Skip to main content
x

सातपुते, सतीश भालचंद्र

      तीश भालचंद्र सातपुते यांचे मूळ गाव नगर जिल्ह्यातील राहुरी होय. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयामधून झाले. पुढे त्यांनी ‘संरक्षण’ या विषयातून एम.एस्सी. पूर्ण केले.

     त्यानंतर त्यांनी भारतीय सैनिकी प्रबोधिनीमधून (आय.एम.ए.) प्रशिक्षण घेतले. १९६४मध्ये प्रशिक्षणाअंती त्यांची भूसेनेच्या मराठा लाइट इन्फन्ट्रीमध्ये सेकंड लेफ्टनंट या पदावर नियुक्ती झाली. त्यांनी सिक्कीम, नागालँडमध्य हिमालयीन विभागांमध्ये कार्य केले. १९७१च्या युद्धाच्या वेळी काश्मीरमध्ये तिसरी तंगधार मोहीम, तसेच १९९०-१९९२ मध्ये टिटवाल-कूपवाडा विभागात अतिरेक्यांच्या विरोधातील मोहिमेत त्यांचा समावेश होता.

     २००१मध्ये संसदेवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला केला. त्या वेळेस ते एकविसाव्या कोअरचे प्रमुख होते. पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी आखलेल्या सैनिकी मोहिमेमधील एका भागाचे नेतृत्त्व पंचाहत्तर हजार सैन्यासह सतीश सातपुते यांनी केले.

     भूसेनेच्या दक्षिण विभाग मुख्यालयात २००३-२००४ ही दोन वर्षे सातपुते कार्यरत होते. त्या अवधीमध्ये त्यांनी राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र यांपासून दक्षिण भारतातील सर्व राज्यामधील सैनिकी तळांवरील विविध समस्यांचे निराकरण केले. पुणे, खडकी व देहू रोड छावण्यांमधील विविध प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला.

     सतीश सातपुतेंनी केलेल्या असाधारण सेवेचा गौरव करण्यासाठी त्यांना २००४मध्ये भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते ‘अतिविशिष्ट सेवा पदक’, तसेच २००५मध्ये ‘परमविशिष्ट सेवा पदक’ देऊन सन्मानित केले गेले.

- अनघा फासे

सातपुते, सतीश भालचंद्र