Skip to main content
x

साठे, अण्णाभाऊ तुकाराम

     अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी अस्पृश्य समजल्या जाणार्‍या मांग (मातंग) समाजात झाला. त्यांनी बालपणापासूनच अस्पृश्यतेचे चटके सोसले. त्यांची शाळा दीड दिवसातच सुटली. वडिलांबरोबर वाटेगाव सोडून ते मुंबईत आले. ओझेवाला, हमाल, नाका कामगार, मिल कामगार अशा वेगवेगळ्या कामांतून त्यांनी अर्थार्जन केले आणि मुंबईतील दुकानाच्या पाट्या वाचता-वाचता त्यांना अक्षरज्ञान झाले.

      १९४२च्या आंदोलनात नाना पाटलांच्या प्रतिसरकारात त्यांनी सक्रिय भाग घेतला. त्यामुळे त्यांना भूमिगत व्हावे लागले. १९४४साली टिटवाळा येथे लाल बावटा पथकाची स्थापना झाली. त्यामध्ये अण्णाभाऊ साठे, शाहीर अमरशेख, शाहीर गव्हाणकर सहभागी झाले होते.

     १९४९साली ‘मशाल’ साप्ताहिकात ‘माझी दिवाळी’ ही त्यांची पहिली कथा प्रकाशित झाली. लेखक म्हणून अण्णाभाऊ साठेंची ही पहिली कलाकृती प्रकाशित झाली. पुढील काळात ‘बरबांधा’, ‘कंजारी’, ‘चिरानगराची भुतं’, ‘निखारा’, ‘नवती’, ‘पिसाळलेला माणूस’, ‘आबी’, ‘फरारी’, ‘भानामती’, ‘साडी’, ‘कृष्णाकाठच्या कथा’, ‘खुळंवाडी’, ‘गजाआड’, ‘गुर्‍हाळ’ इत्यादी १३ कथासंग्रह प्रकाशित झाले. तर ‘इनामदार’, ‘पेंग्याचे लगीन’, ‘सुलतान’, ‘अकलेची गोष्ट’, ‘खापर्‍या’, ‘चोर’, ‘कलंत्री’, ‘बिलंदर बुडवे’, ‘बेकायदेशीर’, ‘शंरजीचे इलेक्शन’, ‘पुढारी मिळाला’, ‘मूक मिरवणूक’, ‘माझी मुंबई’, ‘देशभक्त घोटाळे’, ‘दुष्काळात तेरावा’, ‘निवडणुकीतील घोटाळे’, ‘लोकमंत्र्याचा दौरा’, इत्यादी तमाशे व नाटके लिहिली. ‘माझा रशियाचा प्रवास’ हे त्यांचे प्रवासवर्णनही प्रसिद्ध आहे.

     अण्णाभाऊ साठेंच्या एकूण पस्तीस कादंबर्‍या प्रकाशित असून त्यांमध्ये ‘आग’, ‘आघात’, ‘अहंकार’, ‘अग्निदिव्य’, ‘कुरूप’, ‘चित्रा’, ‘फुलपाखरू’, ‘वारणेच्या खोर्‍यात’, ‘रत्ना’, ‘रानबोका’, ‘संघर्ष’, ‘तास’, ‘गुलाम’, ‘डोळे मोडीत राधा चाले’, ‘ठासलेल्या बंदुका’, ‘जिवंत काडतूस’, ‘चंदन’, ‘मूर्ती’, ‘मंगला’, ‘मथुरा’, ‘मास्तर’, ‘चिखलातील कमळ’, ‘अलगूज’, ‘रानगंगा’, ‘माकडीचा माळ’, ‘केवड्याचे कणीस’, ‘वैजयंंता’, ‘आवडी’, ‘वारणेचा वाघ’, ‘फकिरा’, ‘वैर’, ‘पाझर’, ‘सरनोबत’ इत्यादी कांदबर्‍यांचा समावेश आहे.

     या कादंबर्‍यांपैकी बारा कादंबर्‍यांतून त्यांनी समाजापुढे जनसंस्कृती आणली आहे. अण्णाभाऊंचे कादंबरीविश्व हे जनजीवननिष्ठा दृष्टीतून सुख-दुःख, आशा-आकांक्षा. ईर्षा-संघर्ष, आदर्श-अधःपात या सार्‍यांचे व्यापक दर्शन घडविणारे असे जिवंत, गतिशील विश्व आहे. ज्वलंत जननिष्ठा व परिवर्तनाची दुर्दम्य आंतरिक तळमळ यांतून उपलब्ध साधनसामग्रीच्या बळावर अण्णाभाऊंनी कादंबर्‍यांची निर्मिती केली आहे.

     ‘आपण का लिहितो?’ यासंबंधी अण्णाभाऊ साठे लिहितात, ‘माझा माझ्या देशावर, जनतेवर व तिच्या संघर्षावर अढळ विश्वास आहे. हा देश सुखी, समृद्ध व्हावा, इथे समता नांदावी, या महाराष्ट्रभूमीचे नंदनवन व्हावे अशी मला रोज स्वप्ने पडत असतात. ती मंगळ स्वप्ने पाहता-पाहता मी निद्रिस्त होत असतो.’ अण्णाभाऊ स्वप्न पाहत लिहीत असले, तरी त्यांना वास्तवाचे भान होते. ते लिहितात, ‘मी जे जीवन जगतो, पाहतो, अनुभवतो, तेच मी लिहितो. मला कल्पनेचे पंख लावून भरारी मारता येत नाही. त्याबाबत मी स्वतःला बेडूक समजतो. माझी सारी पात्रे या ना त्या नात्याने माझ्या आयुष्यात येऊन गेली आहेत. माझी माणसं वास्तवातील आहेत. जिवंत आहेत.’

       अण्णाभाऊ साठे साहित्याकडून अपेक्षा व्यक्त करताना म्हणतात, “आम्हांला गंगेसारखे निर्मळ साहित्य हवे. आम्हांला मांगल्य हवे आहे. आम्हांला मराठी साहित्याच्या थोर परंपरेचा अभिमान आहे. कारण, मराठी साहित्याची नांदी आमच्याच जीवन-संघर्षातून झडली आहे. जेव्हा दलिताची सावली असह्य होत होती, तेव्हा महानुभावपंथीय साहित्यिकांनी सर्वांना ज्ञान मिळाले पाहिजे, ज्ञान हे मोक्ष असे समजून बंड केले. ते आमचे साहित्यिक माणसांना माणूस म्हणून जगता आले पाहिजे असा दावा मांडून ज्यांनी दलितांच्या भाषेत महाराष्ट्राला सुंदर ज्ञानेश्वरी दिली, ते आमचे साहित्यिक आणि चुकलेले महाराचे मूल कडेवर घेऊन जाणारे ते एकनाथ, ते आमचे साहित्यिक.” अण्णाभाऊ साठे आपल्या साहित्यलेखनात ही परंपरा जोपासतात. चांगल्या रूढी, परंपरा त्यांचे समर्थन करतात. अंधविश्वास, अंधश्रद्धा यांवर कोरडे ओढतात. ते म्हणतात, “जुन्या चालीरिती दूर कराव्यात आणि लोप पावलेल्या; पण प्रगत प्रथांना पुन्हा पुढे आणावे. हेवेदावे, दुष्टावे, वैर यांचा घोर परिणाम दाखवावा आणि या महाराष्ट्रातून प्रेम, सलोखा यांची वाढ व्हावी. जनता सुखी, संपन्न व्हावी आणि महाराष्ट्रात समाजसत्तावादाचा अरुणोदय झालेला आपण पाहावा अशी श्रद्धा मनात घेऊन मी लिहितो.”

      अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये वरील उतार्‍यावरून लक्षात येतात. त्याचप्रमाणे त्यांच्या लेखनप्रेरणाही कळतात. अण्णाभाऊ साठेंच्या ‘वैजयंता’ ‘चिखलातील कमळ’, ‘वारणेचा वाघ’, ‘फकिरा’ इत्यादी कादंबर्‍यांवरून चित्रपट तयार करण्यात आले. ‘फकिरा’ या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला.‘फकिरा’ या चित्रपटात अण्णाभाऊ साठेंनी निळू मांगाची भूमिकाही केली.

     अण्णाभाऊ साठेंनी जसे विपुल लेखन केले, तसे शाहिरीच्या क्षेत्रातही भरीव काम केले आहे. त्यांची ‘महाराष्ट्राची परंपरा’, ‘स्तालिनग्राडचा पोवाडा’, ‘मुंबईचा गिरणी कामगार’, ‘माझी मैना गावाकडे राहिली’, ‘जग बदल घालुनी घाव’, ‘मुंबईची लावणी’ इत्यादी पोवाडे व गीते विशेष गाजली. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात अण्णाभाऊ साठे, अमरशेख यांच्या शाहिरी पथकाने सारा महाराष्ट्र पिंजून काढला होता.

      दुःख, दैन्य, सामाजिक शोषण, जातीपातीचे चटके, अस्पृश्यता, समाजविघातक रूढिपरंपरा यांनी गांजलेल्या दलित, वंचित समाजाचे चित्रण अण्णाभाऊ करतात. त्याचबरोबर संस्कारांचे आणि परंपरांचे जतन व्हावे, अशी भूमिका घेतात. त्यांच्या लेखनातून विरोधासाठी विरोध नाही. स्वाभिमानाचे, शीलाचे रक्षण करून जगणारी माणसे ते रेखाटतात. अण्णाभाऊ साठे लिहितात, ‘स्त्रीचे शील, पुरुषांचा स्वाभिमान आणि देशाचे स्वातंत्र्य यांत कोणतीही तडजोड नसते.’

      अण्णाभाऊंच्या सार्‍या व्यक्तिरेखा अशाच आहेत. समाजात असणार्‍या अनंत समस्या, त्यांत भरडली जाणारी तळागाळातील अज्ञानी, अशिक्षित, वंचित जनता ही अण्णाभाऊंच्या लेखनाची पार्श्वभूमी आहे. यामध्ये दलित, वंचित, भटके-विमुक्त यांचा समावेश आहे, तसाच सद्गुणाचा आगर असणारा विष्णुपंत कुलकर्णीही आहे. अण्णाभाऊंनी मराठी साहित्यात ‘माकडीचा माळ’, व ‘बरबांद्या कंजारी’ ह्यांच्या रूपाने सर्वप्रथम भटक्या-विमुक्तांचे चित्रण केले. त्यांच्या परंपरा, जात, पंचायत आणि पोटाची आग विझवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष त्यांनी शब्दबद्ध केला.

      १९४९ ते १९६९ या वीस वर्षांच्या काळात अण्णाभाऊ साठे यांचे विपुल लेखन झाले. गिरणी कामगार, शाहीर, लोकनाट्याचे जनक, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील सहभाग, १९५८साली अंबरनाथ येथे झालेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटक, चित्रपटकथाकार, पटकथाकार, गीतकार अशा विविध रूपांत अण्णाभाऊ साठे महाराष्ट्राला दिसले. त्यांना सतत दारिद्य्राशीच झुंजावे लागले. आणि शेवटी त्यातच त्यांचा अंत झाला.

- रवीन्द्र गोेळेे

साठे, अण्णाभाऊ तुकाराम