Skip to main content
x

फडके, श्रीपाद पुरुषोत्तम

           तिशय साधी राहणी, प्रामाणिकपणा, निष्कलंक चारित्र्य, शिस्तप्रियता, हाती घेतलेल्या कामाचे नियोजन करून ते तडीस नेण्याची प्रवृत्ती या गुणांच्या जोरावर श्रीपाद पुरुषोत्तम फडके यांची ‘पशुवैद्य’ या पदावरून राज्याचे ‘पशु-संवर्धन संचालक’ या सर्वोच्च पदापर्यंत प्रगती झाली. भारत सरकारचे पशु-संवर्धन आयुक्त, या पशु-संवर्धन क्षेत्रातील सर्वोच्च पदावर काम करण्याची विनंती भारत सरकारकडून झाली असतानाही महाराष्ट्राचा पशु-संवर्धन विभाग देशात सर्वोत्तम पातळीवर नेण्याच्या ईर्षेने महाराष्ट्रातच कार्यमग्न राहणारे असे हे एकमेव व्यक्तिमत्त्व असावे. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांच्या आईचे नाव यशोदा होते. त्यांचे वडील पशु-संवर्धन विभागात अधीक्षक होते. फडके यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात झाले. मुख्याध्यापक ना.ग. नारळीकर यांच्या त्यागी व कर्तव्यमग्न जीवनाचा विलक्षण प्रभाव फडके यांच्यावर पडला. त्यांनी १९३९मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मुंबईतील परळ येथील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातून जी.बी.व्ही.सी. ही पदवी १९४३मध्ये प्राप्त केली व मुंबई राज्याच्या पशुवैद्यकीय विभागात व्हेटरनरी असिस्टंट सर्जन या पदावर आपल्या पशुवैद्यकीय कारकिर्दीला आरंभ केला. याच वेळी दुसरे महायुद्ध (१९३९-१९४५) सुरू होते आणि भारतीय सैन्याला पशुवैद्यकीय अधिकार्‍यांची गरज होती. फडके यांच्या अर्जानुसार वायव्य सरहद्द प्रांतातील अफगाणिस्तान सीमेवर असलेल्या ‘बन्नू’ येथे त्यांची लष्करातील प्रशिक्षणार्थी म्हणून प्रथम निवड झाली. नंतर त्यांची सेकंड लेफ्टनंट या पदावर नियुक्ती झाली. जर्मनी आणि इटली यांचा पराभव होऊन युरोपमधील युद्ध संपुष्टात आले तरी जपान देशाने आशिया खंडात युद्धभूमी धगधगतच ठेवली होती. भारताच्या पूर्व सीमेला असलेला जपानचा धोका लक्षात घेता तत्कालीन ब्रिटिश सरकारने भारत-ब्रह्मदेश सीमा अधिक मजबूत करण्याचे ठरवल्याने फडके यांचे पश्‍चिम सीमेवरून पूर्व सीमेवरील रंगून येथे लेफ्टनंट या पदावर पदोन्नतीने स्थलांतर झाले. येथे त्यांना प्रत्यक्ष युद्धभूमीवर काम करण्याचा अनुभव मिळाला. त्यांना १९४३ ते १९४७ या काळात ब्रिटिश सैन्य अधिकाऱ्यांसमवेत काम करण्याची संधी मिळाल्याने केवळ पशुवैद्यक क्षेत्रातच नव्हे, तर इंग्रजी भाषा, शिस्त, कामाचे नियोजन, देशासाठी कष्ट करण्याची प्रवृत्ती या गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या.

           युद्ध समाप्तीनंतर डॉ. फडके यांची मूळ मुंबई प्रांत पशु-संवर्धन विभागात पाठवणी झाली. सैन्यात पाच वर्षे सेवा बजावल्यामुळे खास बाब म्हणून त्यांना मुक्तेश्‍वर (उत्तरांचल) येथील इंपीरिअल व्हेटरनरी रीसर्च इन्स्टिट्यूट येथे एक वर्षाच्या पदव्युत्तर पदविका (सूक्ष्मजीवशास्त्र व लस उत्पादन) अभ्यासक्रमासाठी पाठवण्यात आले. त्या काळी ब्रिटिश इंडियामध्ये थैमान घालत असलेल्या बुळकांडी या गाई-म्हशी-शेळ्या-मेंढ्या यांच्या विषाणूजन्य व घटसर्प, फऱ्या , आंत्र विषार अशा जीवाणूजन्य साथींच्या रोगावर संशोधन आणि लस निर्माण ही कामे चालत असत. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर डॉ. फडके यांची मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयात १९४९ साली संशोधन साहाय्यक म्हणून नेमणूक झाली. मुंबई शहराला माफक दरात शुद्ध दूध पुरवठा व्हावा या विचारातून तत्कालीन मुंबई सरकारने आरे येथे एक महत्त्वाकांक्षी दुग्ध प्रकल्प १९४८मध्ये सुरू केला होता. खासगी दुग्ध व्यावसायिकांना जमीन, गोठे, पाणीपुरवठा, हिरव्या चाऱ्याच्या उत्पादनासाठी शेतजमीन व पशुवैद्यकीय सेवा पुरवून सरासरी १०० म्हशींचे एक युनिट अशी ३० ते ३५ युनिट्स या भव्य वसाहतीत उभारण्यात आली. येथे ठेवण्यात आलेल्या म्हशींसाठी तज्ज्ञ पशुवैद्यकीय सेवा मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातून पुरवण्यात येत असे. आरे दुग्ध वसाहतीत १९५०मध्ये स्तनदाह या कांसेच्या आजाराचा मोठा प्रादुर्भाव झाला होता. त्यावर संशोधन करून औषध योजना आणि प्रतिबंधक उपाय सुचवण्यासाठी स्थापण्यात आलेल्या संशोधन प्रकल्पात फडके यांनी अतिशय मेहनतीने कार्य करून स्तनदाहाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी करण्यात यश मिळवले. स्तनदाहावर इतक्या मोठ्या प्रमाणावर संशोधन होण्याची स्वातंत्र्योत्तर काळातील ती पहिलीच घटना होती.

           स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातही पुढील दहा ते बारा वर्षे ‘बुळकांडी’ (रींडरपेस्ट) हा विषाणूजन्य अतिघातक रोग म्हणून सिद्ध झाला होता. योग्य प्रकारची लस, लसीची योग्य साठवण आणि वाहतूक या गोष्टींचा प्रभाव रोगाच्या संपूर्ण निर्मूलनाआड येत होता. मात्र पुढे ‘फ्रीज ड्राइड गोट टिश्यू अ‍ॅडाप्टेड व्हॅक्सिन’ ही लस उपलब्ध झाल्यावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या मदतीने केंद्र शासनाने बुळकांडी रोगाच्या संपूर्ण निर्मूलनासाठी १९५४मध्ये ‘केंद्रिय बुळकांडी प्रतिबंध समिती’ची स्थापना करून अखिल भारतीय स्तरावर बुळकांडी निर्मूलन योजना राबवण्याचे घोषित केले आणि पथप्रदर्शक प्रकल्प म्हणून भारतात प्रथम ही योजना मुंबई राज्यात सुरू झाली. त्याचे नेतृत्व डॉ. फडके यांच्यावर सोपवले गेले. प्रत्यक्षात मार्च १९५५मध्ये सुरू झालेल्या या योजनेद्वारे त्यांनी आपल्या इतर पशुवैद्यकीय सहकाऱ्यांमार्फत सारे मुंबई राज्य (कर्नाटक, गुजरातमधील भाग जमेस धरून) पिंजून काढले आणि खेड्यापाड्यांत सर्वदूर विखुरलेल्या प्रत्येक जनावराला या लसीची मात्रा मिळेल याची दक्षता घेतली. भारत सरकारने बुळकांडी रोगावर मिळवलेले नियंत्रण ही जागतिक स्तरावर आश्‍चर्याची गोष्ट मानली जाते. या योजनेचे नेतृत्व डॉ. फडके यांच्याकडे होते ही महाराष्ट्रातील पशुवैद्यक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे.

डॉ. फडके यांची १९५८मध्ये लोकसेवा आयोगामार्फत रोगअन्वेषण अधिकारी या पदावर नेमणूक झाली. या पदावरील जबाबदारीची कामे यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी शासनाने त्यांना ब्रिटिश शिष्यवृत्तीखाली इंग्लंड येथे दीड वर्षासाठी उच्च शिक्षणासाठी पाठवले. तेथील कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, शेळी-मेंढीपालन या विषयावरील प्रसिद्ध संशोधन संस्थांमध्ये त्यांनी प्रत्येकी सहा-सहा महिने असे प्रशिक्षण प्राप्त केले.

           डॉ. फडके यांनी १९६१मध्ये भारतात परतल्यावर नव्याने स्थापन झालेल्या नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यभार स्वीकारला व पुढील सात वर्षे या विषयाचे अध्यापन करून जनावरांच्या स्थानिक रोगांचा सूक्ष्मजीवशास्त्रीय अभ्यास केला. महाराष्ट्रात १९९८मध्ये कृषी विद्यापीठाची स्थापना झाली आणि मुंबई, नागपूर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालये राज्य शासनाच्या पशु-संवर्धन विभागाकडून कृषी विद्यापीठाच्या अखत्यारीत आणण्यात आली. डॉ. फडके यांनी पशु-संवर्धन विभागांतर्गत काम करायचा पर्याय स्वीकारला व नागपूरहून पुण्याच्या पशु-संवर्धन विभागाच्या मुख्यालयात उपसंचालक पदावर त्यांची नेमणूक झाली.  त्यांची काम करण्याची पद्धत व संशोधन आणि पशु-रोगअन्वेषण यासंबंधीचे प्रशिक्षण, सूक्ष्मजीवशास्त्र या विषयांचा अभ्यास या गोष्टी लक्षात घेता पशु-संवर्धन संचालक सदाशिव तिनईकर यांनी डॉ. फडके याच्याकडे राज्याच्या ‘पशु-रोगअन्वेषण आणि लस निर्माण संस्था’ यांचा कार्यभार सोपवला.

            डॉ. फडके यांनी विशेषतः समुद्रकाठावरील जिल्ह्यांना सतावणाऱ्या गाई-म्हशींच्या घातक रोगावर यशस्वी मात केली. प्रथम शरीराच्या मागील भागाला पंगुता येऊन हा पंगूपणा पुढे सरकत छातीच्या स्नायूंना दुर्बल करत जनावराचा मृत्यू घडत असे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला जनावरातील मृत्यू सुरू होत असत. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी परिसरात १९७०-७१ दरम्यान अशा प्रकारे पंगुत्व येऊन अनेक जनावरे मृत्युमुखी पडली. डॉ. फडके यांनी त्वरित शृंगारतळी येथे मुक्काम ठोकून एक छोटी प्रयोगशाळा उभारली. आजूबाजूची खेडी पायी फिरून पिंजून काढली. रोगाची लक्षणे व शवविच्छेदन तपासणीवरून हा रोग म्हणजे ‘बोटुलिनम’ या विषारी द्रव्याची विषबाधा आहे, असे  डॉ. फडके यांनी संशोधन करून सिद्ध केले. मेलेल्या जनावरांची इतस्ततः पसरलेली सुकलेली हाडे जनावरांनी चघळल्यास त्या हाडात असलेल्या क्लॉस्ट्रीडीयम बोटुलिनम जीवाणूपासून निर्मित ‘बोटुलिनम’ हे विषारी द्रव्य त्यांच्या पोटात जाऊन विषबाधा होेते हे त्यांनी दाखवले. कोकण विभागात वाढणाऱ्या चाऱ्यात कॅल्शियम या खनिजाची कमतरता असल्यामुळे जनावरांच्या शरीरातही या खनिजाची कमतरता निर्माण होऊन जनावरे वाळलेली हाडे चघळण्यास उद्युक्त होतात व मृत्युमुखी पडतात. खेडोपाडी ग्रामसभा घेऊन कॅल्शियमचे जनावरांच्या शरीरातील महत्त्व आणि खाद्यान्नातून जनावरांसाठी कॅल्शियम खनिजांचा पुरवठा करण्याविषयी पशुपालकांचे प्रबोधन केले. मेलेल्या जनावरांची विल्हेवाट लावणे व जनावरांना हाडे चघळण्यापासून दूर ठेवणे याचेही महत्त्व गावकऱ्यांना पटवले. परिणामी पुढील काळात कोकण विभागात बोटुलिनममुळे जनावरांचे मृत्यू होणे थांबले. औंध (पुणे) येथील रोगअन्वेषण प्रयोगशाळा अद्ययावत करण्याचे फडके यांचे स्वप्न होते. मुक्तेश्‍वर आणि इंग्लंडमधील संशोधन संस्थांच्या कामकाजाच्या पद्धतींचे सूक्ष्म निरीक्षणाच्या आधारावर पशु-रोगअन्वेषण प्रयोगशाळेचा सर्वंकष आराखडा त्यांनी शासनाला सादर करून मंजूर करून घेतला. प्रयोगशाळेत जिवाणूशास्त्र, विषाणूविज्ञान, विकृतिशास्त्र, परोपजीविशास्त्र, विषविज्ञान या सर्व शाखांच्या वेगवेगळ्या प्रयोगशाळा आधुनिक उपकरणांनी सुसज्ज केल्या. काम करणारा वैज्ञानिक येथेच वास्तव्यास असला पाहिजे या भूमिकेतून कर्मचारी वसाहत उभी केली. प्रशिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन रोगअन्वेषण विभागातील वैज्ञानिकांना देशी-परदेशी संस्थांमधून वेळोवेळी प्रशिक्षण मिळेल याची व्यवस्था केली. वृक्षप्रेमी असलेल्या डॉ. फडके यांनी पशु-रोगअन्वेषण प्रयोगशाळा आणि लसनिर्मिती संस्था यांच्या संयुक्त परिसरात अनेक वृक्षांची लागवड करून सारा परिसर नैसर्गिक सौंदर्याने नटवून टाकला. त्यांच्या कार्यपद्धतीतून उभी राहिलेली पशु-रोगअन्वेषण प्रयोगशाळा केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर गोवा, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांसाठीही केंद्रीय स्तरावर संदर्भ प्रयोगशाळा म्हणून मानली जाते. डॉ. फडके यांच्या पशु-संवर्धन क्षेत्रातील योगदानाची ही प्रयोगशाळा ठळक निशाणी आहे. डॉ. फडके यांची १९७५मध्ये पशु-संवर्धन संचालक या महाराष्ट्रातील सर्वोच्च पदावर नियुक्ती झाली आणि चार वर्षांच्या कार्यकाळानंतर याच पदावरून ते सेवानिवृत्त झाले. केवळ स्नानगृहात घसरून पडल्याचे निमित्त होऊन त्यांचे निधन झाले.

- डॉ. रामनाथ सडेकर

फडके, श्रीपाद पुरुषोत्तम