रामपुरे, भगवान देवेंद्र
‘‘वडिलांनी मातीत घातले म्हणून घडलो,’’ असे उद्गार काढणारे शिल्पकार भगवान देवेंद्र रामपुरे यांचा जन्म सोलापूर येथे एका गरीब कुटुंबात झाला.
सोलापुरातील रामवाडी भागात रामपुरे यांचे लहानपण गेले. वडील मूर्तिकार असल्यामुळे त्यांचे बालपण मातीशी खेळण्यात गेले. शालेय जीवनात विष्णू, लक्ष्मी व इतर मूर्ती करून घरातील अर्थाजनाला आधार देण्याचा प्रयत्न करत रामपुरे यांनी कलासाधनेला सुरुवात केली. पुढे कला महाविद्यालयात दाखल झाल्यावर तेथे त्यांच्या संवेदनशील मनाला भावी जीवनाचा मार्ग सापडला.
रामपुरे यांनी केलेले अभिनेत्री नर्गिसचे शिल्प पाहून प्राचार्य देवरकोंडांनी त्यांना शिल्पकार होण्यास सांगितले. हा सल्ला रामपुरे यांनी शिरोधार्य मानला व १९८७ मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून त्यांनी जी.डी. आर्ट डिप्लोमा इन स्कल्प्चर अॅण्ड मॉडेलिंग ही पदविका मिळवली. त्यांना १९८६-८७ मध्ये जे.जे.च्या वार्षिक प्रदर्शनांत पारितोषिके मिळाली.
सोलापूर येथे रामपुरे यांचा ‘रामपुरे आर्ट’ हा भव्य स्टूडिओ आहे. दगड, धातू, प्लास्टर ऑफ पॅरिस, फायबर ग्लास अशी अनेक माध्यमे शिल्पकाराला आज उपलब्ध असली तरी ‘माती संवेदनशील असते, तिला हातांचा स्पर्श कळतो, ती आपल्याला हवा तो आकार धारण करते आणि मनाशी तिचा संवाद साधला जातो’, असे रामपुरे यांना वाटते.
रामपुरे यांनी जाहिरात व उद्योग क्षेत्राशी संबंधित शिल्पेसुद्धा केली. ‘फेमिना’, ‘गोल्ड फ्लेक’, ‘रहेजा ग्रूप ऑफ बिल्डर्स’ यांच्यासाठी त्यांनी कलात्मक स्मृतिचिन्हे केली. झेप घेण्याच्या तयारीत असलेला आणि हळूहळू ‘कावासाकी’ मोटरसायकलमध्ये बदलत जाणारा चित्ता ही त्यांचीच निर्मिती होती. ओनिडा दूरचित्रवाणी संचाच्या दिनदर्शिकेमधील शिल्पाकृतींचे कामही त्यांनी केले. अमूर्त शैलीतील गणपतीच्या त्यांनी साकारलेल्या मूर्ती अनेक दिवाणखान्यांमध्ये विराजमान झाल्या आहेत.
रामपुरे यांचे विशेष गाजलेले शिल्प म्हणजे मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या इमारतीसमोर २००८ मध्ये उभारण्यात आलेले ‘चार्जिंग बुल’ हे वृषभ शिल्प. अमेरिकेतील वॉल स्ट्रीट येथील ‘चार्जिंग बुल’ या शिल्पावर ते आधारित आहे. सत्ता आणि संपत्ती यांचे प्रतीक असलेल्या या बैलाचा आक्रमक पवित्रा आणि त्याच्या शरीराचे तटतटलेले स्नायू यांमुळे या शिल्पात नाट्यात्मकता आली आहे.
शहराच्या सुशोभीकरणाचा भाग म्हणून सार्वजनिक ठिकाणी काही शिल्पे उभारली जातात. स्मारकशिल्पांपेक्षा थोडा वेगळा असा प्रकार आता अधिक प्रमाणात रूढ होतो आहे. रामपुरे यांनी असेच एक पंचवीस फूट उंचीचे शिल्प मस्कतमधल्या सुलतान काबूज रोडवर उभारले आहे. त्यात एक गुलाबाचे झाड आहे. त्या झाडाची मुळे कुंडी फोडून आत जमिनीत घुसली आहेत. जाणारे-येणारे लोक हे शिल्प पाहताच क्षणभर रेंगाळतात आणि मगच पुढे जातात.
बॅले करणारी रशियन युवती, मुंबईच्या स्वामिनारायण मंदिरातले योगी महाराज, याबरोबरच कवी ग्रेस, नाटककार विजय तेंडुलकर, दीनानाथ मंगेशकर अशा प्रतिभावंतांची शिल्पेही रामपुरे यांनी केलेली आहेत.
- दीपक पाटील