Skip to main content
x

सांड, चंपालाल इंद्रराज

            शेती आणि शेतकरी जीवन यांचा अन्योन्यसंबंध लक्षात घेऊन या दोन्ही गोष्टींचा विकास करण्यासाठी झटणारे भारतीय किसान संघाचे आधारस्तंभ चंपालाल इंद्रराज सांड यांचा जन्म नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील साकुरी या गावात एका सधन शेतकरी कुटुंबात झाला. विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ते आपल्या मोठ्या भावासोबत पुणे येथे आले. त्यांनी १९५२मध्ये बी.एस्सी. ची पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त केली. नोकरीचा विचार न करता शेती हाच आपला व्यवसाय निवडला व आपल्या गावी परतले. पदवीधर, सुशिक्षित तरुण नोकरी न करता ‘शेती’ करतो, म्हणूनच समाजनिंदा सांड यांच्याही वाट्याला आली तरी त्यांनी शेती करण्यास सुरुवात केली. याच काळात त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांशी संबंध आला. त्यांनी १९७५मध्ये आणीबाणीच्या काळात सत्याग्रह केला व त्यासाठी त्यांना नाशिकच्या कारागृहात १९ महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला. तेथेच भारतीय किसान संघाच्या स्थापनेचे बीज रोवले गेले. या संघाच्या स्थापनेनंतर महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष व राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून सांड यांनी जबाबदारी स्वीकारली. या संघाच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी वर्गाला संघटित करण्याचे काम केले. गरीब शेतकर्‍याच्या कष्टांचे योग्य मूल्यमापन झाले पाहिजे, या उद्देशाने प्रेरित झालेल्या सांड यांनी या संघटनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना न्याय मिळवून देणारी चळवळ उभारली.

           शास्त्र शाखेचे पदवीधर असणार्‍या चंपालाल सांड यांना शेतीचे प्रायोगिक ज्ञान होते. रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय खते शेतीसाठी उपयुक्त असतात, हे त्यांनी शेतकर्‍यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच शेती, शेतकरी, त्यांच्या समस्या, त्यासाठी शेतकरी संघटन, त्या अनुषंगाने देशभर भटकंती, त्यातून शेतकर्‍यांचे प्रबोधन तसेच पाणी व वीजपुरवठा यातील अडचणी, पिकांच्या साठवणुकीची तरतूद, विक्री व्यवस्था व त्यासाठी शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा म्हणून सरकारकडे पाठपुरावा करण्याबरोबरीनेच बियाणे, खते व औषधे यांचा योग्य पुरवठा, जैविक तंत्रज्ञान व सेंद्रिय शेतीचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने शेतकरी कार्यकर्त्यांची अभ्यास शिबिरे घेण्यातही सांड पुढाकार घेत. याच कार्यातून नगर जिल्ह्यातील राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव तालुक्यांत किसान संघाचे भरीव कार्य उभे राहिले. चंपालाल सांड यांनी आयुर्वेदाचाही अभ्यास केला होता. त्यांच्या या अभ्यासाचा फायदा गावकर्‍यांना निश्‍चितपणे होत असे. वृद्धापकाळी पुतण्या भरतने त्यांना आपल्यासोबत पुण्याला नेले, परंतु कायम आपल्या गावासाठी कार्यरत राहण्यासाठी ते पुन्हा राहाता या गावी आले व तेथेच त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

- संपादित

सांड, चंपालाल इंद्रराज