Skip to main content
x

राजे, अनंत दामोदर

        नंत दामोदर राजे यांचा जन्म अनंत चतुर्दशीला मुंबईच्या खार उपनगरात झाला. सधन मंडळींचे टुमदार बंगले व वृृक्षवल्लींनी डवरलेल्या खारमध्ये त्यांचे बालपण गेले. राजे यांना कलेचे बाळकडू घरातच मिळालेले असावे. एकोणीसशे पन्नासच्या दशकात ते सर ज.जी. महाविद्यालयमध्ये वास्तुरचनाशास्त्राचे विद्यार्थी होते.

     त्यांच्या वर्गात दहा-बारा विद्यार्थ्यांचा एक हुशार म्हणून ओळखला जाणारा गट होता. ते सर्वजण वास्तुकलेच्या संकल्पनेचे विविध आविष्कार रेखाटण्यात तरबेज मानले जात. ते धडाडीचे व थोडे आगाऊ असल्याचे म्हटले जाई. यांतील बहुतांश मुंबईत प्रस्थापित झाले व व्यवसायात नावारूपाला आले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तरुणांत प्रगतिशील शिक्षण व विचार म्हणजे पाश्चिमात्य देश अशी विचारधारा होती. विद्यापीठातील प्राध्यापक जरी गोरे (इंग्लिश) राहिले नसले, तरी बहुतांश पाश्चिमात्य-शिक्षित होते. लंडनमधील दी रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्चरचा बराच दबदबा होता. त्यामुळे येथील शिक्षण पूर्ण होताच विद्यार्थी पाश्चिमात्य देशात जात. अनंत राजे यांनी तोच मार्ग स्वीकारला.

     अमेरिकेतील नावाजलेले तत्त्वज्ञ स्थपती लुई कान्ह यांच्या संपर्कात ते १९६४ साली आले. त्यांच्याबरोबर फिलाडेल्फियात त्यांना चार वर्षे काम करण्याची संधी मिळाली. या काळात वास्तुसंकल्पना याबाबत झालेल्या वैचारिक चर्चा व अनुभवांतून त्यांना नवीन दिशा सापडल्या. त्यांच्या विचारसरणीत आमूलाग्र बदल झाला. राजे म्हणत, ‘‘लुई कान्ह यांच्या व्यक्तिमत्त्वाचे दोन भाग होते, एक होता तत्त्वज्ञाचा व दुसरा स्थपतीचा. त्यांच्यातील विभाजनाची रेषा धूसर होती. पण दोन्ही भूमिका एकमेकांस पूरक होत्या.’’ अहमदाबादमधील आय.आय.एम.विषयी विचार करताना येथील हवामान, संस्कृती यांच्या सखोल अभ्यासातून, येथील मातीच्या विटांपासून एक अप्रतिम वास्तू निर्माण करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. ते आज सौंदर्यस्थळ होऊन बसले आहे. या सर्व विचारमंथनात राजे यांना सहभागी होऊन कार्यरत होण्याची संधी मिळाली. त्यांची बुद्धिमत्ता व आकलनशक्ती ओळखून लुई कान्ह यांनी आय.आय.एम. प्रकल्पावर त्यांची नियुक्ती केली.

     लुई कान्ह यांचे १९७४ साली आकस्मिक निधन झाले. आय.आय.एम.चे काम पूर्ण व्हायचे होते. त्याची जबाबदारी साहजिकच राजे यांच्यावर पडली. त्यानंतर त्यांना कॅम्पसमधील व्यवस्थापन विकास केंद्र, प्रेक्षागार, संगणक केंद्र वगैरे वास्तूंच्या संकल्पनेत समरसतेचा संवेदनशील मुद्दा हाताळावा लागला. त्याचप्रमाणे अनुकरणाचे दडपणही अस्वस्थ करणारे असेच होते. ही आव्हाने त्यांनी समर्थपणे पेलली.

     वास्तुविशारदांची कामे लोकशाहीस पूरक व सार्वजनिक उपयुक्ततेसाठी असावीत. दोशी, कोरिया, लॉरी बेकर, कानविंदे यांच्यासारख्या श्रेष्ठ वास्तुविशारदांच्या प्रकल्पांतून याची प्रचिती येते. राजेही याच विचारप्रणालीतले होते. त्यांची सर्व प्रमुख कामे शैक्षणिक किंवा संख्यात्मक कार्यालये होत. राजे मनस्वी, मितभाषी विचारवंत होते. त्यांचा पारंपरिक शैलीचा अभ्यास सखोल होता. साध्या राहणीवर त्यांचा भर होता. आपल्या कामात ते मग्न असल्याचे नेहमीच आढळून येई. प्रकल्पाचे रेखाटन व बांधकामाच्या विविध पैलूंवर त्यांचे विचारपूर्वक परिशीलन चाले. आपले कलाकौशल्य पणास लावून प्रत्येक वास्तू कशी परिपूर्ण होईल, याचा त्यांना ध्यास लागलेला असे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक प्रकल्पावर त्यांची स्वत:ची अशी छाप दिसून येते.

     ‘सेप्ट’ या वास्तुकलेच्या शिक्षणाकरिता नावारूपाला आलेल्या संस्थेशी त्यांचा सुरुवातीपासून संबंध होता. तेथे तीस वर्षे ते विद्यादानात रमून गेले. पुढे १९८२ ते १९८६ या काळात ते संस्थेचे संचालक झाले. विद्यार्थ्यांत ते एक शिस्तप्रिय व प्रतिभासंपन्न अध्यापक म्हणून ओळखले जात. ‘सेप्ट’मध्ये त्यांचा दरारा होता व सद्भावनाही होती.

     महाराष्ट्राबाहेर व देशात नावलौकिकास आलेल्या व्यक्तींच्या यादीत, मूळचे मुंबईतील, पण अहमदाबादमध्ये व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले वास्तुविशारद अनंत राजे यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

चिंतामण गोखले

राजे, अनंत दामोदर