Skip to main content
x

फाळके, धुंडिराज गोविंद

दादासाहेब फाळके

दादासाहेब फाळके यांचे मूळ नाव धुंडिराज गोविंद फाळके. फाळके या आडनावामागेही एक इतिहास आहे. फाळके यांचे मूळ आडनाव भटअसे होते. त्यांच्या मूळ व्यवसायानुसार त्यांना फाळके हे आडनाव पडले. पेशव्यांच्या काळात दादासाहेबांचे वंशज जेवणासाठी केळ्यांचे फाळके पुरवत असत. त्यावरून त्यांना फाळकेहे आडनाव पडले. दादासाहेब फाळके यांचा जन्म नाशिक  जिल्ह्यातील त्र्यंबकेश्‍वर येथे झाला. दादासाहेबांच्या वडिलांची मुंबईच्या विल्सन महाविद्यालयामध्ये संस्कृत विषयाचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली होती. त्या वेळी गिरगावच्या चौपाटीजवळील इस्माइल इमारतीमध्ये फाळके कुटुंब राहत असे. दादासाहेबांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. मुंबईच्या मराठा विद्यालयातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये १८८५ मध्ये प्रवेश घेतला. सुरुवातीची काही वर्षे त्यांनी बडोद्याच्या कलाभवनमध्ये घालवली. उपजीविकेसाठी ब्रिटिश सरकारच्या पुरातत्त्व विभागामध्ये त्यांनी छायाचित्रकार-ड्राफ्ट्समन म्हणून काही काळ नोकरीदेखील केली. १९०५ मध्ये भारतीय स्वातंत्र्यचळवळीला जोर आल्यानंतर दादासाहेबांनी शासकीय नोकरीचा त्याग केला आणि भागिदारीत स्वत:चा लक्ष्मी छापखाना सुरू केला. मात्र कालांतराने ते या व्यवसायातून बाहेर पडले आणि त्यांना चित्रपटनिर्मितीचे वेध लागले. या कामी त्यांना मदत केली ती त्यांच्या पत्नी सरस्वतीबाईंनी आणि मुलांनी. दादासाहेबांना सात मुले आणि दोन मुली, अशी एकूण नऊ अपत्ये.

तो काळ संगीत नाटकांचा होता. प्रेक्षकवर्ग नाटकांना प्रचंड गर्दी करत. अशा काळात संवाद नसलेला चित्रपट काढणे हे एक मोठे धाडस होते. परंतु, दादासाहेबांनी ते धाडस करून दाखवले. घरातल्या सर्व गोष्टी विकून ते चित्रपटनिर्मितीच्या मागे लागले. विदेशातून आलेला लाइफ ऑफ ख्राइस्टहा मूकपट त्यांनी अमेरिकन पिक्चर पॅलेस या तंबू थिएटरमध्ये पाहिला आणि तो पाहून ते अक्षरश: झपाटले गेले. आपणही असे चित्र तयार करावे असे मनात आल्यावर त्यांनी तब्बल सहा महिने अहोरात्र काम केले. त्यामुळे त्यांच्या दृष्टीवर परिणाम झाला. अखेर डॉक्टरांच्या अथक परिश्रमांनंतर दादासाहेबांच्या दृष्टीवरचे संकट दूर झाले. घरातल्या कुंडीत झाडाचे रोप लावून दादासाहेबांनी त्याच्या वाढीचे चित्रीकरण केले. ते चांगले झाल्याने त्यांचा हुरूप वाढला. अखेर चित्रपटनिर्मितीचे तंत्र शिकण्यासाठी ते १ फेब्रुवारी १९१२ रोजी लंडनला गेले. तिथल्या तंत्रज्ञांच्या भेटी घेऊन त्यांनी या माध्यमाचे शिक्षण घेतले. तेथे त्यांना सेसिल होपवर्थ या दिग्दर्शकाचे मार्गदर्शन लाभले. १ एप्रिल रोजी ते भारतात परतले. लंडनमधून आणलेल्या नवीन कॅमेऱ्याद्वारे त्यांनी एक चित्रपट तयार केला आणि तो काही अर्थपुरवठादारांना दाखवला. तो त्यांना आवडल्याने चित्रपटासाठी लागणाऱ्या पैशांचा प्रश्‍न मिटला. राजा हरिश्‍चंद्रावर चित्रपट करायचे ठरले. परंतु संकट निर्माण झाले होते ते कलाकार निवडीचे. कारण त्या काळात चित्रपट या माध्यमाकडे फारशा चांगल्या दृष्टीने पाहिले जात नसे. स्त्रीपात्रे रंगवण्यासाठी कलाकार मिळत नव्हते. वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देऊनही चांगले कलाकार मिळाले नाहीत. तारामतीची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी योग्य कलाकार न मिळाल्याने वेश्यावस्तीतही दादासाहेबांनी स्त्री कलावंतांचा शोध घेतला. या वेळी त्यांनी आपल्या मुलीशी लग्न केले तर आपण तिला चित्रपटात काम करण्याची परवानगी देऊअशी एका वेश्येने त्यांना अट घातली. अखेर पुरुष कलाकारालाच स्त्रीपात्र करायला देण्याची तडजोड करणे दादासाहेबांना भाग पडले. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका वेटरला त्यांनी तारामतीबनवले. हा कलाकार म्हणजे साळुंके. तारामतीच्या व्यक्तिरेखेसाठी ते आपल्या मिशा काढायला तयार नव्हते. तेव्हा त्याचे आणि त्याच्या वडिलांचे मन वळवण्यात दादासाहेबांचा बराच वेळ गेला. अखेर तब्बल सहा महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतर राजा हरिश्‍चंद्रचित्रपट तयार झाला. भारतीय तंत्राने आणि कलावंतांच्या सहाय्याने बनवलेला हा पहिला भारतीय चित्रपट. तो ३ मे १९१२ रोजी मुंबईच्या कॉरोनेशनचित्रपटगृहात दाखवण्यात आला. हा चित्रपट तेथे तब्बल आठ आठवडे चालला. लोकांनी हा अभूतपूर्व प्रयोग पाहायला अलोट गर्दी केली आणि भारतीय चित्रपट उद्योगाचा शुभारंभ झाला.

युद्ध सुरू झाल्यामुळे भांडवलासाठी फाळके यांना पुन्हा वणवण फिरायला लागले. दुसऱ्या चित्रपटाच्या वेळी त्यांनी स्टुडिओ नाशिकला हलवला. तेथे पुन्हा राजा हरिश्‍चंद्रलंका दहनहे मूकपट निर्माण केले. लंकादहनने उत्पन्नाचे उच्चांक गाठले. यामुळे भांडवलदारांचे लक्ष या व्यवसायाकडे गेले. पुण्याच्या आर्यन टॉकीजचे मालक बापूसाहेेब फाटक, हे दादासाहेबांचे मित्र होते. भांडवलासाठी फाटक त्यांना फाटक-वालचंद समूहाचे लक्ष्मणराव फाटक यांच्याकडे घेऊन गेले. यामुळे मुंबईच्या कोहिनूर मिलचे मालक वामन श्रीधर आपटे व अन्य उद्योजक यांच्या सहाय्याने फाळके फिल्मया नाशिकच्या कंपनीचे रूपांतर हिंदुस्तान फिल्म कंपनीअसे होऊन १ जानेवारी १९१८ ला कंपनी अस्तित्वात आली आणि त्यानंतर फाळके यांनी श्रीकृष्ण जन्मकालिया मर्दनहे दोन अप्रतिम चित्रपट दिले. सुस्थितीचे हे पर्व फार काळ टिकले नाही. फाळकेंचे भागीदारांशी मतभेद होऊ लागले. कंपनीतून बाहेर पडलो तर नुकसान भरपाई द्यावी लागेल या उद्दशाने फाळके कुटुंबासह नाशिकला निघून गेले. आपटे यांनी फाळके यांच्या सहाय्यकांना दिग्दर्शन सोपवून कंपनी सुरू ठेवली.

तीन-चार वर्षांनी बाळासाहेब पाठकांच्या मध्यस्थीने फाळके-आपटे भेट होऊन दादासाहेब १९२२ ला पुन्हा हिंदुस्थान कपंनीत दाखल झाले. सल्लागार या नात्याने फाळके यांनी १९२२-१९२९ या काळात हिंदुस्थानसाठी अनेक मूकपट काढले. पुन्हा मतभेद होऊन फाळके बाहेर पडले व नाशिकला डायमंड फिल्म कंपनीकाढून त्यांनी सेतूबंधनकाढायला घेतला. १९३१ मध्ये आलमआराने चित्रपट बोलू लागले तरीही सेतुबंधनचे काम चालू होते. शेवटी पुंजी संपली, पगार थकले. तेव्हा वामनराव आपटे यांनी पुन्हा फाळके यांना मदत केली आणि अयोद्धेचा राजाहा मूकपट प्रदर्शित झाल्यावर हिंदुस्थान फिल्म कंपनीबंद करून टाकली. या गडबडीत सेतुबंधनअडकला. बोलपट आल्यावर मुंबईच्या इंपिरिअल स्टुडिओत फाळके यांनी तो डबकरून बोलका केला. पण तो प्रदर्शित झाला किंवा नाही याबद्दल काही माहिती उपलब्ध नाही. दरम्यान कोल्हापूर सिनेटोनने त्यांना गंगावतरणचित्रपट दिग्दर्शित करायला बोलावले. १९३५ साली सेटवर गेलेला हा बोलपट फाळके यांच्या दिरंगांईमुळे जुलै १९३७ मध्ये प्रदर्शित झाला. त्यात १७ गाणी व चित्रपट करण्यासाठी एकूण २.५ लाख खर्च आला. यानंतर फाळके निवृत्त झाले. मिळालेल्या देणगीतून नाशिकला त्यांना हिंद सिनेजनकाश्रमहा बंगला बांधला. तेव्हापासून चित्रपटक्षेत्राशी असणारा त्यांचा संबंध तुटला.    

आपल्या दीर्घ कारकिर्दीत दादासाहेबांनी तब्बल ९५ चित्रपटांची आणि २६ लघुपटांची निर्मिती केली. दादासाहेबांचे योगदान लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्यांच्या स्मरणार्थ दादासाहेब फाळके पुरस्कारसुरू केला. चित्रपटसृष्टीसाठी भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांंना दर वर्षी या पुरस्काराद्वारे गौरवले जाते. चित्रपटसृष्टीमधील हा सर्वोच्च पुरस्कार आहे. १९७० साली महाराष्ट्र शासनाने फाळके जन्मशताब्दी साजरी केली. ज्या मधुराभवनमध्ये दादरला राजा हरिश्‍चंद्रफाळके यांनी निर्माण केला. त्या रस्त्याला दादासाहेब फाळके मार्गअसे नाव देण्यात आले. त्या रस्त्याच्या दक्षिण टोकाला त्यांचा पुतळा बसवण्यात आला. कालांतराने महाराष्ट्र शासनाच्या गोरेगाव येथील फिल्मसिटीला दादासाहेब फाळके चित्रनगरीअसे नाव देऊन शासनाने त्यांच्या कार्याचा उचित गौरव करण्यात आला. तर २०१० साली प्रदर्शित झालेल्या हरिश्‍चंद्राची फॅक्टरीया चित्रपटातून दादासाहेब फाळके सर्वसामान्यांच्या घरात पोहोचले. 

- सुधीर नांदगावकर

फाळके, धुंडिराज गोविंद