Skip to main content
x

रांगणेकर, कुमुदिनी

     कुमुदिनी रांगणेकर (प्रभावळकर) यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांचे शिक्षण बी.ए.पर्यंत झाले. त्या लोकमान्य कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांचे वास्तव्य मुंबईला होते. कुमुदिनी रांगणेकरांची २३६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका असे विविध प्रकारचे साहित्य त्यांनी लिहिले. मात्र कादंबरी हा त्यांचा आवडता साहित्यप्रकार.

     ‘नवल’ मासिकातून अनेक इंग्रजी कादंबर्‍यांचे मराठी अनुवाद त्यांनी केले.

     ‘अनियमित जग’ (१९३४) ही त्यांची पहिली अनुवादित कादंबरी. ‘प्रीतीचा शोध’ (१९८०), ‘फुललेली कळी’(१९८४), ‘शकुनी मोहर’ (१९८४), ‘हरपलेलं गवसलं’ (१९८७), ‘क्षणाचं वैधव्य’ (१९८८) या त्यांच्या काही लोकप्रिय कादंबर्‍या आहेत.

     ‘चार उणे एक बरोबर दोन’, ‘स्वप्नातली कळी’, ‘मखमली वल्ली’ (१९७८), ‘मर्मबंध’, ‘सोन्याची शिडी’, ‘गंधाविना चंदन’, ‘स्वप्नाळू प्रीतशकुनी मोहर’ (१९३२), ‘एकेरी गाठ’ (१९३७), ‘कल्पना’ (१९३८), ‘बेसूर संगीत’ (१९३८), ‘विरलेले वस्त्र’ (१९४०), ‘परतदान’ (१९४३), ‘माळावरील खून’ (१९५४), ‘पुनर्जीवन’ (१९५५), ‘पैजेचा विडा’ (१९५६), ‘प्रीतीचा गोलघुमट’ (१९५७), ‘मोही नयना मना’ (१९७९), ‘नियती’ (१९७९), ‘रिती ओंजळ’ (१९७९), ‘कवठी चाफा’(१९७९), ‘काजळरात’ (१९८१), ‘चकवा’ (१९८१), ‘कुस्करलेलं हृदय’ (१९८२), ‘रंगेल राजा’ (१९८२), ‘कडू अमृत’ (१९८४), ‘एकलीच दीपकळी’ (१९८५), ‘एकटी दुकटी’ (२०००), ‘ढगाळलेलं मन’ (१९९६) अशा आणखी कादंबर्‍या आहेत. त्यांच्या कादंबर्‍यांची शीर्षके अर्थपूर्ण व आकर्षक असत.

     सर्वसामान्य वाचकांचे मनोरंजन करणार्‍या लोकप्रिय कादंबर्‍या त्यांनी सातत्याने लिहिल्या. विपुल लिहिणार्‍या बहुप्रसव लेखिका म्हणून त्या वाचकवर्गात ख्यातनाम झाल्या.

- प्रा. अनुराधा साळवेकर

रांगणेकर, कुमुदिनी