Skip to main content
x

साठ्ये, जयंत आनंद

      डॉ.जयंत आनंद साठ्ये यांचा जन्म बंगळुरू येथे झाला. त्यांचे वडील सरकारी नोकरीत होते. आजोबा ख्यातकीर्त अभियंते आणि वडीलही अखिल भारतीय अभियांत्रिकी सेवेतले. त्यामुळे डॉ. जयंत साठ्ये यांच्या रक्तात अभियांत्रिकी भिनलेली होती. त्यांचे वडील ज्या गावी बदली होऊन जातील, त्या गावी शिक्षण घेत-घेत जयंत साठ्ये हे त्यांच्या हुशारीच्या जोरावर राष्ट्रीय विज्ञान प्रज्ञा शिष्यवृत्तीचे मानकरी ठरले. १९६९ साली त्यांनी यंत्र अभियांत्रिकी विषयात मुंबई आय.आय.टी.मधून बी.टेक. ही पदवी मिळविली. मग ते अमेरिकेत गेले. तिथे १९७४ साली त्यांनी पर्यावरणीय अभियांत्रिकीत पीएच.डी. मिळविली. १९७४ साली ते जागतिक कीर्तीच्या लॉरेन्स बर्कले राष्ट्रीय प्रयोगशाळेत रुजू झाले. तिथे ते ज्येष्ठ शास्त्रज्ञ म्हणून तेव्हापासून कार्यरत आहेत. १९८८ ते १९९८ या काळात डॉ.साठ्ये आंतरराष्ट्रीय ऊर्जा अभ्यासगटाचे कार्यकारी प्रमुख म्हणून काम करीत होते. पुढे ते या गटाचे नेतृत्व करू लागले. ते अष्टपैलू आहेत. वित्तीय व्यवस्थापन आणि कर्मचारी व्यवस्थापनातील त्यांचे कार्यही वाखाणले गेले आहे.

     ‘इंटर गव्हर्नमेंट पॅनल ऑन क्लायमेट चेंज’ म्हणजेच आय.पी.सी.सी.ला २००७ सालचा नोबेल शांतता पुरस्कार प्राप्त झाला. या संस्थेशी दोन भारतीयांचा संबंध होता. अशा संस्थांचे कार्य हे संघभावनेने चालते. त्यामुळे ह्या संस्थेशी संबंधित सर्वच शास्त्रज्ञांचा हा गौरव होता. त्यात संस्थाप्रमुख डॉ. राजेंद्र पचौरी यांच्याबरोबर डॉ. जयंत आनंद साठ्ये हेही होते. आय.पी.सी.सी. आणि अल् गोर यांना २००७ सालचा शांततेचा नोबेल पुरस्कार विभागून मिळाला. मनुष्याने त्याच्या रोजच्या जगण्यासाठी केलेल्या उद्योगातून जागतिक हवामानात जो बदल घडला, तो कसा याचा अभ्यास करून त्या माहितीचा प्रसार संस्थेने जगात केला आणि हा बदल थांबवण्यासाठी काय करावे लागेल याच्या प्रयत्नांचीही मुहूर्तमेढ रचली, यासाठी संस्थेला हा पुरस्कार मिळाला. या प्रयत्नात डॉ. साठ्ये यांचा वाटा महत्त्वाचा आहे.

     १९८० सालानंतर प्रथम ओझोन विवर आणि नंतर हवामानातील बदल हे विषय प्रकर्षाने जगापुढे आले. या दोहोंचा परस्परसंबंध असल्याने, पुढे हवामानातील जागतिक बदल वाढत आहेत हे सिद्ध करणे आणि त्यांना थोपविण्यासाठी उपाय सुचविणे, हा एक कळीचा मुद्दा  ऐरणीवर आला. त्यातूनच आय.पी.सी.सी.ची स्थापना झाली. त्या बाबतीत त्या वेळी बरेच वाद झाले. पण आय.पी.सी.सी.चे सदस्य त्यांच्या हाती सोपविलेल्या कामाचे महत्त्व जाणत होते. याला कारण, या तज्ज्ञांची त्यांच्या पर्यावरणीय कार्यावर निष्ठा होती.

     डॉ. जयंत साठ्ये हेही असेच निष्ठावंत तज्ज्ञ असल्याने, त्यांना आय.पी.सी.सी.त मानाचे स्थान होते. आधी ते या समितीच्या एका विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. नंतर त्यांनी समन्वयक (कोऑर्डिनेटर) म्हणून काम बघितले. हे कार्य त्यांनी उत्कृष्टरीत्या सांभाळले. खरे तर समन्वयक ही एक तारेवरची कसरत असते. मूळ ध्येयाशी सुसंगत विचारांमध्ये सुसूत्रता आणणे, हे काम वाटते तितके सोपे नसते. या समितीच्या विविध विभागांचे अहवाल एकत्र करून त्यातून एक प्रमुख अहवाल तयार करण्याचे कामही साठ्ये यांनी पार पाडले. या काळातही त्यांचे आपल्या शैक्षणिक कर्तव्यांकडे दुर्लक्ष झालेले नव्हते. त्यांनी चाळीसहून अधिक विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केलेले आहे.

     त्यांनी विपुल लेखनही केलेले आहे. त्यांनी पर्यावरणविषयक वेगवेगळ्या दहा पुस्तकांचे लेखन-सहलेखन केलेले असून आशिया विकास बँक, जागतिक बँक, तैवान पॉवर कंपनी इत्यादी संस्थांचे ऊर्जाप्रकल्पविषयक सल्लागार म्हणून ते काम पाहतात. ‘द जर्नल ऑफ मिटिगेशन अ‍ॅण्ड अ‍ॅडॉप्टेशन स्ट्रॅटेजीज फॉर ग्लोबल चेंज’ या नियतकालिकाच्या पर्यावरण आणि ऊर्जाविषयक खास अंकांचे ‘अतिथी संपादक’ म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे.

     हवामान बदलामुळे विकसनशील देशांना होणारे तोटे, हा त्यांचा चिंतेचा आणि म्हणूनच अभ्यासाचा विषय आहे. या हवामान बदलांचा विकसनशील देशांना होणारा त्रास कमी कसा करता येईल, आणि या बदलाला तोंड देण्यासाठी विकसनशील देशांनी काय करायला हवे, याबाबतचा ऊहापोह करणारे ‘क्लायमेट चेंज अ‍ॅण्ड डेव्हलपिंग कंट्रीज’ हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झालेले असून ते त्यांनी एन.एच. रवींद्रनाथ यांच्या सहकार्याने लिहिले आहे. हवामान बदल, वाहतूक, जमिनीच्या वापरातील बदल, कमी होणारी वनसंपदा आणि ऊर्जासमस्येची वाढती तीव्रता, याविषयींचे त्यांचे काम जगभर वाखाणण्यात आले आहे.

अक्षय विकास आणि कार्बनचा वापर यांबाबत त्यांचे विचार जगन्मान्य झाले. वाढता कार्बन-डाय-ऑक्साइड वायू वातावरणातून हटवायला काय करावे, यासंबंधी त्यांनी उद्बोधनाचे अथक प्रयत्न केलेले आहेत. त्यासाठी त्यांनी प्रशिक्षण वर्ग, प्रात्यक्षिके, भाषणे आणि कार्यशाळांचा उपयोग केला. जिथे विजेचा तुटवडा आहे, तिथे विजेचा जास्तीत जास्त कार्यक्षम वापर केला; तसा वापर करणारी यंत्रे बनवली; वीज वाया जाणार नाही, याची अधिकाधिक काळजी घेतली तर खूप फायदा होईल, हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्याची प्रचिती आणून देण्यासाठी  कॅलिफोर्नियात डॉ. साठ्ये यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.

     — प्रा. निरंजन घाटे

साठ्ये, जयंत आनंद