Skip to main content
x

फैजी, असफ असगर अली

     सफ अली फैजी यांचा जन्म माथेरानला झाला. त्यांचे शालेय, महाविद्यालयीन आणि कायद्याचे शिक्षण मुंबईत झाले. एलएल.बी.ची पदवी संपादन केल्यावर १९२२मध्ये ते इंग्लंडला गेले आणि केंब्रिज विद्यापीठाच्या सेंट जॉन्स महाविद्यालयातून बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले; त्याचप्रमाणे १९२५मध्ये ते मिडल् टेंपलमधून बॅरिस्टर झाले. केंब्रिजमध्ये त्यांनी अरबी आणि फारसी भाषांचा विशेष अभ्यास केला.

      १९२६मध्ये फैजी यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. ती त्यांनी १९३८पर्यंत केली. १९२९पासून ते मुंबईच्या शासकीय विधि महाविद्यालयामध्ये अध्यापन करू लागले. १९३८ पासून १९४७ पर्यंत ते महाविद्यालयाचे प्राचार्य होेते, त्याचप्रमाणे न्यायशास्त्राचे (ज्यूरिस्प्रुडन्स) ‘पेरी प्राध्यापक’ होते. १९४९ ते १९५१ या काळात ते भारताचे इजिप्तमधील राजदूत होते. १९५२मध्ये त्यांची नियुक्ती केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून झाली. १९५७ ते १९६० या काळात ते श्रीनगर येथील जम्मू व काश्मीर विद्यापीठाचे कुलगुरू होते.

        त्यानंतर फैजी सार्वजनिक जीवनातून निवृत्त झाले आणि त्यांनी अध्यापन आणि लेखनावर आपले लक्ष केंद्रित केले. त्यांनी अमेरिका आणि कॅनडा या देशांतील अनेक विद्यापीठांत, तसेच शिमला येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड स्टडी’ मध्ये आणि म्हैसूर, गुजरात आणि अन्य विद्यापीठांत अतिथी प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. १९६२-६३ मध्ये ते केंब्रिज विद्यापीठातील आपल्या जुन्या सेंट जॉन्स महाविद्यालयामध्ये ‘कॉमनवेल्थ फेलो’ होते.

        १९२९ पासून १९४९ पर्यंत फैजी मुंबईच्या एशियाटिक सोसायटीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि सोसायटीच्या शोधपत्रिकेचे सहसंपादक होते. १९३३ पासून १९४९ पर्यंत ते ‘इस्लामिक रिसर्च असोसिएशन’ चे मानद सचिव होते. १९८० पर्यंत ते ‘इस्लामिक कल्चर’च्या संपादक मंडळावर होते. ‘एनसायक्लोपीडिया ऑफ इस्लाम’ या प्रकल्पाच्या कार्यकारी समितीचेही ते प्रथमपासून सदस्य होेते. १९५६मध्ये दमास्कस येथील ‘अरेबिक अ‍ॅकॅडमी’चे ‘कॉरस्पाँडिंग मेंबर’ म्हणून त्यांची निवड झाली. १९६२मध्ये त्यांना पद्मविभूषण सन्मान मिळाला.

        ‘आऊटलाइन्स ऑफ मोहमेडन लॉ’, ‘ए मॉडर्न अ‍ॅप्रोच टू इस्लाम’, ‘केसेस् इन द मोहमेडन लॉ ऑफ इंडिया, पाकिस्तान अँड बांगलादेश’ ही अत्यंत महत्त्वाची पुस्तके फैजी यांनी लिहिली.

- शरच्चंद्र पानसे

फैजी, असफ असगर अली