सबनीस, रघुनाथ दामोदर
बिनीचे विनोदकार वसंत सबनीस जन्माने सोलापूरकर होते. पंढरपूर येथे प्राथमिक-माध्यमिक शिक्षण घेऊन त्यांनी फर्गसन, पुणे येथून पदवी प्राप्त केली. मुंबईला शासकीय नोकरी करता करता ते विनोदी लेखनाकडे वळले. त्यांनी ‘पानदान’ (१९५८), ‘चिल्लर खुर्दा’ (१९६०), ‘भारूड’ (१९६२), ‘मिरवणूक’ (१९६५), ‘पंगत’ (१९७८), ‘आमची मेली पुरुषाची जात’ (२००१), ‘खांदेपालट’ (१९७२), ‘परवाल’ (१९७७), ‘आत्याबाईला आल्या मिशा’ (१९८५), ‘थापाड्या’ (१९८७), ‘विनोदी द्वादशी’ (१९८८), ‘बोका झाला संन्यासी’ (२००१) असे कथासंग्रह त्यांनी लिहिले. खेरीज ‘सोबती’ (व्यक्तिचित्रे); ‘महिश्वरी’ (आत्मपर लेख) असे त्यांनी संख्येने आणि गुणाने विपुल लेखन केले. प्रसन्न भाषा, सामाजिक भान, संवादभाषेवर पकड अशा गुणांनी सबनीसांची लेखणी समृद्ध आहे.
‘विच्छा माझी पुरी करा’ (१९६८) हे लोकप्रिय लोकनाट्य लिहून जागतिक कीर्ती मिळवणारे लेखक म्हणून वसंत सबनीसांचा खास नामोल्लेख करावा लागतो. तमाशाच्या कनातीआड बंदिस्त असणारा आणि भद्र लोकांना न आवडणारा लोकनाट्य हा नाट्यप्रकार समाजमान्य, लोकमान्य करणारी सबनीसांची संवादभाषा लोकनाट्याला वेगळेच परिमाण देऊन गेली. (दादा कोंडकेंच्या सादरीकरणालाही याचे श्रेय जाते.) सैंय्या भये कोतवाल’ हे त्याचे हिंदी रूपडेही रसिकमान्य झाले.
सबनीसांची ओळख विनोदी नाटककार म्हणून महत्त्वाची आहे. ‘गेला माधव कुणीकडे’ (१९९४), ‘कार्टी श्रीदेवी’ (१९८८), ‘मामला चोरीचा’ (१९८६), ‘म्हैस येता घरा’ (१९६९), ‘मेजर चंद्रकांत’ (१९७७) आणि अतिशय गाजलेले नाटक ‘सौजन्याची एैशीतैशी’ (१९७५) अशी विनोदी नाट्यसंपदा आणि त्याचबरोबर त्यांनी अनेक एकांकिका, ‘अदपाव सुतार’सारखी वगनाट्ये आणि ‘निळावंती’ (१९६३), ‘माझे घरटे माझी पिले’ (१९६८) अशी वेगळ्या घाटाची नाटके लिहिली.
‘प्रेक्षकांनी क्षमा करावी’ (१९६१) आणि ‘चिलखतराज जगन्नाथ’ (१९७१) हे त्यांचे एकांकिकासंग्रह प्रयोगक्षम आहेत. संवादभाषा सिद्धहस्त असल्याने त्यांनी अनेक यशस्वी पटकथाही लिहिल्या.