Skip to main content
x

साटम, शंकर नारायण

साटम महाराज

      मुंबईच्या कामाठीपुरासारख्या वस्तीत वावरणारा, दादागिरी-गुंडगिरी करीत, स्वच्छंदी जीवन जगणारा एक तरुण पुढे महान तपस्वी-संत होईल असे कोणी सांगितले असते,तर कोणाचा विश्वासच बसला नसता. पण कधीकधी वास्तव कल्पनेपेक्षा विलक्षण असते. साटम महाराज यांची जीवन-गाथा अशीच विलक्षण आहे. शंकर नारायण साटम यांचे मूळ घराणे मालवण तालुक्यातील कोहीळ येथील होते. या गावीच शंकर साटम यांचा जन्म झाला; पण त्यांची नेमकी जन्मतिथी मात्र कोणास ज्ञात नाही. अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर येथेही एक ‘साटम महाराज’ प्रसिद्ध आहेत. त्यांचे मूळ नाव रामचंद्र जगन्नाथ टिळक असून ते शंकर महाराज साटम यांचे शिष्य आहेत व गुरूचे नावच त्यांनी लावले म्हणून लोक त्यांनाही टिळक ऐवजी ‘साटम महाराज’ म्हणू लागले. शंकर साटम यांचे वडील कोहीळ येथून पोटा-पाण्याच्या धंद्यासाठी चार वर्षांच्या शंकरला घेऊन मुंबईस स्थलांतरित झाले. त्यांना कामाठीपुऱ्यासारख्या वस्तीत राहणे भाग पडले. येथे छोट्या शंकरचे बालपण गेले. इथेच तो लहानाचा मोठा झाला. त्याने काही काळ छोट्या-मोठ्या नोकऱ्या केल्या व काही वर्षे नरसू कापड गिरणीतही नोकरी केली. पण त्याच्या नशिबात वेगळेच लिहिलेले होते. कुसंगती व धरसोड वृत्ती यांमुळे नोकऱ्या टिकल्या नाहीत. त्याने काही काळ एका पारश्याच्या दारू गुत्त्यावरही नोकरी केली.

१९१० साली मुंबईत प्लेगची मोठी साथ आली. शंकरच्या घरातील अनेक जण या रोगाने दगावले. सासू-सासऱ्यांचे निधन झाल्यानंतर शंकरची पत्नीही संसार अर्धवट टाकून कायमची माहेरी गेली. या घटनेने शंकरला मानसिक धक्का बसला व तो अंतर्मुख झाला. अशाच उदास मन:स्थितीत तो चर्चगेटजवळील पारश्यांच्या पवित्र विहिरीजवळ जाऊन बसत असे. तेथे त्याला अनेक साधू-फकीर भेटले व शंकरच्या वृत्तीत हळूहळू बदल होत गेला. इथेच बाबा अब्दुल रहमान या अवलिया फकिराची भेट झाली व शंकरचा ‘शंकरदादा’, ‘साटम महाराज’, ‘सद्गुरू साटम महाराज’ असा नावलौकिक झाला. अवलियाच्या कृपेने शंकरला अनेक सिद्धी प्राप्त झाल्या आणि एके दिवशी मोठेपणा-प्रसिद्धीचा वीट येऊन तो मुंबई सोडून सावंतवाडीमध्ये दाणोली येथे निघून गेला.

सावंतवाडीचा गाडीतळ, दाणोली, अंबोली घाट अशा कोणत्याही स्थळी, कोणत्याही अवस्थेत साटम महाराज लोकांना दिसत. अनेक लोक त्यांचा लहरीपणा व एकूण चाळे पाहून त्यांना वेडेच समजत असत. पण अनेकांना त्यांच्या वाचा-सिद्धीचा, त्रिकालदर्शी ज्ञानाचा अनुभवही आलेला होता.

एकदा सावंतवाडीचे राजेसाहेब श्रीमंत बापूसाहेब भोसले यांना साटम महाराजांच्या वाचा-सिद्धीचा अनुभव आला व ते राजघराणे महाराजांचे भक्त बनले आणि पुढे अशीच भक्तांची संख्या वाढत गेली. पुढे साटम महाराजांचे एवढे नाव झाले, की महात्मा गांधीसुद्धा त्यांच्या दर्शनाला आले होते. अनेकांच्या दुर्धर व्याधी महाराजांनी बऱ्या केल्या.

१९२५ साली गणेश वडेर हे भाविक त्यांच्या दर्शनाला आले व ते निष्ठावान भक्त झाले. त्यांना महाराजांनीच दंतमंजनाचा व्यवसाय करण्यास सांगितले आणि वडेर दंतमंजन व्यवसायात कोट्यधीश झाले. हे गणेश वडेर म्हणजे ‘नोगी’, ‘माकडछाप’ दंतमंजनाचे निर्माते. त्यांनी पुढे श्रद्धेने माटुंगा येथे महाराजांच्या कृपेने दत्तमंदिर बांधले व विपुल भक्तिकाव्यरचना केली. खरे तर, या वडेरांचे लौकिक शिक्षण झालेले नव्हते. त्यांना लिहिण्या-वाचण्यास येत नव्हते. तरीपण त्यांच्या हातून विपुल पद्यरचना झाली, ही साटम महाराजांची कृपा होय.

साटम महाराजांच्या कृपेने अप्पा सावंत मोठे साधक झाले व पुढे ‘परमहंस सदानंद सरस्वती’ म्हणून प्रसिद्ध झाले. कुडाळजवळच्या मधू पेडणेकरांनाही त्यांनी साक्षात्कार घडविला व तेही पुढे मधुकर महाराज पेडणेकर (अलिबाग, सासवने) म्हणून लौकिकास प्राप्त झाले. राजे बापूसाहेब खेमसावंत, सखाराम केसकर, केशव अनंत राजाध्यक्ष (वेंगुर्ले, उभादांडा) असे अनेक नामवंत साटम महाराजांच्या शिष्य वर्गात होते.

१९३७ साली साटम महाराजांना आपल्या जीवनाची सांगता जवळ आल्याचे जाणवले व ते ‘माझी बोट इली हा!’, ‘माझा बापूस बोलवता हा!’, असे सर्वांना सांगत होते. त्यांनी अन्न-पाणी वर्ज्य केले. हळूहळू त्यांची तब्येत ढासळत गेली; पण उपचार करण्यास डॉक्टर मंडळी येताच त्यांना ते गोंधळात टाकत. श्वास-नाडी-हृदयाचे ठोके बंद पडले म्हणून डॉक्टर त्यांना ‘मृत’ म्हणत, एवढ्यात ते त्यांच्याशी बोलत असत. त्यांच्या महानिर्वाणानंतर दाणोलीतील समर्थ सदनाजवळच त्यांची समाधी बांधण्यात आली आहे. समाधी मंदिराची व्यवस्था ट्रस्टच्या देखरेखीखाली आहे.

विद्याधर ताठे

साटम, शंकर नारायण