Skip to main content
x

रेंदाळकर,एकनाथ पांडुरंग

     आधुनिक काव्याच्या प्रारंभिक काळाचे एक महत्त्वपूर्ण कवी म्हणजेच एकनाथ पांडुरंग रेंदाळकर होत. अल्पायुष्य लाभलेल्या रेंदाळकरांनी विपुल काव्यलेखन केले आहे. तत्कालीन काही वाङ्मयीन नियतकालिकांच्या संपादन-कार्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता. त्या वेळच्या कोल्हापूर संस्थानातील रेंदाळ या गावी त्यांचा जन्म झाला. रेंदाळकर हे कुटुंब मूळचे वतनदार कुळकर्णी होते. वडील पांडुरंगपंत हे रेंदाळात एका व्यापार्‍याकडे नोकरीला होते. आजोळी कुरुंदवाड येथे आणि रेंदाळ येथे त्यांचा बाल्यकाळ व्यतीत झाला. प्राथमिक शिक्षण रेंदाळला पूर्ण झाले. मराठी चौथीनंतर पुढील शिक्षणासाठी ते कागल संस्थानातील शाळेत दाखल झाले. इंग्रजी चौथ्या इयत्तेत असताना वडील निवर्तल्यामुळे शाळा सोडून मनःशांतीसाठी नरसोबाची वाडी येथे दत्तसेवेला सुरुवात केली.

      रेंदाळकरांना बालपणापासूनच वाचनाचा नाद होता. शालेय जीवनातच काव्यलेखनाला प्रारंभ झाला. प्राचीन मराठी व संस्कृत काव्याचा खोल संस्कार त्यांच्या काव्यशैलीवर झालेला दिसतो. काव्यलेखनाच्या संदर्भात आईचे प्रोत्साहन असल्याचे रेंदाळकर सांगतात. दरम्यान, कागल येथून व्हर्न्याक्युलर फायनल परीक्षा उत्तीर्ण झाले.

     १९०५मध्ये चिकोडी तालुक्यातील कुन्नूर या गावी असिस्टन्ट मास्तर म्हणून त्यांच्या नोकरीला सुरुवात झाली. दोन वर्षांनंतर प्राचीन महाकाव्यांचा अभ्यास करण्यासाठी ते सांगलीच्या संस्कृत पाठशाळेत दाखल झाले. १९०९मध्ये कोल्हापूरला रेंदाळकरांनी बाळशास्त्री हुपरीकर यांच्याकडे संस्कृत भाषा आणि काव्यशास्त्र यांचा अभ्यास केला. प्रारंभीचे काव्यलेखन त्यांनी ‘मंदार’ ह्या टोपणनावाने केले. ‘विजयी मराठा’ ह्या साप्ताहिकात त्यांचे प्रारंभिक काव्य व गद्यलेखन प्रकाशित झाले. १९१०मध्ये त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘मन्दार-मञ्जरी’ प्रसिद्ध झाला. त्याच काळात त्यांनी ‘धर्मविचार’ या नियतकालिकाचे सहसंपादक म्हणून कार्य केले. उल्लेखनीय वाङ्मयीन कार्यासाठी शंकराचार्यांनी त्यांना ‘कविभूषण’ ही पदवी बहाल केली.

     १९१०मध्येच रेंदाळकरांचा विवाह संपन्न झाला. ‘मनोरंजन’ व ‘करमणूक’ ह्या तत्कालीन गाजलेल्या नियतकालिकांचे साहाय्यक संपादक म्हणून अतिशय मोलाचे कार्य रेंदाळकरांनी केले. ज्या निर्यमक काव्यरचनेचे जनक म्हणून रेंदाळकर विख्यात आहेत, तशी काव्यरचना त्याच सुमारास ‘विविधज्ञानविस्तार’ व ‘मनोरंजन’ यांमधून त्यांनी केली. हरिभाऊ आपटे ह्यांचे साहाय्यक म्हणून ‘करमणूक’चे काम करताना त्यांनी महाभारतावरील ग्रंथलेखनासाठी हरिभाऊंना टिपणे काढण्यात सहकार्य केले. याच काळात बंगाली साहित्याशी रेंदाळकरांचा परिचय झाला. मायकेल मधुसूदन दत्त यांच्या ‘वज्रांंगना’चे ‘विरहिणी राधा’ हे, तर वंगनाट्यकवी द्विजेंद्रलाल रॉय यांच्या ‘चंद्रगुप्त’ नाट्यकृतीचे ‘मौर्यविजय’ ही यशस्वी रूपांतरे त्यांनी केली. स्वतःला केशवसुतांचे निष्ठावंत अनुयायी मानणार्‍या रेंदाळकरांनी अल्पायुष्यातच विपुल असे काव्यलेखन केलेले दिसते. अत्यंत संघर्षमय आणि खडतर अशा जीवनक्रमातून अखेरपर्यंत ते काव्यवाट शोधत राहिले. ‘काव्य’ हा रेंदाळकरांच्या दगदगीच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा विरंगुळा असल्याचे त्यांचे चरित्रकार सांगतात. प्रामुख्याने त्यांची कविता ‘रेंदाळकरांची कविता- प्रथम खंड’ (१९२४) व ‘रेंदाळकरांची कविता- द्वितीय खंड’ (१९२८) या दोन संग्रहांत समाविष्ट असून ह्या दोन्ही खंडांचे संपादन रेंदाळकरांचे घनिष्ठ मित्र, सांगलीचे वामन जनार्दन कुंटे ह्यांनी केले आहे. प्रथम खंडाला ग.त्र्यं.माडखोलकरांची प्रस्तावना असून त्यात त्यांनी रेंदाळकरांच्या निर्यमक काव्यशैलीचा नवतेच्या व बंडखोरीच्या अंगाने गौरव केला आहे. तद्वतच निर्यमक रचनेची स्फूर्ती त्यांना इंग्लिशमधील ब्लँक व्हर्स ऐवजी संस्कृत काव्यरचनेतून झाल्याचे मत व्यक्त केले आहे.

     दोन काव्यखंडांशिवाय ‘मोहिनी’ (१९१३) ‘अन्योक्तिमुक्तांजली- भाग-१’ (१९११), ‘अन्योक्तिमुक्तांजली - भाग-२’ (१९१५), ‘विरहिणी राधा’ (१९१६), ‘बुद्धनीती’ (१९१६) ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली होती. केशवसुतांच्या निधनानंतर आणि गोविंदाग्रजांचा उदय होण्यापूर्वी मधला काळ ए.पां. रेंदाळकरांनी गाजविला. त्यांच्या कवितेच्या प्रथम खंडात ‘मन्दारमञ्जरी’, ‘काव्यकुसुममाला’, ‘कर्णमंगल’, ‘काव्यगुंफा’ व ‘स्फुटकविता’ ह्या पाच शीर्षकांतर्गत जवळजवळ साडेतीनशे स्फुटकविता संग्रहित आहेत. विषयाची आणि वृत्तरचनेची विविधता इथे पाहायला मिळते. हे दोन्ही खंड उत्तम संपादनाचेही नमुने ठरावेत असे आहेत. दुसर्‍या खंडात १५ विविध खंडकाव्ये- दीर्घकविता समाविष्ट आहेत. रेंदाळकर हे ‘चतुरस्र कवी’ असल्याचा अभिप्राय ह्याचमुळे भ.श्री.पंडितांनी त्यांच्या ‘आधुनिक मराठी कविता’ या पुस्तकात व्यक्त केला असावा. त्यांनी आपल्या काव्यातून प्लॅटॉनिक प्रेमाचा पुरस्कार केला. संस्कृत, बंगाली व इंग्लिश  ह्या भाषांमधल्या चांगल्या काव्याचे सरस अनुवादही त्यांनी केले. जुन्या वातावरणाचे संस्कार असले, तरी त्यांची मते काळापुढेच होती. ‘प्रतिवंचित स्त्रीवर्ग’, ‘स्त्रीसुधारणा’, ‘जगदीशचंद्र बोस’, ‘जर्मनीचा कैसर’ ‘भारतमाता’, ‘भारतभूमी’, ‘द्रौपदी’, ‘धर्महानीचे भय’ इत्यादी कवितांतून त्यांची आधुनिकता आणि समकालीनता स्पष्टपणे प्रतीत होते. टेनिसनच्या ‘एनॉक आर्डन’चे ‘सारजा’ या नावाने त्यांनी रूपांतर केले. त्यांच्या काही महत्त्वपूर्ण कवितांमध्ये ‘उघडि नयन रम्य उषा’, ‘निजू दे स्वस्थपणे आता’, ‘वनराणीपरी असावयासी हिंडत शेतातुनी’, ‘अजुनि चालतोचि वाट, माळ हा सरेना, विश्रांतिस्थळ केव्हा यायचे कळेना’ ह्या गीतसदृश रचनांचा समावेश होतो. निर्यमक रचनेचा हा कर्ता आपल्या एका कवितेत जे म्हणतो हे “निसर्गमृदुपाद हे रुचिर काव्य, देवी! तुझे / कशास मग सांग या यमकशृंखला घातल्या?” तेही रसिकांना पटते. परंतु, त्यांच्या अनेक सुंदर रचना ह्या सयमक आहेत, हेही लक्षात घेतले पाहिजे.

     - डॉ. राजेंद्र नाईकवाडे

रेंदाळकर,एकनाथ पांडुरंग