Skip to main content
x

साधले, नलिनी आनंद

     नलिनी साधले यांनी पुणे विश्वविद्यालयातून एम.ए. झाल्यावर उस्मानिया विश्वविद्यालयातून पीएच.डी. पदवी संपादन केली. पीएच.डी.च्या अभ्यासात त्यांनी संस्कृत साहित्यातील कथानकांचा व त्यातदेखील सोमदेवाच्या कथासरित्सागर या ग्रंथाचा विशेष अभ्यास केला. या अभ्यासानंतर संस्कृत साहित्यातील कथासाहित्याची पुनर्बांधणी करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी प्रतिपादले. त्यांच्या या अभ्यासासाठी त्या सातवळेकर सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या. १९९४मध्ये उस्मानिया विद्यापीठातून संस्कृतच्या प्राध्यापिका व विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाल्या. त्यांनी अनेक महनीय संस्थांना व समित्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय संस्कृत संस्थान, दिल्ली येथे शास्त्रचुडामणीच्या विद्वान म्हणून काम पाहिले. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यातील संस्कृत काव्यातील कथा हे पुस्तक विशेष गाजले. त्यांची तुलसी रामायणाची संस्कृत समश्लोकी तुलसी मानस नलिनम् या नावाने प्रसिद्ध आहे. या ग्रंथाच्या पहिल्या भागात विविध वृत्तांतील २९२६ श्लोक आहेत. हा ग्रंथ पुणे येथे त्या वेळचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या हस्ते प्रकाशित झाला.

     संस्कृत, इंग्लिश, हिंदी, मराठी व तेलगू या भाषांच्या उत्तम जाणकार असणाऱ्या नलिनीताईंनी अनेक संस्कृत ग्रंथांची वरील विविध भाषांत भाषांतरे केली. उर्वशी व वसंतसेना या संस्कृत नाटकांचे व तेलगू नाटक सीताज्योसमचे मराठी भाषांतर केले. प्राचीन शेती हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय होता. या विषयावर अ‍ॅग्रीकल्चर अ‍ॅण्ड ऋग्वेद, वृक्षायुर्वेद, इकॉलॉजी अ‍ॅन्ड एन्शन्ट इंडियन अ‍ॅग्रिकल्चर, रेन प्रॉडक्शन थिअरीज ऑफ पराशर, आयुर्वेद ऑफ प्लॉट्स, प्राचीन भारतीय उद्यानविद्या अशा अनेक विषयांवर त्यांनी व्यक्तिश: व एकत्रितपणे शोधनिबंध लिहिले. इ.स.१०००मधील सुरपालाचा वृक्षायुर्वेद (१९९६), पहिल्या शतकातील पराशराचा कृषिपराशर (१९९९), आठव्या शतकातील काश्यपीय कृषिसूक्ति (२००२), १५५७मध्ये चक्रपाणि मिश्रा यांनी रचलेला विश्ववल्लभ (२००८), व तेराव्या शतकातील मृगपक्षिशास्त्र (२००८) अशा विविध ग्रंथांची त्यांनी भाषांतरे केली. शेतीच्या प्राचीन इतिहासावर त्यांनी केलेल्या श्रेष्ठ कार्यासाठी एशियन अ‍ॅग्रे हिस्ट्री फाउंडेशन या संस्थेतर्फे त्यांना सुवर्णपदकाने (२००२) सन्मानित करण्यात आले आहे.

डॉ. आसावरी बापट

साधले, नलिनी आनंद