Skip to main content
x

फडके, विष्णू रामचंद्र

       शिया खंडात पशुवैद्यकीय शिक्षणाचा पाया घालणारे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय २ ऑक्टोबर १८८६ रोजी स्थापन करण्यात आले तरी या महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी  १९३२पर्यंत ब्रिटिश पशुवैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील ब्रिटिश व्यक्तीचीच नेमणूक होत असे. साहाय्यक प्राध्यापक वा प्राध्यापक पदावर भारतीय पशुवैद्यकीय पदवीधरांची नेमणूक १८८९पासून होत असली तरी या महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी विराजमान होण्याचा मान मिळवणारे पहिले भारतीय पशुवैद्य म्हणजे डॉ. विष्णू रामचंद्र फडके.

       रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील डोणवली या खेड्यात रामचंद्र फडके या शिक्षकी पेशात असलेल्या पित्याच्या कुटुंबात विष्णू फडके यांचा जन्म झाला. १९००मध्ये शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सरकारी शिष्यवृत्तीवर त्यांनी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि डिसेंबर १९०३मध्ये जी.बी.व्ही.सी. ही पदवी प्राप्त केली. व्हेटरिनरी असिस्टंट सर्जन म्हणून १९०४मध्ये त्यांनी शासकीय सेवेत प्रवेश केला. त्याच वर्षी त्यांना मुक्तेश्‍वर येथील इंपेरिअल व्हेटर्नरी रीसर्च इन्स्टिट्यूट येथे ‘पशुवैद्यकीय निरीक्षक’ (व्हेटर्नरी इन्स्पेक्टर) या पदावर बढती मिळाली. १९०८मध्ये त्याच पदावर त्यांची मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात बदली झाली आणि पशुवैद्यकीय अध्यापनाची त्यांची कारकिर्द १९१२मध्ये त्यांच्या व्याख्याता या पदावरील नेमणुकीने झाली. त्यांची बुद्धिमत्ता आणि अध्यापन कौशल्य लक्षात घेऊन तत्कालीन मुंबई शासनाने त्यांना इंग्लंडमध्ये उच्चशिक्षण घेण्यासाठी पाठवले (सप्टेंबर १९१३). एक वर्षाचा विद्यापीठीय उच्च शिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करून फडके १९१४मध्ये पुन्हा मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन कार्यासाठी परतले. त्याच वेळी युरोपमध्ये महायुद्ध (१९१४-१९१८) सुरू झाले होते. या युद्धात जखमी सैनिकांची आणि जनतेची सेवासुश्रुषा करण्यासाठी ‘स्वयंसेवक’ म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यासाठी शासनाने आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देऊन डॉ. फडके मार्सोलिस बंदर (फ्रान्स) येथे सेवासुश्रूषा सेवेसाठी रुजू झाले. दोन वर्षांनी (१९१६ मध्ये) भारतात परल्यावर पुन्हा मुक्तेश्‍वर येथे त्यांची गायी-म्हशीतील बुळकांडी रोगावर निर्माण करण्यात आलेल्या लसीची व लसीकरण पद्धतीची चाचणी घेण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. ‘सिरम सायमलटेनियस मेथड’ या नावाने ओळखली जाणारी आणि त्या वेळी युरोपात सर्वसामान्य झालेली बुळकांडी प्रतिबंधक लसीकरणाची पद्धत तत्कालीन ब्रिटिश भारतात प्रथमच यशस्वीपणे राबवण्याची जबाबदारी डॉ. फडके यांनी पार पाडली. स्वातंत्र्योत्तर काळातील बुळकांडी निर्मूलन योजनेच्या यशस्वितेचा पाया डॉ. फडके यांनी भारतात आणलेल्या ‘सिरम सायमलटेनियस मेथड’नेच घातला गेला यात संदेह नाही.

       डॉ. फडके यांनी १९२०मध्ये मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक म्हणून प्रवेश केला. १९२४मध्ये डॉ. फडके मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे उपप्राचार्य झाले. स्थापना झाल्यापासून या महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी ब्रिटिश पशुवैद्यकीय सेवेतील अधिकारीच नेमला जाई. ही परंपरा खंडित करून आपली बुद्धिमत्ता, कर्तव्यनिष्ठा, केलेले कार्य आणि प्रशासकीय अनुभव यांच्या बळावर भारतात अत्यंत प्रतिष्ठित समजल्या गेलेल्या मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी ‘पहिले भारतीय प्राचार्य’ म्हणून डॉ. विष्णू रामचंद्र फडके १९३२मध्ये विराजमान झाले. डॉ. फडके यांची कार्यपद्धती, पशुवैद्यकीय शिक्षणाला त्यांनी दिलेले वळण, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय मुंबई विद्यापीठाशी संलग्न होण्यासाठी त्यांनी केलेले अथक प्रयत्न या सार्‍या गोष्टी पाहता संधी मिळाल्यास भारतीय पशुवैद्यक ही महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची धुरा समर्थपणे सांभाळू शकतात याची जाणीव ब्रिटिश शासनकर्त्यांना करून देण्यात डॉ. फडके यशस्वी झाले आणि हीच परंपरा यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत अखंडित राहिली. यातच डॉ. फडके यांचे महानत्व दडले आहे. भारतात पशुवैद्यकीय शिक्षणाची सुरुवात १८८२ साली लाहोर येथे झाली होती. या घटनेची सुवर्णजयंती म्हणून १९३१ साली झालेल्या विशेष समारंभात मुंबई प्रांताच्या तत्कालीन गव्हर्नरांच्या हस्ते डॉ. फडके यांचा पशुवैद्यकीय शिक्षणातील योगदानासाठी सुवर्णपदक देऊन गौरव करण्यात आला आणि जस्टिस ऑफ पीस ही बहुमानाची पदवी बहाल करण्यात आली.

       १९३७पर्यंत प्राचार्यपदावर काम केल्यानंतर डॉ. फडके यांची मुंबई राज्याच्या ‘डायरेक्टर ऑफ व्हेटरिनरी सर्व्हिसेस’ या सर्वोच्च पदावर पदोन्नती झाली आणि याच पदावरून १९३८ साली सेवानिवृत्त झाले. तरीही पुढील सहा महिन्यांसाठी त्यांचा सेवा कालावधी वाढवण्यात आला आणि तत्कालीन सिंध प्रांताचे डायरेक्टर ऑफ व्हेटरिनरी सर्व्हिसेस म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. (या कालानंतर सेवानिवृत्ती पत्करून डॉ. फडके पुणे येथे त्यांच्या निर्वाण काळापर्यंत (१९६२) स्थायिक झाले.) डॉ. विष्णू रामचंद्र फडके यांच्या पशुवैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल १९३८च्या ‘नूतन वर्ष’ समारंभात ब्रिटिश सरकारने त्यांना ‘रावबहादूर’ हा नागरी सन्मान बहाल केला आणि प्रथमच एका पशुवैद्याला हा सन्मान मिळाल्याची नोंद इतिहासात झाली.

       बुळकांडी प्रतिबंधक लसीकरणाची नवीन पद्धत भारतात रुजवणारे पहिले पशुवैज्ञानिक, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी विराजमान होणारे ‘पहिले’ भारतीय पशुविज्ञान अध्यापक आणि ‘रावबहादूर’ या सन्मानाने गौरवले गेलेले ‘पहिले’ पशुवैद्य अशीच डॉ. फडके यांची ओळख या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक मराठी मनात राहील हे नि:संशय!

- डॉ. रामनाथ सडेकर

फडके, विष्णू रामचंद्र