Skip to main content
x

रांगणेकर, सजबा शंकर

     सजबा शंकर रांगणेकर यांचा जन्म मुंबईला झाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून इंग्रजी विषय घेऊन बी.ए.ची पदवी संपादन केली. त्यानंतर ते अगोदर रॉबर्ट मनी स्कूलमध्ये शिक्षक आणि नंतर माझगावमधील इझ्रेलाइट हायस्कूलचे मुख्याध्यापक होते. १९०३ च्या सुरुवातीस ते वेंगुर्ला येथे इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक म्हणून गेले; त्याच वर्षाच्या शेवटी ते एलएल.बी. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. १९०४ मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या अपील शाखेत वकिलीस सुरुवात केली. ते मुंबई आणि इतर ठिकाणच्या कनिष्ठ न्यायालयांमध्येही खटले लढवीत असत. पाच वर्षे वकिली केल्यानंतर ते इंग्लंडला गेले आणि जून १९०९ मध्ये लिंकन्स इन्मधून बॅरिस्टर झाले. बॅरिस्टरच्या परीक्षेत ते पहिल्या वर्गात पहिले आले व त्यांना अनेक बक्षिसे मिळाली.

      स्वदेशी परतल्यावर रांगणेकर यांनी उच्च न्यायालयाच्या अपील आणि मूळ या दोन्ही शाखांत तसेच इतर न्यायालयात पुन्हा वकिली सुरू केली. डिसेंबर १९१६ ते मे १९२२ या काळात गाजलेल्या अनेक महत्त्वाच्या फौजदारी खटल्यांत वकील या नात्याने रांगणेकरांचा सहभाग होता. त्यांत नाशिक कट खटल्याचाही समावेश होता.

       सप्टेंबर१९२४मध्ये त्यांची नियुक्ती मुंबईचे मुख्य इलाखा दंडाधिकारी (चिफ प्रेसिडन्सी मॅजिस्ट्रेट) म्हणून करण्यात आली. त्या पदावर ते दोन वर्षे होते. एवढ्या अल्प कारकिर्दीतील त्यांच्या कार्याची जाहीर प्रशंसा मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांनी केली. रांगणेकर यांची प्रथम ऑगस्ट १९२६ मध्ये चार महिन्यांसाठी व नंतर पुन्हा जून १९२७ ते ऑक्टोबर १९२७ या काळात मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. नंतर जून १९२८मध्ये त्यांची नियुक्ती उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून झाली. एप्रिल१९२९ मध्ये त्यांना कायम न्यायाधीश नेमण्यात आले. १९३६ मध्ये काही काळ त्यांनी कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले. दंडाधिकारीपदावरून थेट उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्त झालेले ते एकमेव न्यायाधीश होत. जून १९३८ मध्ये त्यांना ‘सर’ ही पदवी मिळाली. डिसेंबर १९३८ मध्ये ते निवृत्त झाले.

      न्या.रांगणेकर यांनी मूळ आणि अपील या उच्च न्यायालयाच्या दोन्ही शाखांत न्यायदान केले. त्यांनी अनेक गाजलेल्या खटल्यांत महत्त्वाचे निर्णय दिले. त्यांत विशेषत: हिंदू कायदा, कंपनी कायदा, व्यापारविषयक कायदा, वकिलांसंबंधी आणि सॉलिसिटर मंडळींसंबंधीचे नियम इत्यादी विविध विषयांतील गुंतागुंतीचे मुद्दे समाविष्ट होते. कुठल्याही खटल्यातील कायद्याचे मुद्दे न्या.रांगणेकर त्वरित समजून घेत आणि त्यांवर दोन्ही बाजूंच्या वकिलांशी चर्चा करीत. त्यामुळे बर्‍याच वेळा खटला पुढे न चालता परस्पर तडजोड होत असे. असे न झाल्यास न्या.रांगणेकर त्वरित निर्णय देत आणि ते सुस्पष्ट व मुद्देसूद असत. या कार्यपद्धतीमुळे त्यांच्याबद्दल सार्वत्रिक आदराची भावना होती. न्या.रांगणेकर विनयशील, मृदुभाषी, त्याचबरोबर अतिशय मिस्किल व हजरजबाबी म्हणून प्रसिद्ध होते. ते निर्भीड व स्पष्टवक्तेही होते. त्यांना क्रिकेटची खूप आवड होती.

- शरच्चंद्र पानसे

संदर्भ
१.      बॉम्बे लॉ रिपोर्टर, १९३८.
रांगणेकर, सजबा शंकर