’, ‘या मुखीचे कौतुक केले’, ‘रंग रेखा घेऊनी मी भावरेखा रेखिते’, ‘क्षणभर उघड नयन देवा’ इ. हृदयस्पर्शी गीतेही पुजारींनीच संगीतबद्ध केली आहेत.
त्यांनी सुरेख चाली लावलेल्या गीतांना सुरेश वाडकर, गोविंद पोवळे, रवींद्र साठे, उषा मंगेशकर, सरस्वती राणे, जयवंत कुलकर्णी, सुधा मल्होत्रा, मोहनतारा अजिंक्य, अपर्णा मयेकर, आशा भोसले यांसारख्या मान्यवर गायक कलाकारांचा आवाज लाभला व त्या रचना लोकप्रिय झाल्या. कवी म.पा.भावे लिखित ‘गीत कृष्णायन’ हा काव्यसंग्रह पुजार्‍यांनी स्वरबद्ध केला. त्याचे ५०० हून अधिक जाहीर कार्यक्रम झाले. हिंदीतील सुप्रसिद्ध पार्श्वगायक महंमद रफी यांच्याकडून त्यांनी फिरोज जालंदरी यांची ‘तू है दिलबर तो मैं हूँ दीवाना’ ही उत्कृष्ट गझल गाऊन घेतली.
दशरथ पुजारी हे एक उत्तम हार्मोनिअमवादक होते. परंतु त्यांच्या स्वत:च्या गळ्यातून निघणारा स्वर हा हातातल्या हार्मोनिअम वादनावर कधीच अवलंबून नव्हता. भावगीतातल्या अवघड जागाही योग्य त्या नजाकतीने त्यांचा सूर उलगडून दाखवत होता. त्यामागे दशरथ पुजारी यांनी केलेली रागदारी गायनाची मेहनत होती. दशरथ पुजारी यांनी गीताला अर्थानुसार चाली दिल्या व त्यामुळेच त्या गीतांतील भाव रसिकांच्या मनांपर्यंत परिणामकारकरीत्या पोहोचले. या दृष्टीने दशरथ पुजारी यांचे सुगम संगीत क्षेत्रातील योगदान महत्त्वाचे व लक्षणीय ठरले आहे.
‘अजून त्या झुडुपांच्या मागे’, ‘मी नयन स्वप्नवेडा’, ‘अशीच अमुची आई असती’, ‘पावन खिंडीत पावन झालो’, ‘का ग रुसलासी कृपाळू बा हरी’ इ. भावपूर्ण गीते गायिलेल्या दशरथ पुजारी यांचे ‘भावगीत’ विश्वातले स्थान अढळ आहे. दशरथ पुजारी यांना ‘पी. सावळाराम’ पुरस्कार, ‘ग.दि.मा.’ पुरस्कार व ‘झी-मराठी’चा ‘जीवन गौरव’ पुरस्कार यांनी गौरवले गेले.

डॉ. प्रकाश कामत

पुजारी, दशरथ धनकोडी