Skip to main content
x

राऊळ, श्रीकृष्ण गोपाळ

राऊळ महाराज

     राऊळ महाराज, अर्थात श्रीकृष्ण गोपाळ राऊळ यांची जन्मभूमी व कर्मभूमी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या निसर्गरम्य कुडाळजवळचे पिंगुळी गाव होय. या गावाला राऊळ महाराजांचे समाधी मंदिर असून येथे भक्तांची दर्शनासाठी रीघ लागते. राऊळ महाराजांचे वडील गोपाळराव सधन शेतकरी होते. त्यांना तीन अपत्ये झाली, त्यांतले श्रीकृष्ण हे मोठे. त्यांना बालपणापासूनच शिक्षणात गोडी नव्हती. ते मराठी तिसरीपर्यंत शिकले. त्यांची प्रवृत्ती भजन, पूजन व संतांचे अभंग गाण्याची असल्याने, ते आत्मरंगी रंगलेले असत.

बांध्याने तगडे, उंच असल्याने वडिलांनी नोकरीधंद्यासाठी श्रीकृष्णाला मुंबईला पाठवले. त्या वातावरणात ते टापटीप शिकले. त्यांच्या ऐटबाज राहणीमुळे मित्रांचे मोहोळ जमले. त्यांना चिराबाजारात हातमोजे व टोप्या बनवण्याच्या कारखान्यात नोकरी लागली; परंतु काम करताना अभंग गायन सुरू राहिले. नोकऱ्या बदलत राहिल्या; पण भजन-गायन तसेच राहिले. पुढे ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या छापखान्यात नोकरी लागली. श्रीकृष्ण हुशार, चतुर व तरतरीत असल्याने कामात लवकरच प्रवीण झाला. पण भजनाच्या नादामुळे वरिष्ठ नाराज होऊन म्हणाले, ‘‘उद्या कामावर येऊ नकोस.’’ राऊळ उत्तरले, ‘‘माझे भजन बंद केलेत? तुमचा लाडका कुत्रा मरेल.’’ आणि सहा तासांतच वरिष्ठांचा प्रिय कुत्रा मेला. तेव्हापासून तो या भजनी अवलियाचा दास झाला. त्यांचे शिक्षण कमी असले, तरी मराठी व हिंदीवर त्यांचे प्रभुत्व होते.

जुने मराठी संतकाव्य राऊळ महाराज यांना मुखोद्गत होते. खोलीत रोज रात्री उभे राहून या अवलियाचे भजन- गायन बारा वाजेपर्यंत चाले. त्यामुळे लोकांनी कंटाळून व रागावून त्यांना ‘खुळे आबा’ असे नाव ठेवले. आबा अंतर्ज्ञानी आहे, द्रष्टा आहे असे लोकांना वाटे. त्यांच्या दृष्टीत व वागण्यात कोणताही भेदभाव नसे. ते मालवणी ही मायबोली बोलायचे. मुंबईतील माधवबागेत बाळकृष्ण महाराजांची कीर्तने होत. खुळे आबांना या कीर्तनाची ओढ असे. त्यांची आध्यात्मिक प्रगती होऊ लागली. कीर्तने ऐकून आबांनी बुवांची मर्जी संपादन केली. बाळकृष्ण महाराज यांनी या शिष्याला ‘सोलापूरला मठ उभारण्याचा संकल्प’ बोलून दाखवला होता.

आबा संन्यास घेऊन लगेच मठात जायला तयार झाले. ही वार्ता आबांच्या आईला समजताच ती गुरू महाराजांना भेटली व ‘‘याचा संन्यास मला मान्य नाही,’’ असे सांगून तिने स्पष्ट विरोध केला.

गुरू महाराजांनी आबांना परतवले. तरी भजन गायनाचा छंद चालूच राहिला. वडिलांनी या अवलियाचे लग्न लावून दिले होते. या साध्वीचे नाव राधाबाई. तिने खरोखर निष्ठेने संसार केला. खडतर जीवन जगली. त्यांना आठ अपत्ये झाली; पण फक्त ‘दाजी’ हा एकच मुलगा जगला. भजनाच्या अतिरेकामुळे, नादिष्टपणामुळे त्यांना अनेक नोकऱ्या लागूनही सुटत गेल्या. वडील गोपाळरावांच्या मृत्यूची वार्ता ऐकून या आबांनी ‘पुंडलिक वरदा हरि विठ्ठल’ ही आरोळी दिली आणि रात्र भजनात घालवून त्यांनी दुसऱ्या दिवसापासून चार दिवस मौनव्रत धारण केले.

खोलीत स्वत:ला बंद करून घेतले. शेवटी दरवाजा फोडावा लागला. पाहतात तो काय, आबा ध्यानस्थ. आबांनी गोदामाईच्या तीरावर पिताजींचे तर्पण केले. परत येताना वाटेत त्यांना दहा रुपयांची नोट मिळाली. त्यातून त्यांनी मृदंग विकत घेतला. भजनाला जोर चढला. वैराग्याकडे वाटचाल तीव्र होऊ लागली. त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. जो पगार फंड मिळाला, तो कामगारांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात वाटून ते मोकळे झाले. दिवसेंदिवस विक्षिप्तपणा, खुळेपणा वाढू लागला. आता ते भजनासाठी खेडोपाडी जाऊ लागले. आठ-आठ दिवस तिकडे मित्रांकडे राहू लागले. भजन व शिव्यांचा उच्चार हाच जीवनधर्म झाला. त्यांच्या चमत्काराच्या अनेक कथा आहेत.

पत्नी व एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूच्या वेळी ते स्मशानातही भजन विसरले नाहीत. एका भक्ताकडे रक्कम मागून ती दुसऱ्या गरजूला देत. त्यांचे वागणे विचित्र असे. कधी एकाच वेळी ते चार-पाच जणांचे अन्न फस्त करीत, तर प्रसंगी आठवडाभर उपाशी राहत. त्यांच्या आज्ञेने एका भक्ताने पिंगुळी येथे सुंदर इमारत बांधली : ‘प.पू.राऊळ महाराज मंदिर’. बांदिवडेकर-परब-कशाळकर या तिघांनी मिळून पिंगुळीला दोन वास्तू बांधून आबांना अर्पण केल्या.

१९४८ ते १९७२ या काळात ते सहा महिने भटकंती व सहा महिने ध्यान करीत. आबा राऊळ यांना सिद्धी प्राप्त होती. एका अपघातात ते पंगू झाले आणि नंतर त्यांनी समाधी घेतली. पिंगुळीला शिर्डी संस्थानासारखे महत्त्व प्राप्त झाले आहे.

वि.. जोशी

राऊळ, श्रीकृष्ण गोपाळ