Skip to main content
x

सावंत, बापू दौलत

स्वामी स्वानंदगिरी

     स्वामी स्वानंदगिरी या नावाने प्रसिद्धी पावलेले बापू दौलत सावंत यांचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील नांदिवडे या गावी झाला. शाळेत थोडेफार शिकून ते अन्य चाकरमान्यांप्रमाणेच मुंबईत आले. मुंबईत ते पिकेट रोडवरील एका तंबाखूच्या दुकानात विड्या वळण्याचे काम करत. त्यांच्यासह राहणारे नारायण संसारे नावाचे कामगार रोज स्नान केल्यानंतर धर्मग्रंथाचे पठण करीत. बापूंनाही ते आवडू लागले. तेही रोज स्तोत्रे वाचू लागले. हरिविजय, शिवलीलामृत असे ग्रंथ त्यांनी वाचून काढले. कीर्तने, भजने, प्रवचने ऐकता-ऐकताच एके दिवशी पंढरपुरात प्रस्थान ठेवते झाले आणि तेथे त्यांनी ह.भ.प. वासकर महाराजांकडून माळ घेतली व ते वारकरी झाले.

पंढरपुरात गोविंदपुरा, तसेच आळंदीला गोपाळपुरात त्यांचे वास्तव्य होऊ लागले. मुंबईत पिकेट रोडवरच्या गीता पाठशाळेत त्यांनी वेदशास्त्रसंपन्न गुरुजी नरहरशास्त्री गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली भगवत्गीतेचा अभ्यास केला. श्री क्षेत्र काशी येथे सारस्वत मठात जाऊन त्यांनी वेद, उपनिषदांचा अभ्यास केला. त्यांना मुंबईतील त्यांचे स्नेही बाबाजीराव शिंदे, तसेच ह.भ.प. गणपत महाराज सावंत यांनी एकदा प्रवचन देण्याची संधी दिली.

त्यानंतर त्यांनी लोकाग्रहास्तव भगवद्गीतेवर प्रवचने देणे सुरू केले. याच काळात त्यांना करी रोड, मुंबई येथील दत्त मंदिरात पद्मनाथ स्वामींनी ‘स्वामी स्वानंदगिरी’ हे नाव दिले. १९२६ साली मुंबईत नारायण माधव कदम म्हणजेच बाळामास्तर यांच्या पुढाकाराने जागा संपादन केल्यानंतर ‘भगवद्गीता स्वाध्याय मंडळा’ची स्थापना झाली. तेथे स्वानंदगिरींनी गीता आणि अन्य धर्मग्रंथांवर प्रवचने सुरू केली. त्यानंतर त्यांनी भायखळ्याच्या शिवमंदिरात प्रवचनांचा परिपाठ सुरू केला. नारळी पौर्णिमेला श्रावणी उत्सवाचे नियमित आयोजन केले. या आयोजनातून त्यांनी कित्येक मुलांना विधियुक्त यज्ञोपवीत व्रतबंध संस्कार दिले. यातूनच त्यांचे हजारो शिष्य निर्माण झाले. त्यांना वेदादी धर्मविषयांत प्रवीण केले. स्वामींनी अनेक व्यसनी, अनीतिमान लोकांना सन्मार्गावर आणले. भगवद्गीतेचे सखोल अध्ययन आणि सूक्ष्म अभ्यासातूनच, तसेच धर्मग्रंथांच्या गर्भित अर्थांमधूनच माणसाची आध्यात्मिक उंची उन्नत होते, असे ते सांगत.

स्वामी स्वानंदगिरी यांनी उच्चभ्रू समाजाबरोबरच तळागाळातील लोकांचाही प्रकर्षाने विचार केला. भारतीय सर्वोच्च संस्कृतीतील वैदिक धर्म, ऋषी संस्कृती सामान्यातिसामान्यांच्या घरांपर्यंत, गावांपर्यंत पोहोचली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. संपूर्ण कोकणात त्यांनी झपाटल्यागत फिरून गीता स्वाध्यायाचा प्रसार केला. गोठणे, जांभवडे, झाडगाव नाका, तोंडली, सोनगाव अशा रत्नागिरी-सिंधुदुर्गातील कित्येक गावांत आणि पंढरपूर, पुणे, नाशिक, आळंदी अशा अनेक गावां-शहरांतून त्यांनी भगवत्भक्तीची ज्योत जनसामान्यांमध्ये प्रज्वलित केली. अनेक गावांत विठ्ठल मंदिरे बांधून तेथे महिला, मुले आणि तरुण, प्रौढांना गीता शिकवली. त्यांनी अध्यात्माचा प्रकांड अभ्यास केला. त्यातूनच ‘नित्यपाठ’, ‘सत्शास्त्र’, ‘पूर्णबोध’, ‘ईश्वरोपासना’, ‘सार्थ लघू ज्ञानेश्वरी’ या ग्रंथांची लिखित मौक्तिके त्यांनी लोकार्पण केली. या ग्रंथांच्या अनेक आवृत्त्याही निघाल्या. पौष शुद्ध सप्तमी म्हणजेच १९५४ साली त्यांना देवाज्ञा झाली. त्यांच्या पश्चात त्यांच्या शिष्यगणांनी चिपळूण येथे त्यांचे स्मारक ‘स्वानंदाश्रम’ या नावाने उभे केले आहे.

संदीप राऊत

सावंत, बापू दौलत