Skip to main content
x

फडके, भालचंद्र दिनकर

धारवाड येथे जन्मलेले भालचंद्र दिनकर फडके सोलापूरचे असून त्यांचे माध्यमिक शिक्षण जैन गुरुकुल व हरिभाई देवकरण प्रशाला, सोलापूर येथे झाले. सोलापूरच्याच दयानंद महाविद्यालयामधून पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ते पुणे विद्यापीठातून मराठी घेऊन एम.ए. झाले. मराठी कथा  या विषयावर त्यांनी विद्यावाचस्पती (पीएच.डी) पदवी संपादन केली. पुढेही त्यांचा ‘मराठी कथा’ हा काही प्रमाणात अभ्यासाचा विषय राहिला.

ह.भ.प.दिनकरबुवा फडके यांचे ते चिरंजीव. वडील राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून प्रख्यात होते, हिंदू महासभेच्या विचारांचे होते. मात्र त्यांची मुले सुधारणावादी, प्रायः साम्यवादी समाजवादी अशा डाव्या विचारसरणीकडे झुकणारी होती. भालचंद्र फडकेही त्याला अपवाद नाहीत.

सुरुवातीस काही काळ भारतीय युद्ध खात्यात नोकरी केल्यानंतर निवृत्तीपर्यंत फडके यांनी अध्यापन हाच पेशा निवडला. १९४५ ते १९५५ असे एक दशक माध्यमिक शिक्षक म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर मिलिंद महाविद्यालय, औरंगाबाद आणि शासकीय महाविद्यालय येथे मराठीचे अध्यापन केले. हा सगळा काळ चौदा वर्षांचा होता. १९६९ साली ते पुणे विद्यापीठात रुजू झाले. प्रथम अधिव्याख्याता आणि १९७८ साली प्रपाठक झाले. १९८५ साली निरंतर प्रौढ शिक्षण संचालक म्हणून ते निवृत्त झाले.

फडके मराठीतील ख्यातनाम समीक्षक होते त्यांची समीक्षेवरील अनेक पुस्तके आहेत, त्यांपैकी ‘कथाकार खानोलकर’ (१९६९), ‘दलित साहित्य: वेदना आणि विद्रोह’ (१९७७), ‘मराठी लेखिका: चिंता आणि चिंतन’ (१९८०) ही काही प्रसिद्ध पुस्तके असून त्यामुळे त्यांच्यावर ‘समीक्षक’ ही मुद्रा उमटली. त्यांची समीक्षा मर्मग्राही, सामाजिक भान जागे करणारी आणि काही प्रमाणात प्रेरणा देणारी होती. दलित साहित्याचा त्यांनी वेळोवेळी घेतलेला धांडोळा साक्षेपी समीक्षेचा एक चांगला प्रकार होता.

त्यांनी अरविंद गोखले यांच्या कथा संपादित केल्या आहेत आणि कथांची अन्य संपादित पुस्तके ही त्यांच्या नावावर आहेत. डॉ.आंबेडकरांवर त्यांनी चरित्रपर लेखन केले. १९७३ ते १९७६ या काळात मराठी साहित्य पत्रिकाचे (पुणे) ते संपादक होते. त्या काळातील नामवंत समीक्षकांचे लेखन प्रसिद्ध करून त्यांनी पत्रिकेचा दर्जा उंचावला. त्यांची संपादकीय व समीक्षकीय दृष्टी चिकित्सक होती.

- मधू नेने

फडके, भालचंद्र दिनकर