Skip to main content
x

साठे, विनायक वासुदेव

साठेबाबा

    विनायक वासुदेव साठे यांचा जन्म रत्नागिरी जवळील केळ्ये गावी झाला. वैभवास उतरती कळा लागल्याने त्यांचे वडील वासुदेवराव, केळ्ये सोडून मुंबईला आले. तेथे त्यांनी इंग्रजी शाळा काढली. ते इंग्रजांना मराठी शिकवीत. विनायकांचे आजोबा हरिभाऊ, वडील वासुदेवराव व आई राधाबाई असे तिघे जण, आप्तमंडळी १८८८ ते १८९० या दोन-तीन वर्षांत निवर्तल्याने विनायक निराधार झाला. मातुलगृही संगोपन व शिक्षण चालू असताना तो देवळात जाऊन एकांतात देवाची आळवणी करीत बसे. त्याच्या हुशारीवर व प्रामाणिकपणावर त्याचे मास्तर अगदी खूश असत. तो वर्गाचा मॉनिटर असे. विनायक १८९८ मध्ये स्कूल फायनल उत्तीर्ण होऊन न्यायालयात नकला उतारण्याच्या नोकरीवर लागला. त्याला ३ एप्रिल १९०२ रोजी कारकुनाची जागा मिळाली. विनायक  कामात चोख, नि:स्पृह व प्रामाणिक असल्याने वरिष्ठ नेहमी त्याच्यावर खूश असत.

आजोबांनी १८९४ मध्ये केशवराव वैशंपायन यांच्या मुलीशी त्याचा विवाह लावून दिला. पुढे विनायकाला १९०१ मध्ये पुत्र (रामचंद्र) व १९०८ मध्ये कन्यारत्न झाले; परंतु दुर्दैवाने ५ ऑक्टोबर १९०९ रोजी सौ. शारदाबाईंचे जलोदराने निधन होऊन मुले पोरकी झाली. विनायकरावांनी मुलांना त्यांच्या आजोळी, दापोलीस ठेवले. त्यांचे सांसारिक जीवन संपले. विनायकरावांना नोकरीच्या कामासाठी नेहमी तालुक्याची वारी करावी लागे. यापैकी १९०६ ते १९२०, चिपळूण व १९२२ ते १९२८, दापोली हे कालखंड विशेष महत्त्वाचे आहेत. ते १९३९ साली रेकॉर्डकीपर या पदावर असताना रत्नागिरीहून सेवानिवृत्त झाले. ‘‘नोकरी हासुद्धा माझ्या उपासनेचाच एक भाग आहे,’’ असे ते म्हणत.

साठेबाबांनी फक्त दत्तोपासना सुरू ठेवली. त्यांनी टेंब्ये स्वामींकडे अनुग्रह याचना केली. स्वामींनी २८ मे १९१४ रोजी अंगारा पाठविला, आणि बाबांना तीन संकल्प आचरण्यास सांगितले : १) मठ स्थापना, २) धर्म जागृती व ३) लोकसंग्रह. बाबांनी योजनाबद्ध आखणी करून स्वामींनी सोपविलेले कार्य केले. आयनी येथे मठस्थापना झाली. धर्मजागृतीविषयी बाबा आपल्या ‘दत्तभजन गाथे’त म्हणतात, ‘धर्म सोडू नये, धर्मचि वर्तावा । धर्माचा करावा जयजयकार...’’

बाबांनी आपले सुपुत्र रामचंद्र ऊर्फ बाबूराव याचे लग्न १९२६ मध्ये लावून दिले. बाबांनी १९३४ ते १९४४ या काळात ‘श्रीकृष्ण निमंत्रण’, ‘कार्तवीर्य’, ‘विश्वामित्राचा अनुग्रह’, ‘गुरुपदेश’ आदी तेरा नाटके लिहिली. ही नाटके म्हणजे साभिनय कीर्तने होती. त्यांची स्मरणशक्ती विलक्षण होती. त्यांचा व्यासंग दांडगा होता. २००० पुस्तकांच्या संग्रहापैकी त्यांचे विषय साठेबाबा बिनचूक सांगत. त्या पुस्तकातील अमुक विषय अमुक बाजूला छापलेला आहे हे नेमके दाखवून देत. त्यांना वाचा-सिद्धीसह इतरही सिद्धी प्राप्त होत्या. घडणाऱ्या गोष्टींची त्यांना पूर्वसूचना मिळत असे. ते म्हणत, ‘‘दैवी रहस्ये बोलावयाची आम्हांला परवानगीच नसते. दैवी घटनांत आम्हांला ढवळाढवळ करता येत नाही.’’ त्यांच्याकडे येणाऱ्यांना  ते सांगत, ‘‘नेहमीच्या बोलण्यातही देवाकडेच कर्तृत्व द्यावे. ‘मी भजन केले अशी भाषा न वापरता देवाने माझ्याकडून करविले,’ असे म्हणावे. कर्तृत्व देवाकडे दिल्यानंतर कर्मफल बाधत नाही.’’ बाबांची दिनचर्या म्हणजे पहाटे उठून ध्यानस्थ बसणे, नंतर मुलाकडे कामाच्या, व्यवहाराच्या गोष्टी बोलणे, कडकडीत पाण्याने स्नान करणे, स्नानानंतर चहा घेणे, दुपारी देवळामध्ये ध्यान व रात्रीपण ध्यान.

१९४० पर्यंत न्यायालयात जायचे असल्याने ते सकाळचे आन्हिक लवकर उरकून, जेवून न्यायालयात जात. निवृत्त झाल्यावर १९५२ पर्यंत त्यांनी कीर्तने रचणे यालाच वाहून घेतले. त्यांना ९ जून १९२२ रोजी श्रीधर पु.आचरेकर यांनी श्री दत्ताची तसबीर दिली होती, ती ते कायम कोटाच्या खिशात बाळगीत व वारंवार तिचे दर्शन घेत. ‘‘आपल्यास जे प्रिय ते देवास समर्पण करावे,’’ असे ते सांगत. बाबा हे स्वभावाने कर्मठ, तसेच तापट असले तरी अंतस्थ अतिशय मायाळू स्वभावाचे होते. दैनंदिन कार्यक्रमात स्थानावर येणाऱ्या लोकांच्या गाठीभेटी यामध्ये पुष्कळ वेळ जायचा. आधीच्या काळात ज्योतिषासाठी पुष्कळ लोक यायचे; पण नंतर त्यांनी दत्तोपंत ढवळे, पद्मनाभ वरेरकर व वामनराव पराडकर यांना शिकवून तयार केले.

बाबांनी एकंदर २९६ आख्याने व १२१२ पूर्वरंग रचले. बाबांचा व्यासंग अफाट होता. बाबांच्या प्रकाशित ग्रंथसंपदेपैकी ‘श्री दत्तसेवा’ (आवृत्ती ३), ‘श्रीदत्त भजन- गाथा’ भाग पहिला, मांगलिक पदे, प्रार्थना पदे, ‘बाल- दत्त लीला’ वगैरे आहेत. माजी खासदार व ‘बलवंत’चे माजी संपादक मो.दि. जोशी यांच्या म्हणण्याप्रमाणे, ‘‘सत्यशोधन व सन्मार्गाचे अनुकरण हे कार्य सोपे नाही. साठे महाराजांसारखे साधुसंत हे या कठीण मार्गावरील दर्शक दीप होत.’’ दि. ८ सप्टेंबर १९३३ च्या ‘केसरी’त, दि. ११ ऑगस्ट १९३३ च्या ‘ज्ञानप्रकाशा’त व ३० नोव्हेंबर १९३६ च्या ‘लोकमान्य’ दैनिकात प्रकाशित अभिप्राय साठेबाबांच्या भाषेच्या गुणवत्तेची व ग्रंथकर्तृत्वाची साक्ष देतात.

वि.ग. जोशी

साठे, विनायक वासुदेव