Skip to main content
x

पवार, दिनकर गोविंद

आप्पासाहेब पवार

       दिनकर गोविंद पवार यांचा जन्म बारामतीपासून जवळच असलेल्या काटेवाडी येथे झाला. नंतर पवार कुटुंब बारामतीला राहायला आले. त्यांच्या आईचे नाव शारदाबाई होते. त्या अतिशय कर्तबगार होत्या. मराठा समाजातील महिला ज्या काळात चार भिंतींच्या आत अडकून पडल्या होत्या त्या काळात शारदाबाई निवडणुकीत उभ्या राहून निवडून आल्या व पुणे जिल्ह्यातील बांधकामसमितीच्या अध्यक्षही झाल्या. शारदाबाईंनी आपल्या मुलाबाळांवर राष्ट्रभक्तीचे संस्कार केले. ‘चले जाव’ चळवळ सुरू झाली, तेव्हा पवार १३ वर्षांचे होते. त्यांच्या बालमनावर या चळवळीचा नकळत परिणाम घडून आला व १९४४ साली बारामतीला सेवा दल स्थापन झाल्यावर आप्पासाहेब कॉटन मार्केट येथील शाखेचे प्रमुख बनले होते.

       कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेसाठी गोविंदराव व शारदाबाई या दाम्पत्याने देणगी गोळा करण्याचे काम स्वीकारले होते. यामुळे दिनकर पवार भाऊरावांच्या संपर्कात आले व त्यांनी संस्थेच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेण्याचे ठरवले. सुस्थितीत असलेल्या कुटुंबातील मुलगा वसतिगृहात सर्व जातीजमातींच्या मुलांसोबत राहून शिकणार या कल्पनेला, तेव्हा अनेकांनी विरोध केला होता; पण पवार यांचा निर्धार ठाम असल्यामुळे ते या वसतिगृहात दाखल झाले. रयत शिक्षण संस्थेतूनच पवार मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. नंतर त्यांनी पुण्यातील कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. (कृषी) ही पदवी संपादन केली. अंगभूत नेतृत्वगुणामुळे ते महाविद्यालयाचे विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस झाले. त्यांना खेळाची आवड असल्यामुळे ते कुस्ती स्पर्धेत भाग घेत. पवार १९५४ साली पदवीधर होऊन बाहेर पडले तेव्हा देशातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर परिसरात सुरू झाला होता. त्यांनी नोकरीसाठी साखर कारखान्यात अर्ज केला. त्यांच्या तोंडी ग्रामीण भाषा असली तरी त्यांना आधुनिक कृषिशास्त्राची भक्कम बैठक असल्यामुळे पद्मश्री विखे-पाटील यांनी पवारांना साखर कारखान्यात नोकरीवर नियुक्त केले. साखर कारखान्याबाबत सर्वांगीण माहिती देणारा अहवाल डॉ.धनंजय गाडगीळ यांना हवा होता. तो तयार करण्याचे काम पवार यांच्यावर सोपवण्यात आले. सर्वांगीण प्रकल्प पूर्तता अहवाल तयार करण्यासाठी पवारांनी साखर कारखान्याच्या सर्व खातेप्रमुखांशी संपर्क साधला व विविध खात्यांचा समग्र अभ्यास करून अहवाल तयार केला. या परिश्रमातून चार वर्षांच्या काळात एक साखरतज्ज्ञ, कुशल प्रशासक आणि सामाजिक कार्यकर्ता या रूपाने पवार यांचे व्यक्तिमत्त्व साकारले. साखर कारखान्यातील सर्व खातेप्रमुखांचे पवार हे प्रमुख सल्लागार आणि पर्यायाने विखे-पाटील यांच्या गळ्यातील जणू ताईतच बनले. याच सुमारास दादासाहेब शेंबेकर, जाचकबंधू आणि दिनकर पवारांचे वडील गोविंदराव यांनी सणसर येथे साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यासाठी दिनकर पवारांना सणसरला परतणे भाग होते. तेव्हा विखे-पाटील यांनी जड अंतःकरणाने आशीर्वाद देऊन त्यांना नोकरीतून मुक्त केले. आप्पासाहेबांच्या कर्तृत्वाला मोठा वाव मिळाला. भवानीनगर सणसरला दुसरा कारखाना सुरू करताना ती सर्व जबाबदारी आप्पासाहेबांवर सोपवण्यात आली. मागील अनुभवाच्या बळावर केवळ दहा महिन्यांतच या कारखान्यातून साखर तयार होऊन बाहेर पडू लागली. हा संपूर्ण भारतभरात विक्रमच होता. त्या वेळी त्यांचे वय केवळ सव्वीस वर्षे होते. त्यांना एकाच वेळी तीनचार खात्यांचा कारभार सांभाळावा लागत होता. शंकरराव मोहिते-पाटील यांनी अकलूज येथे साखर कारखाना उभारण्याचे ठरवले, तेव्हा त्याच्या उभारणीचे काम आप्पासाहेबांवर सोपवण्यात आले. आप्पासाहेबांनी अवघ्या सव्वा वर्षात त्याची यशस्वीपणे उभारणी करून दाखवली. कारखाना सुरू झाल्यावर त्यांनी अकलूज व बावडा परिसरांतील सामाजिक-आर्थिक व शेतीशी निगडित प्रश्‍न सोडवण्यात लक्ष घालण्यास सुरुवात केली. भावकीमुळे वाट्याला कमी जमीन येत असल्यामुळे शेतकऱ्यांना कोणता तरी जोडधंदा हवा होता. हे पाहून आप्पासाहेबांतील कृषितज्ज्ञ जागा झाला. सुरुवातीला त्यांनी शेतकऱ्यांना कुक्कुटपालनासाठी मार्गदर्शन केले. पवारांनी राज्यातील सर्वात मोठा ‘राजहंस पोल्ट्री फार्म’ सुरू केला. त्यात एक लाख पक्षी होते. त्याची  लहान लहान खासगी केंद्रे कारखान्याच्या परिसरात निघाली.  पवारांनी यासोबत दुग्ध व्यवसायालाही चालना दिली. होलस्टीन फ्रीजियन आणि जर्सी गाई यांच्या माध्यमातून गुजरातमधील आणंद येथे झालेल्या श्‍वेतक्रांतीप्रमाणेच पवारांनी अकलूज येथे क्रांती घडवून आणली. या गोष्टीचे श्रेय सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनाही अवश्य द्यावे लागते. तळागाळातील माणूस कुक्कुटपालन व गोपालन याकडे वळला व या चळवळीला शास्त्रीय आधार लाभला. अंडी संकलन व दुग्ध संकलन केंद्रे स्थापन झाली. पुढे प्रवरानगरातील राजकीय परिस्थितीमुळे बाळासाहेब विखे अध्यक्ष असलेल्या साखर कारखान्याची घडी विस्कटू लागली. त्या वेळेस बाळासाहेबांनी पवारांना पुन्हा बोलावून घेतले. पवार प्रवरानगरला आले आणि केवळ चार महिन्यांतच कारखाना अडचणीतून बाहेर पडला व चांगला  चालू लागला. पवार या कारखान्यात शेतकी अधिकारी होते, तेव्हापासून सर्व थरांतील मंडळींशी त्यांचे सलगीचे संबंध होते. नियमात बसवून सकारात्मक वृत्तीने काम करण्याचे पवारांचे धोरण होते. दोन वर्षांतच कारखान्याची स्थिती सुदृढ झाली.

       पवार यांच्या प्रयत्नातून प्रवरानगर येथे इंडस्ट्रियल अल्कोहोल निर्मिती करणारी राज्यातील पहिली डिस्टिलरी स्थापन करण्यात आली. याचा कित्ता गिरवून महाराष्ट्रातील अन्य साखर उद्योगांतही असे अनेक प्रकल्प सुरू करण्यात आले. इस्राएलने शेती व दुग्ध व्यवसायात अत्यंत प्रगती साधली असल्याचे त्यांच्या वाचनात आले. आपण इस्राएलला जाऊन त्यांची प्रगती पाहावी असे त्यांच्या मनाने घेतले, पण इस्रायलला जाण्यासाठी ४ महिन्यांचा शैक्षणिक अभ्यासक्रमाचा व्हिसा उपलब्ध होणार होता. वयाच्या ४०व्या वर्षी नोकरीचा राजीनामा देऊन विस्तार शिक्षणाची आधुनिक क्षेत्रे या अभ्यासक्रमासाठी त्यांनी इस्राएलला प्रस्थान केले. इस्राएलहून परतल्यावर नोकरी करण्यापेक्षा त्यांनी आपल्या ज्ञानाचा लाभ शेतकऱ्यांना व्हावा यासाठी कार्य करण्याचे ठरवले. त्यांनी उरळीकांचन येथील मणीभाई देसाई यांच्या केंद्रातून चांगल्या होलस्टीन फ्रीजियन आणि जर्सी गाई आणून दुग्ध व्यवसायाला चालना देण्याचे काम केले. शरद पवार यांच्या संकल्पनेतून १९७१मध्ये कृषी विकास प्रतिष्ठान संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या कार्यात आप्पासाहेबांनी मनापासून रस घेतला. त्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांना पीक तंत्रज्ञान, दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री, रेशीम उद्योग, फलोद्यान असे अनेक विषय शिकवले; तसेच शेतकऱ्यांना रोजगार मिळवून देऊन आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यास मदत केली. शेतकर्‍यांत आधुनिक बदल घडवून आणण्यास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी शेती सहली, शेतकरी मेळावे आयोजित केले. यातून त्यांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिके दाखवून शेतीचे प्रशिक्षण दिले. पवारांनी १९८९-९०मध्ये आपल्या आईच्या नावाने शारदाबाई पवार शिक्षण संकुलाची माळेगाव कॉलनी येथे स्थापना केली. या संस्थेत महिला विद्यालयाच्या दहा शाखा असून त्याशिवाय परिचारिका प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, उद्योजकता विकास यासाठी केंद्रे आहेत. येथे समाजाच्या सर्व स्तरांतील मुलींना शिक्षण दिले जाते.

       पवारांच्या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र सरकारच्या वतीने कृषिभूषण (१९८८), भारत सरकारच्या वतीने पद्मश्री (१९९०), डॉ. पं.दे.कृ.वि.च्या वतीने कृषिरत्न (१९९०), म.फु.कृ.वि.च्या वतीने डॉक्टर ऑफ सायन्स (१९९२), पुणे विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ लेटर्स (१९९३) आदी पुरस्कार आणि जमनालाल बजाज पुरस्कार, वसंतराव नाईक पुरस्कार व शेंबेकर दादासाहेब पुरस्कार देण्यात आले आहेत.

       पवार आयुष्याच्या अखेरपर्यंत सतत कार्यरत राहिले. पत्नीच्या निधनानंतर ते मनाने थोडे खचले होते. आपल्या मृत्यूनंतर शारदा संकुलातच आपला अंत्यविधी करावा आणि आपल्या शरीराची राख संकुलातील सर्व वृक्षांना खताच्या रूपाने द्यावी, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली.

- संपादित

पवार, दिनकर गोविंद