Skip to main content
x

साठे, मनीषा राजस

नीषा राजस साठे यांचा जन्म पुणे येथे विमलाबाई व पुरुषोत्तम साठे या दांपत्याच्या पोटी झाला.आई-वडिलांकडून मनीषा साठ्यांना रंगभूमीचा वारसा मिळाला होता. वडिलांचे रंगांचे दुकान होते व ते हौशी दिलरुबावादक होते. आई ‘भरतनाट्यमंदिर’ या संस्थेत नाट्य दिग्दर्शिका व अध्यापिका होत्या. मनीषा साठे यांच्या नृत्यशिक्षणाचा प्रारंभ पं. बाळासाहेब गोखले यांच्याकडे झाला आणि नंतर त्यांना पं. गोपीकृष्ण यांच्याकडे नृत्यशिक्षणाचे धडे प्राप्त झाले. त्यांना सलग सहा वर्षे मार्गदर्शन मिळाले. त्यांनी २३ एप्रिल १९७५ रोजी ‘मनीषा नृत्यालय’ स्थापन केले. या नृत्यालयामार्फत त्या संपूर्ण भारतात गोपीकृष्णांच्या शैलीचा, शिक्षणाचा प्रसार करतात.
कलाकारात आवश्यक असणारी तांत्रिक परिपूर्णता, सौंदर्यदृष्टी, कल्पनाविलास आणि संवेदनशीलता यांचा योग्य मिलाफ त्यांच्या ठायी पाहायला मिळतो, तर गुरू म्हणून त्यांच्या अंगी असलेला संयम मोठा आहे. त्यामुळेच अवघड गोष्टी सोप्या करून शिकवण्यात त्यांची हातोटी आहे, तसेच अविरत शिकवण्याची चिकाटीही त्यांच्याकडे आहे.
त्यांनी विविध विषयांवर नृत्यसंरचना केलेल्या आहेत. यात पौराणिक विषयांपासून एकविसाव्या शतकातील पोखरणच्या अणुबाँब प्रकल्पापर्यंत अनेक विषय त्यांनी सारख्याच सफाईने हाताळले आहेत. १९९१ पासून जपानी संगीत आणि कथक या विषयांवर त्यांनी सातत्याने विविध प्रयोग केले.
सवाई गंधर्व संगीत महोत्सव, खजुराहो नृत्य महोत्सव, काला घोडा महोत्सव, लखनौ रसरंग महोत्सव या आणि अशा अनेक महोत्सवांतून त्यांनी कथक नृत्य सादर केले. याचबरोबर ‘वारसा लक्ष्मीचा’, ‘सरकारनामा’ आणि ‘तारुण्याच्या लाटेवर’ या मराठी चित्रपटांतून त्यांनी नृत्यदिग्दर्शन केले, ज्यासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारचा ‘उत्तम नृत्य दिग्दर्शक’ व ‘अल्फा टी.व्ही.’ पुरस्कार प्राप्त झाले. रोटरी इंटरनॅशनलचा ‘व्होकेशनल’ पुरस्कार, तर सिटाडेल मॅगझीनचे ‘एक्सेलन्स’ अवॉर्ड त्यांना २००६ मध्ये मिळाले. महाराष्ट्र सरकारने त्यांना ‘राज्य शासन पुरस्कारा’ने गौरविले आहे.
मनीषा साठे या टिळक विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी, भारती विद्यापीठ या सर्व विद्यापीठांच्या सल्लागार समितीवर पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. मनीषा नृत्यालय ट्रस्ट ही संस्था त्यांनी पुण्यात सुरु केली .

मंजिरी कारूळकर

साठे, मनीषा राजस