पुंडे, दत्तात्रय दिनकर
मराठी वाङ्मयाच्या इतिहासात एक जाणकार समीक्षक दत्तात्रय पुंडे यांनी पुणे विद्यापीठाची बी.ए. (१९६५), मुंबई विद्यापीठाची एम.ए. (१९६९) आणि पुणे विद्यापीठाची पीएच.डी. (१९८०) या पदव्या मिळविलेल्या आहेत. १९५८ ते १९६४ या काळात शासकीय कर्मचारी म्हणून नोकरी केली होती. त्यानंतर १९७० ते १९७२ या काळात पुणे कॉलेज येथे व १९७२ ते १९८५ या काळात पुण्याच्या मॉडर्न महाविद्यालयामध्ये मराठीचे अध्यापन केले.
पुंडे यांचे सर्व लेखन समीक्षापर आहे. ‘कुसुमाग्रज-शिरवाडकर एक शोध’, ‘वाङ्मयीन निरीक्षणे’, ‘मन्थन - एक वैचारिक आलेख’, ‘निबंध कसा लिहावा’, ‘भारताचा सांस्कृतिक वारसा आणि स्वामी विवेकानंद’, ‘सुलभ भाषाविज्ञान’, ‘कुसुमाग्रजांच्या प्रतिभेचा उगम आणि विकास’, ‘वाङ्मयीन अवलोकन’ या पुस्तकांबरोबरच काही पुस्तकांचे सहलेखनही त्यांनी केलेले आहे.
‘लोकवाचन’, ‘व्यावहारिक मराठी’, ‘भाषाविज्ञान परिचय’, ‘वाङ्मयेतिहास: सद्यःस्थिती आणि अपेक्षा’ (सहलेखक- गो. म. कुलकर्णी), ‘पुन्हा वामन मल्हार’ (सहलेखक- गो. म. कुलकर्णी), ‘भयंकर सुंदर मराठी’. ही त्यांची साहित्यसंपदा असून ‘वाङ्मयेतिहासाची संकल्पना’, ‘त्रिदल’, ‘गांधीवाद आणि आधुनिक मराठी साहित्य’, ‘उजळती लकेर’ (वि.शं.पारगावकर यांच्या निवडक कथा) ही त्यांनी संपादन केलेली उल्लेखनीय ग्रंथसंपदा आहे. ‘त्रिदल’ या काव्यविषयक संपादित पुस्तकाच्या एकूण सोळा आवृत्त्या निघालेल्या आहेत.
‘अक्षर दिवाळी’ (१९८५), ‘महाराष्ट्रातील जातिसंस्थाविषयक विचार’, ‘वाङ्मयीन वाद’, ‘वाङ्मयाचे अध्यापन’, ‘साहित्यविचार’, ‘आजचे नाटककार’, ‘सयाजी नगरीतील साहित्यविचार’ इत्यादी पुस्तकांच्या संपादनातही त्यांचा सहभाग आहे.
एकूणच भाषाविज्ञान, व्याकरण, ललितगद्य, साहित्यविचार या विविध विषयांवर त्यांचे अभ्यासपूर्ण लेखन आहे. ‘भयंकर सुंदर मराठी’ हे पुस्तक भाषेच्या संदर्भातील ललित-गद्य आहे. मराठी बोली भाषेतील गंमती-जमती त्यामध्ये कलात्मकरीतीने रेखाटल्या आहेत.
मराठीतील वाङ्मयेतिहाची संकल्पना आणि समीक्षा हे त्यांच्या आवडीचे आणि अभ्यासाचे विषय आहेत. त्यादृष्टीने वाङ्मयेतिहास आणि समीक्षा यांच्या संदर्भातील सखोल चिंतन आणि मनन पुंडे यांच्या लेखनामधून दिसते. मराठी वाङ्मयाच्या इतिहासात त्यांचे हे योगदान मोलाचे आहे.
- संपादक मंडळ