Skip to main content
x

सावळापूरकर, गजानन शिवानंद

सावळापूरकर, गजानन महाराज

      श्चिम बंगालमधील कोलकात्याजवळच्या खड्गपूर गावात माता मंगला भगवती सोनामाता व पिता शिवानंद स्वामी यांच्या पोटी गजानन सावळापूरकर यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव लक्ष्मण. घरातील वातावरण शिवभक्तीचे होते. त्यांच्या आजोळीदेखील आध्यात्मिक वातावरण होते. महाराजांचे मूळ घराणे विदर्भातील सावळापूर येथील असल्यामुळे ते सावळापूरकर हे आडनाव लावू लागले. श्री गजानन महाराजांच्या मातु:श्री सोनामाता यांचे काका श्री गंगाधर महाराज अक्कलकोट येथे श्री स्वामी- समर्थ यांचे शिष्य बाळप्पा महाराज यांनी स्थापन केलेल्या पीठावर प्रमुख होते. त्यांना खड्गपूर येथे एक विलक्षण तेजस्वी मूल जन्माला आले आहे, असा दृष्टान्त झाला.

श्री गजानन महाराज हेच ते तेजस्वी मूल असे जाणून श्री गंगाधर स्वामींनी त्यांना खामगाव येथे आणले. अक्कलकोट, खामगाव येथे त्यांचे मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाले. हिंदी, संस्कृत, मराठी, इंग्रजी आणि बंगाली भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. शाळेत त्यांची ओळख ‘कवी गजानन’ अशीच होती. विद्या संपादन करून पोटार्थी बनावे, अशी गजानन यांची मुळीच धारणा नव्हती. अद्भुत स्मरणशक्ती प्राप्त झालेल्या गजाननांनी अल्पावधीतच, म्हणजे विसाव्या वर्षातच वेद, उपनिषदे, आयुर्वेद, मनु:स्मृती यांचे सर्वंकष अध्ययन केले. त्याचबरोबर त्यांनी आधुनिक विज्ञानही अवगत करून घेतले. त्यामुळे १९३८ सालीच त्यांना अक्कलकोट स्वामी पीठाचे अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. माघ शुद्ध दशमीला (इ.स. १९३८) त्यांना गुप्तरूपाने कृष्णशक्ति मंत्राची दीक्षा मिळाली. अक्कलकोटचे समर्थपीठ म्हणजे गुरुमंदिर. हे पुढे ४६ वर्षे श्री गजानन महाराजांची कर्मभूमी झाली. या गुरुमंदिरात महाराजांनी चार वर्षे कृष्णशक्ति मंत्राची साधना केली.

१९४२ मध्ये या साधनेची पूर्तता झाल्यानंतर त्यांना श्रीपरशुरामांनी महात्रिपुरी मंत्राची आणखी दीक्षा देऊन पूर्णाभिषेक केला. ‘मी श्रुतींचे पुनरुज्जीवन करीन’ अशी प्रतिज्ञा श्री गजानन महाराजांनी केली. महाराजांच्या जीवनात वेदधर्माला त्यांनी नेहमीच प्रमुख स्थान दिले. सर्व जगामध्ये वेदधर्माचा प्रसार व्हावा ही त्यांची मनीषा होती. आज त्यांचे जगभरात अनुयायी आहेत.

अग्नी हे सकल विश्वाचेच आद्यदैवत आहे असे ते मानत असल्यामुळे त्यांनी अग्नी उपासनेलाही नेहमीच प्राधान्य दिले होते. १९३८ ते १९५० या तपभराच्या काळात श्री परशुरामांसोबत त्यांनी सहा तीर्थयात्रा केल्या. हिमालयातील यात्रेत त्यांनी चिरंजीव व्यासदर्शन घेतले, त्याचप्रमाणे गंधमादन पर्वत आणि कैलास पर्वताचे दर्शनही त्यांनी घेतले.

चिपळूण येथील श्री परशुराम क्षेत्र, पंढरपूर आणि श्रीशैल्य या पवित्र स्थळांचेही त्यांनी दर्शन घेतले. महाराज स्वत:च्या हाताने स्वयंपाक करीत असत; पण एकदा चहा करताना अचानक अग्नी प्रज्वलित झाला. महाराजांना त्यातून संकेत मिळाला. तेव्हापासून त्यांनी स्वत: स्वयंपाक करणे बंद केले.

द्रव्याला स्पर्श न करणे, अग्नी प्रज्वलित न करणे, सोन्याला हात न लावणे, वहाणा न घालणे, शिवलेले वस्त्र न परिधान करणे, अशी बंधने महाराज कटाक्षाने पाळत असत. गोब्राह्मण प्रतिपालन या संकल्पनेचा पुरस्कार श्रीमहाराजांनी प्रकर्षाने केला. गोब्राह्मणांची काळजी घेणे म्हणजे यज्ञसंस्थेचे रक्षण आणि तिची जोपासना करणे होय. ‘गवामंगेषु तिष्ठान्ति भुवनानिचतुर्दशा । यस्मात् तस्मात् शिवमेस्यात् इहलोके परचय ॥’ गाईमुळेच इह आणि परलोकांमध्ये कल्याण होते आणि शिवाप्रत जाता येते, असे ते सांगत.

श्री गजानन महाराजांनी प्रपंचही व्यवस्थित केला. त्यांच्या अर्धांगिनी शारदामाता शालीन आणि ममताळू होत्या. त्यांनीच अक्कलकोट आणि पुढे शिवपुरीला असंख्य भक्तगणांना आपल्या मायेने जोपासले. वेदधर्ममय जीवन व्यतीत केलेल्या श्री गजानन महाराजांचे कार्य त्यांनी बरोबर ओळखले होते. महाराजांच्या जाण्याने तर त्यांनी अन्नत्याग करून दहा दिवसांतच या जगाचा निरोप घेतला.

महाराजांनी वेदधर्म, सत्शील धर्माचरणाचा उद्बोध करून कित्येकांना या जगाच्या वहिवाटीमध्ये आदर्श पुरुष, आदर्श स्त्री म्हणून संस्कारित केले आहे. गजानन महाराजांचा स्नेहबंध सोनगडच्या शीख धर्मसंस्थेशीही दृढ झाला होता. त्यांना गुरुग्रंथसाहेबाच्या शेजारीच बसायला आसन देऊन त्यांचा मोठाच बहुमान केला होता. श्री गजानन महाराजांनी मार्गशीर्ष वद्य द्वितीया या दिवशी पृथ्वीतलावरचे आपले कार्य आटोपते घेतले. शिवपुरी, उत्तर भारत येथे महाराजांचे सुपुत्र श्री श्रीकांतजी वेदविज्ञानाचा अभ्यासक्रम तेथील अभ्यासकांकडून करवून घेत आहेत.

संदीप राऊत

सावळापूरकर, गजानन शिवानंद