Skip to main content
x

रणदिवे, सतीश बाबुराव

     सतीश बाबूराव रणदिवे यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव मालती. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापूरमधील श्री. गणेश नागोजीराव  पाटणकर विद्यालयातून झाले तर राजाराम महाविद्यालयामधून त्यांनी बी.एस्सी. केले. सतीश यांना वैद्यकीय शिक्षण घ्यायची इच्छा होती, पण इंटर सायन्सला प्रथम वर्ग न मिळाल्याने त्यांना प्रवेश मिळाला नाही. पण त्यांना फोटोग्राफीची आवड असल्याने त्यांनी सिनेकॅमेरामन म्हणून आपली कारकिर्द घडवण्याच्या उद्देशाने त्याचे शास्त्रोक्त व तंत्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी पुणे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश परीक्षा दिली. पण तेथेही ते अपयशी ठरले. तरीही प्रात्यक्षिकांद्वारे ही कला आत्मसात करायची या जिद्दीने त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली. तेव्हा त्यांनी एक लाईटमन (रिफ्लेक्टर बॉय) म्हणून कोल्हापुरातील विष्णुपंत चव्हाण यांच्या युनायटेड साऊंड सर्व्हिस या ठिकाणी रोजंदारीवर काम करण्यास सुरुवात केली. या कामाबरोबर त्यांना दिग्दर्शनातही रस निर्माण होऊ लागला, म्हणून त्यांनी अरुण कर्नाटकी, जी.जी. भोसले, बाबासाहेब फत्तेलाल, डॉ. श्रीराम लागू, दिनकर द. पाटील यांच्याबरोबर साहाय्यक दिग्दर्शक म्हणून ‘घरजावई’, ‘ठिणगी’, ‘लग्नाची पैज’, ‘हीच खरी दौलत’, ‘झाकोळ’ इ. चित्रपट केले.

     कोल्हापूरमधील होतकरू कलाकार तंत्रज्ञ यांनी एकत्र येऊन सहकारी पद्धतीने चित्रपट निर्मिती करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या श्री. महालक्ष्मी सहकारी चित्रपट संस्था उभारणीत सहभागी होऊन त्याचे व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही काही काळ काम केले. पुढे रणदिवे यांनी ‘पसायदान चित्र’ ही संस्था स्थापन करून लेखक, सहनिर्माता व दिग्दर्शक म्हणून ‘बहुरूपी’ (१९८४) हा स्वतंत्रपणे पहिला चित्रपट तयार केला. या पहिल्याच प्रयत्नाला उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक अशी चार पारितोषिके मिळाली आणि वेगळ्या वाटचालीचा एक दिग्दर्शक म्हणून त्यांची चित्रपटविश्‍वात नोंद झाली.

     पुढे वेठबिगारी समस्येवर आधारित ‘निखारे’ (१९८५), भ्रष्ट शासकीय यंत्रणेविरोधातील ‘अन्याय’ (१९८६) या सामाजिक पारितोषिक विजेत्या चित्रपटानंतर त्यांनी  ‘चल रे लक्ष्या मुंबईला’ (१९८७) हा व्यावसायिक चित्रपटही दिला. त्यानंतर रहस्याची जोड असलेला ‘मज्जाच मज्जा’ (१९८८), सुशिक्षित बेकार तरुणीची कथा असलेला ‘रिक्षावाली’ (१९८९), अस्सल ग्रामीण विनोदी व्यक्तिरेखा असलेला ‘शुभ बोल नार्‍या’ (१९९०), अ‍ॅक्शन पॅक ‘मालमसाला’(१९८९) हे चित्रपट केले. ‘मुंबई ते मॉरिशस’ (१९९०) हा मराठीत प्रथमच परदेशी चित्रीकरण झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून मान मिळवला. पु.ल. देशपांडे, वि.वा शिरवाडकर, एम.एफ. हुस्सेन यांच्या उपस्थितीत मॉरिशस या ठिकाणी प्रदर्शित करून मराठीतील पहिला जागतिक प्रिमियर ही नांदी या त्यांच्या चित्रपटाने केली. त्यानंतर पत्रकारिता आणि गुन्हेगारीविश्‍व यावर आधारित ‘रणांगण’ (१९९२), भय-थरारपट असलेला ‘गृहप्रवेश’ (१९९४), नव्या कलाकारांना घेऊन गतकाळातील प्रेमकथा असलेला पारितोषिक विजेता चित्रपट ‘नीलांबरी’ (१९९६), ‘नवरा माझ्या मुठीत गं ’(१९९८), एकतर्फी प्रेमावरील ‘तूच माझी सुहासिनी’ (२०००), या चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावरील ‘लोकराजा’ नावाच्या दूरदर्शन मालिकेचे अभ्यासपूर्ण दिग्दर्शन करून त्याचे ५८ भाग सह्याद्री वाहिनीवर २००२ साली प्रक्षेपित केले.

     शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनेवर आधारित ‘बळीराजाचं राज येऊ दे’ (२००६) या सामाजिक पारितोषिक विजेत्या चित्रपटाचे पटकथा व दिग्दर्शन सतीश रणदिवे यांनीच केले. बापाच्या इस्टेटीत मुलाबरोबर मुलीचाही समान हक्क या नव्या हिंदू कायद्यावर आधारलेल्या ‘माहेरची माया’ (२००७) , तसेच साप या प्राण्याबद्दलचे गैरसमज दूर करू पाहणारा ‘काळभैरव’ (२०१०) आणि अनाथ मुलीच्या भावविश्‍वाचे स्वरूप उलगडणारा ‘दुसऱ्या जगातील’ (२०१२) याही चित्रपटांची निर्मिती-दिग्दर्शन व लेखन रणदिवे यांनी केले. मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त हे ‘दुसऱ्या जगातील’ चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखेद्वारे एक सशक्त अभिनेता म्हणूनही प्रेक्षकांना त्यांची ओळख झाली. मराठी चित्रपटव्यवसायात विविध विषय हाताळणारे एक कसबी दिग्दर्शक म्हणून राजदत्त ओळखले जातात.

     रणदिवे यांनी यापूर्वी अ.भा. मराठी चित्रपट महामंडळावर उपाध्यक्ष म्हणूनही काही काळ काम केले असून, गेली पंधरा वर्षे चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणीवर निवडून येऊन मराठी चित्रपट व्यवसायाच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील आहेत.

- सुधीर नांदगावकर

रणदिवे, सतीश बाबुराव