Skip to main content
x

राजाध्यक्ष मंगेश विठ्ठल

     इंग्रजी वाङ्मयाच्या गाढ्या व्यासंगाने सिद्ध झालेल्या भूमिकेतून, संवेदनशीलपणे व तेवढ्याच रसिकतेने सामाजिक, सांस्कृतिक व वाङ्मयीन क्षेत्राचा मार्मिक वेध घेणारे समीक्षक, ललित लेखक म्हणून मंगेश राजाध्यक्ष महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांचा जन्म मुंबईत, शिक्षण छबिलदासमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात झाले. १९३६ ते १९७१ या काळात ते अहमदाबाद, कोल्हापूर व मुंबई येथील शासकीय महाविद्यालयांमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.

     ‘अभिरुची’ या मासिकातून त्यांच्या लेखनाला प्रारंभ झाला. त्यात त्यांनी ‘वादसंवाद’ हे सदर ‘निषाद’ हे टोपणनाव घेऊन लिहिले. ‘पाच कवी’ हा १९४६ साली प्रसिद्ध झालेला त्यांचा महत्त्वपूर्ण ग्रंथ. यामध्ये केशवसुत, ना.वा.टिळक, विनायक, गोविंदाग्रज, बालकवी यांच्या निवडक कविता व त्या कवींवर व त्या काळच्या कवितेवरील निबंधांचे संपादन त्यांनी केले आहे. यात आधुनिक कवितेचे अंतरंग त्यांनी उलगडून दाखविले आहे. तसेच आधुनिक मराठी साहित्याची ऐतिहासिक उपपत्तीही मांडली आहे. अंतर्मुखता हे नव्या काव्याचे प्रमुख लक्षण सांगून काव्यातील ऐहिकतावाद, निसर्गप्रेम व गूढवादाचा उलगडाही त्यांनी केला आहे, आणि कवितेच्या बहिरंगामध्ये कसा बदल झाला हे स्पष्ट केले आहे. त्यांचा ‘अम्लान’ (१९८३) हा समीक्षात्मक ग्रंथही मराठी समीक्षाव्यवहाराला वेगळी दृष्टी देणारा आहे. ‘खर्डेघाशी’ (१९८३) या पुस्तकातून साहित्यसृष्टीचे उपहासात्मक दर्शन त्यांनी घडविले आहे. संवेदनशीलता, रसिकता, चौफेर दृष्टी आणि प्रगल्भ विश्लेषण यांमुळे त्यांचे हे लेखन साहित्यसृष्टीच्या गुणदोषांवर नेमकेपणाने बोट ठेवते. ‘शब्दयात्रा’ (१९८६) हे त्यांचे साहित्यविषयक टिपणांचे पुस्तकही साहित्यविषयक जाणिवा समृद्ध करणारे आहे.

     समीक्षात्मक लेखनाबरोबरच हलकेफुलके पण तेवढेच दर्जेदार असे लघुनिबंध व ललितलेखही त्यांनी लिहिले आहेत. ‘आकाशभाषिते’ (१९६३), ‘पाक्षिकी’ (१९८६), ‘पंचम’ (१९८६), ‘शालजोडी’ (१९८३) ह्या त्यांच्या पुस्तकांचा वेध घेतला म्हणजे त्यांच्या संवेदनशीलतेचे आणि प्रगल्भतेचे दर्शन घडते.

     कोणताही विषय असो, त्यांच्या लेखणीतून तो साकारला म्हणजे त्याचे अंतर्बाह्य स्वरूप आपल्यासमोर प्रकट होणारच. शिवाय विषयाला बंधन नाही. ‘आंबोली’सारखे निसर्गसौंदर्याने नटलेले गाव ते आपल्या लेखातून जसे जिवंतपणे साकारतात तसेच शामगढसारखे आडवळणाचे रेल्वे स्टेशनही. कविवर्य अनिल आणि बाबूराव चित्रे या दिग्गजांची व्यक्तिचित्रे आपल्या लेखामधून ते जेवढ्या सहृदयतेने रेखाटतात, तेवढ्याच सहृदयतेने ‘शेवटच्या ट्रॅम’वर ते लेख लिहून जातात. त्यांचा टीकालेख असो, व्यक्तिचित्र असो, स्थलचित्र असो वा विनोदी लेख असो, त्यातून जाणवते की सत्याला आंतरिक प्रतिसाद आणि असत्यावर प्रहार हे त्यांच्या लेखणीचे ब्रीद आहे, आणि ते त्यांनी कसोशीने पाळलेले आहे.

     त्यांचा कुसुमावती देशपांडे यांच्या सहकार्याने लिहिलेला ‘हिस्टरी ऑफ मराठी लिटरेचर’ हा ग्रंथही महत्त्वपूर्ण आहे. ‘अभिरुची’ या मासिकामधून राजाध्यक्ष, पु.ल.देशपांडे आणि अळूरकर या तिघांनी मिळून ‘पुरुषराज अळूरपांडे’ या आगळ्यावेगळ्या नावाने स्फुट लेखन केले आणि ते खूप गाजले. तीन लेखकांनी मिळून  लेखन करण्याचा हा एक अभिनव प्रयोग मराठी साहित्यजगताला अनुभवायला मिळाला.

     लेखनाबरोबरच राजाध्यक्षांनी नॅशनल बुक ट्रस्ट, भारतीय ज्ञानपीठ निवड समिती, साहित्य अकादमी मराठी समिती, चित्रपट सल्लागार समिती, इत्यादी समित्यांवर सभासद म्हणून कार्य केलेले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे मुख्य संपादक म्हणूनही जबाबदारी पार पाडलेली आहे. ‘अम्लान’ या त्यांच्या ग्रंथास राज्यशासनाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

     राजाध्यक्षांच्या साहित्यलेखनाचे चिंतन केले म्हणजे खंत वाटते ती ही की, त्यांनी लेखनाचे सातत्य ठेवले नाही आणि जे लिहिले त्याला पुस्तकरूप दिले नाही. त्यामुळे मराठी साहित्यसृष्टीला, रसिकांना आणि अभ्यासकांना त्यांनी एक प्रकारे अतृप्त ठेवले आहे. असे असले तरी, त्यांचे लेखन सत्यनिष्ठेवर पोसलेले असल्यामुळे बावनकशी सोन्याप्रमाणे झळाळणारे आहे. समीक्षाव्यवहाराला नवीन दृष्टी प्रदान करणारा समीक्षक आणि शैलीदार ललितलेखक म्हणून त्यांचे योगदान सर्वमान्य आहे.

    - डॉ. संजय देशमुख

राजाध्यक्ष मंगेश विठ्ठल